

पुण्याच्या सुप्रसिद्ध लाकडी पुलाचे वास्तूरचनाकार विष्णूपंत वीरकर यांनी या मंदिराची रचना केली आहे. मंदिराकडे पुरातत्त्व खात्याचे पूर्ण दुर्लक्ष आहे.
-पराग वडके परशुराम, parag.vadake@gmail.com
श्री देव मल्लिकार्जुन मंदिर (Mallikarjuna Temple) येथे सर्पदंश झालेल्या व्यक्तीला ग्रामदेवेतेच्या एका विशिष्ट खांबाला बांधून ठेवतात आणि नगारे वादन करतात व बाजूला तळ्यातील पाणी ठेवतात व काही कालावधीतच व्यक्तीला उतार पडतो, असे स्थानिक लोक सांगतात. फाल्गुन महिन्यात देवाचा उत्सव असतो. मंदिराला भेट देण्याचा सर्वोत्तम काळ म्हणजे गणपती ते दिवाळी या दरम्यान सर्व हिरवाई तृप्त असते आणि निसर्ग खुललेला असतो. तिथून तृप्त झालात की, थोडे मागे परत फिरायचे आणि पुढे तीन कि.मी. वर वीर गावातील एका अद्भुत निसर्गात प्रवेश करायचा. सध्याच्या भाषेत निसर्गाचे वाटर वर्ल्ड इम्याजीका.
जर मुंबईहून हायवेने गोव्याकडे प्रवास करत असाल तर चिपळूणला साधारण पाच तासात पोहचता आणि फ्रेश होऊन पुढे निघता येते. पुढे जाताना प्रवासाचा शीणवटा घालवायचा असेल आणि ''बिग बाजार'', ''इन ओर्बिट'', ''डी-मार्ट'' या मॉल संस्कृतीतून ''निसर्गाच्या मॉल'' मध्ये घुसून अधाशासारखी खरेदी करायची असेल तर सरळ चिपळूणपासून १७ किमीवर सावर्डे गाव लागले की, उजवीकडे ''वहाळ'' फाटा पकडा. हा फाटा तुम्हाला थेट निसर्गात नेऊन सोडतो. त्यातील पहिला ''निसर्ग मॉल'' म्हणजे श्री देव मल्लिकार्जुन मंदिर.
सावर्डा फाट्यापासून १५ किमी वहाळ आणि पुढे तीन किमी शिरंबे गाव (Shirambe Village) तिथे मल्लिकार्जुन मंदिर आहे. तसे मंदिर लांबून एवढे आकर्षक वाटत नाही; पण जवळ जाताच भर मार्चमध्येसुद्धा पाण्याने भरलेले कुंड दिसतात आणि हे कुंड पूर्ण चौकोनात आहे मध्यभागी, श्री देव मल्लिकार्जुन म्हणजे शंकराचे मंदिर आहे. महाराष्ट्रात जी काही मोजकी जलमंदिर आहेत त्यापैकी हे एक मंदिर आहे. कुंडाची रचना विशिष्ट पाणी साठवणुकीपर्यंत आहे. त्याच्यावर पाणी गेले की, आपोआप दुसऱ्या कुंडात पाणी जाते तिथे जनावरांना पाणी पिण्याची सोय आहे.
या मंदिरातील शिवपिंडी १४०० वर्ष जुनी असून, शिवकाळात स्वतः छत्रपती शिवरायांनी विशेष रक्कम अदा करून या मंदिराचे बांधकाम केले असे स्थानिक संदर्भ मिळतात. मंदिरातील गाभा आणि शंकराची पिंडी पूर्णतः पाण्यात असून, बाहेरील जलकुंडाशी समपातळीत आहे. मंदिराच्या सभोवताली श्री वरदान मंदिर, श्री चंडिका देवी यांची स्वतंत्र मंदिरे आहेत. श्री लक्ष्मी मल्ल्मर्दन मंदिर वीर गावात देवपाट नदी ओलांडल्यावर दोन डोंगराच्या खोबणीत मंदिर विसावलेले आहे. जणू काही निसर्गाने आपल्या अजस्त्र बाहूंनी मंदिर छातीशी धरून ठेवले आहे. मंदिराच्या प्रांगणात प्रवेश केल्यावर जांभा दगडाची कमान स्वागत करते. सभामंडप साधारण २०० चौरस फुटाचा आहे. तिथून गाभाऱ्यात साधारण तीन फूट खोल उतरले की, श्री लक्ष्मी मल्ल्मार्दानाची सुंदर मूर्ती स्वागत करत झटकन आपल्या वेगळेपणामुळे नजरबंदीचा खेळ करते.
