पुरुषांच्या बचत गटांंनी पिकवली सहा एकरांत साठ टन केळी

60 ton banana crop cultivated on 21 people with help of self employed group in ratnagiri
60 ton banana crop cultivated on 21 people with help of self employed group in ratnagiri

संगमेश्वर : कोकणच्या लाल मातीत केवळ सुपारी, नारळ आणि भाताचेच उत्पादन घेतले जाते, हा समज शेतीमध्ये सुरू असलेल्या नवनवीन प्रयोगांनी चुकीचा असल्याचे दाखवून दिले. सहा एकर क्षेत्रात केळीची लागवड करत ६० ते ६५ टनाचे उत्पादनदेखील घेतले आहे. कोकणातील शेतकरी त्यातून लाखो रुपयांची कमाई आणि लाखोंची उलाढालदेखील करतोय. संगमेश्वर तालुक्‍यात पुरुष शेतकऱ्यांनी बचत गटाने ही किमया साधली. 

धामणी गावच्या २१ पुरुषांनी एकत्र येत जमीन आणि पैशाच्या समस्येवर चर्चा करत तोडगा काढला आणि त्यातूनच सहा एकरावर जवळपास ५ प्रकारची पिकं घेत त्यातून आर्थिक उन्नती साधली. सरकारी मदतीची कोणतीही अपेक्षा न ठेवता २०१५ ला पुरुषांचा बचत गट स्थापन झाला. त्यांनी पिकवलेली केळी जिल्ह्यातील बाजारपेठेतच पाठवतात. एका पिकावर अवलंबून न राहता या शेतकऱ्यांनी भात, कलिंगड, दूध आणि गांडुळ खत निर्मितीदेखील केली आहे.

वर्षाला जवळपास लाखभर रुपयांच्या भाताची विक्री हे शेतकरी करतात. गीर गायींपासून दूध, शेण आणि गोमूत्रापासून जीवामृत आणि गांडूळ खताची निर्मिती केली जाते. सेंद्रिय पद्धतीनं केल्या जाणाऱ्या या उत्पादनांना बाजारात मागणीदेखील चांगली आहे. आता अन्य भागातील शेतकरीदेखील एकात्मिक शेतीचा मार्ग अवलंबताना दिसत आहेत. धामणी येथील पुरुष बचत गटाने सहा एकरातील ही केळीची बाग स्वच्छ ठेवण्यावर सर्वाधिक भर दिला आहे. सुकलेली पाने बाजूला करणे, केळीची सुकलेली सोपं काढून टाकणे याचबरोबर झाडांना सेंद्रिय खतांचीच मात्रा देणे यावर सर्वाधिक भर असतो. केळीची ही स्वच्छ, सुंदर आणि नीटनेटकी लागवड पाहून कृषी अधिकाऱ्यांनीही बचत गटाचे कौतुक केले.

"पुण्याच्या बन्सुरी फाउंडेशन या संस्थेकडून त्यांच्या सीएआर फंडातून एक टक्का व्याजानं कर्ज घेतलं आणि ते शेतकऱ्यांनी अल्पावधीत फेडलंदेखील. शेतकऱ्यांची मेहनत, जिद्द आणि चिकाटी यामुळे हे शक्‍य झाले आहे. धामणी येथील पुरुष बचत गटाच्या केळी लागवडीचा हा यशस्वी प्रयोग पाहण्यासाठी जिल्ह्यातील विविध बचत गट भेट देत असतात."

- अमोल लोध, मार्गदर्शक

संपादन - स्नेहल कदम 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com