Positive News: गरजवंतांच्या सेवेसाठी झाले शिक्षक दांपत्य आधारवड

Positive News: गरजवंतांच्या सेवेसाठी झाले शिक्षक दांपत्य आधारवड

पाथर्डी (जि. नगर) येथील अनुराधा व पोपट फुंदे हे शिक्षक दांपत्य शेतकरी, शेतमजूर, आदिवासी, भूमिहीन व आधारहीन व्यक्तींच्या सेवेसाठी आधारवड ठरले आहे. सहा वर्षांपासून समाजसेवेचे व्रत टिकविणाऱ्या या दांपत्याकडून वेतनातील दहा टक्के रक्कम गरजवंतांसाठी खर्च करण्यात येते.

नगर जिल्ह्यात पाथर्डी तालुक्यातील फुंदे टाकळी गावात अनुराधा व पोपट हे फुंदे दांपत्य राहते. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत ते एकोणीस वर्षांपासून शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. सकारात्मक आणि प्रयोगशील कार्यातून त्यांनी आपला ठसा उमटवला आहे. साहित्य निर्मितीतून कृतिशील सहज शिक्षणाचा प्रयोग त्यांनी राबवला आहे. 

फुंदे हे शेतकरी कुटुंब. त्यामुळे शालेय उपक्रम राबवताना ग्रामीण भागाची गरजच त्यांनी केंद्रस्थानी ठेवली. सन २०१४ मध्ये एका कठीण प्रसंगातून ते वाचले. त्यानंतर समाजासाठीच काम करण्याचा निर्णय घेतला. शेतकरी, कष्टकरी, कामगार, शेतमजूर, आदिवासी कुटुंबातील आर्थिकदृष्ट्या गरजू  मुलांच्या शिक्षणासाठी स्वखर्चाने स्वतःच्या वेतनातील दहा टक्के रक्कम देण्याचा निर्णय या दांपत्याने घेतला. अनाथ मुलांना वाढदिवसानिमित्त कपडे, शालेय साहित्य देणे, स्मशानभूमीत काम करणाऱ्या व्यक्तीला धान्य किराणा देणे, गरजू कुटुंबाला ऐपतीनुसार आर्थिक मदत अशा विविध कामांमधून सहा वर्षांत त्यांनी सुमारे एक हजाराहून अधिकांसाठी तीन लाख रुपये खर्च केले आहेत.

पालकत्व स्वीकारले 
निराधार, भूमिहीन, आत्महत्या केलेल्या शेतकरी कुटुंबातील महिलांसाठी देखील त्यांनी काम सुरू केले आहे. रोजगाराची चिंता असलेल्या महिलांना घरीच रोजगार देण्याचा प्रयत्न आहे. वर्षभरात सुमारे १४ महिलांसाठी शेळ्या, शिलाई यंत्र, पिठाची गिरणी, स्व-उत्पन्नातील एक लाखांपेक्षा अधिक रक्कम देऊ करणे आदी कामे त्यांनी पार पाडली आहेत. दर रविवारी ते वंचिताचा शोध उपक्रम राबवत सहकारी मित्रांनाही असे गरजू शोधण्याचे आवाहन करतात. त्या ठिकाणी भेट देऊन पाहणी करतात. गरजू कुटुंबातील पन्नास मुलांचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारले आहे. आदिवासी कुटुंबातील शाळाबाह्य मुलांना शाळेत दाखल करूनही त्यांनी आर्थिक मदत केली आहे. वर्षभरात एकही सुट्टी न घेणारी शाळा अशी ओळख तयार केलेल्या मोहरी (ता. पाथर्डी) येथील डोईफोडे वस्तीवर कार्यरत असलेले पोपट समाजासाठी आदर्श झाले आहेत. त्यांची पत्नी अनुराधा यांनी पतीच्या खांद्याला खांदा लावून काम करताना ग्रामीण महिलांना रोजगाराबाबत प्रशिक्षण देण्याची जबाबदारी घेतली आहे. 

अनाथालयाद्वारे सेवा 
वयस्क आई भागीरथी व वडील बाबासाहेब घरची शेती सांभाळतात. घरच्या गरजेपुरते धान्य वगळता दरवर्षी उर्वरित धान्य गरजवंतांना मोफत वाटप करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. शेतातील चाराही तालुक्यातील तारकेश्‍वर संस्थानाच्या गोशाळेला देण्यात येतो. पाच वर्षांपासून हा उपक्रम दरवर्षी नियमित सुरू आहे. आता दांपत्याने अनाथ महिला, विधवा, आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची मुले, वृद्ध यांच्यासाठी पाथर्डी येथे सेवाश्रय नावाचे अनाथालय सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी आपल्या वेतनातील रक्कम उपयोगात आणण्याचा त्यांचा मानस आहे.
पोपट फुंदे  ८३२९७३२८१३

आणखी बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com