श्री लक्ष्मी मल्ल्मर्दन म्हणजे भगवान श्रीकृष्ण. अतिशय कलात्मक अशी कोरीव काम केलेली ही मूर्ती महाराष्ट्रातील एकमेव द्वितीय ठरावी. मूर्तीसाठी पूर्ण काळा पाषाण वापरला असून, मूर्तीची उंची साधारण ५ फूट उंच असावी. एकूण सहा भागात मूर्तीचे पाषाण एकमेकावर ठेवून मूर्ती पूर्ण रूपात प्रकट केली आहे. मूर्तीच्या पायाशी १०८ शिवलिंग आहेत. मध्यभागी प्रत्यक्ष श्री लक्ष्मीमर्दन तिरक्या स्थितीत बसवलेला आहे . दोनही बाजूला जय-विजयशिल्पे आहेत. भगवान श्रीकृष्णाने ८ मल्लाचा नाश केला त्यांची माळ गळ्यात घातलेली आहे. अग्रभागी श्री देवी महालक्ष्मी, महासरस्वती व महाकाली यांच्या उग्र रूपाची एकत्रित डोक्यावर पाषाण कमान आहे. मंदिरातून नदीत उतरायला जांभ्या दगडाच्या पायऱ्या आहेत आणि बारमाही जुळी कुंड आहेत.
मूर्तीच्या कलाकुसरीवरून ही मूर्ती राष्ट्रकुट काळातील असावी, असे माझे मित्र व इतिहास संशोधक सुधांशू नाईक यांचे मत आहे. स्थानिक लोक सांगतात की, साधारण साडेचारशे वर्षापूर्वी जयगड खाडीतून एक प्रवासी जहाजातून ही मूर्ती घेऊन प्रवास करत होते आणि जहाज बुडू लागले त्यामुळे जहाजावरील सर्वात जड वस्तू म्हणून ही मूर्ती पाण्यात सोडून दिली आणि गावातील एका व्यक्तीस झालेल्या दृष्टांतानुसार मूर्ती पाण्याच्या बाहेर काढली गेली आणि वीर गावात स्थापना केली गेली.
मूर्तीचे एक वैशिष्ट्य असे की, या मूर्तीच्या पायाशी एक छोटा १० इंची खड्डा आहे. त्या खड्ड्यात आपोआप पाणी साठते. मूर्तीला कुठेही पाण्याची लिंक नाही; पण पाणी साफ करून जागा कोरडी केली तरी रात्रभरात आपोआप पाणी साठते. कदाचित दगड विशिष्ट प्रकारचा असावा. हवेतील दमटपणा शोषून घेणारा. १९४० ला मंदिराचे नूतनीकरण झाले. पुण्याच्या सुप्रसिद्ध लाकडी पुलाचे वास्तूरचनाकार विष्णूपंत वीरकर यांनी या मंदिराची रचना केली आहे. मंदिराकडे पुरातत्त्व खात्याचे पूर्ण दुर्लक्ष आहे. जर मूर्तीवर वज्रलेप चढवला तर एक सुंदर मूर्ती प्रकट होईल यात काही शंका नाही; पण दोनही मंदिरांकडे स्थानिक लोकांचे पण लक्ष नाही किंवा ही स्थाने विकसित करावीत, अशी ग्रामेच्छा पण दिसून येत नाही. गणपतीनंतर दिवाळीपर्यंत हिरवा रंग आपली सर्वोच्च शेड छटा करत असतो आणि आजूबाजूला हजारो कास पठारासारखी फुले फुललेली असतात.
(लेखक दऱ्याखोऱ्यांतून भटकंती करणारा सामाजिक कार्यकर्ता आहे.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.