चिपळूण : कोळकेवाडीच्या पाण्यामुळे महापूर नाही

समुद्राची भरती, ढगफुटी कारणीभूत
कोळकेवाडी धरण
कोळकेवाडी धरणsakal

चिपळूण: चिपळूण शहरात २२ जुलैला आलेला महापूर कोळकेवाडी धरणाच्या पाण्यामुळे आलेला नाही, हे जलसंपदा विभागाने आज पुन्हा एकदा शासनाने नेमलेल्या अभ्यासगट समितीसमोर पुराव्यासह स्पष्ट केले. सह्याद्रीच्या खोऱ्यात झालेली ढगफुटी आणि त्याचदरम्यान अरबी समुद्राला आलेली भरती हेच पुराचे मुख्य कारण असल्याचे समितीसमोर सांगण्यात आले.

कोळकेवाडी धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे चिपळुणात पूर येतो का? याचा अभ्यास करण्यासाठी शासनाने जलसंपदा विभागाचे सेवानिवृत्त मुख्य अभियंता दीपक मोडक यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यासगट समितीची नेमणूक केली आहे. या समितीची पहिली बैठक आज पोफळी येथे झाली.

‘सकाळ’ची बातमी अचूक

चिपळूणच्या महापुराचे खापर कोळकेवाडी धरणावर फोडले... याबाबतचे सविस्तर वृत्त ‘सकाळ’ने प्रसिद्ध केले. दीपक मोडक यांच्यासह समितीतील सदस्यांनी याची दखल घेतली. हे वृत्त वाचल्यावर कोळकेवाडी धरणाबाबत लोकांतील गैरसमज दूर होण्यास मदत होईल, असे दीपक मोडक म्हणाले.

कोयना प्रकल्पाच्या टप्पा १, २ आणि ४ मध्ये वीजनिर्मिती झाल्यानंतर सोडण्यात येणारे पाणी कोळकेवाडी धरणात येते. या धरणात १ टीएमसी पाणी साठवता येते. धरणाच्या भिंतीपासून २५ किलोमीटरपर्यंत पाणलोट क्षेत्र आहे. या परिसरात पडणाऱ्या पावसाचे पाणी धरणात येते. त्यामुळे धरणातील पाणीपातळी राखण्यासाठी तिसऱ्या टप्प्यातून वीजनिर्मिती करण्यात आली. तसेच कोयना धरणातील पाण्याचा समतोल राखण्यासाठी धरण सांडव्यावरून पाणी सोडले गेले, ते पाणी चिपळूणच्या दिशेने आले नाही. तिसऱ्या टप्प्यातून वीजनिर्मितीनंतर सोडण्यात येणारे पाणी ८ हजार क्युसेकपेक्षा जास्त नव्हते. त्यामुळे कोळकेवाडीच्या पाण्यामुळे चिपळुणात पूर आला हे स्पष्ट होत नाही, असे मांडण्यात आले.

कोयना धरणातील पाणी जलसंपदा विभागाकडून वीजनिर्मितीसाठी घेताना त्या पाण्याचा हिशेब द्यावा लागतो. त्याप्रमाणे जलसंपदा विभाग महानिर्मिती कंपनीकडून कर घेते. त्यामुळे वीजनिर्मिती न करता महानिर्मिती कंपनी चिपळूणच्या दिशेने पाणी सोडू शकत नाही. महानिर्मिती कंपनीकडून होणाऱ्या वीजनिर्मितीची आकडेवारी कंपनीच्या वेबसाइटवर असते. २२ जुलैचा अहवालही वेबसाइटवर आहे. त्यामध्ये फेरबदल करता येत नाही, असे महानिर्मिती कंपनीकडून सांगण्यात आले. त्यामुळे चिपळूणच्या महापुराला कोळकेवाडी धरण किंवा कोयना प्रकल्पाला जबाबदार धरणे चुकीचे असल्याचा निष्कर्ष या समितीने काढला आहे. संजीव आणेकर, किशोर रेडीज, सतीश कदम, डॉ. पाटणकर यांनी काही उपाययोजना सुचवल्या. त्यावर विचार करण्याचे आश्वासन मोडक यांनी दिले.

बैठकीला महानिर्मिती कंपनीचे मुख्य अभियंता संजय चोपडे, जलसंपदा विभागाच्या मुख्य अभियंता वैशाली नारवेकर, कार्यकारी अभियंता नितीन पोतदार, जगदीश पाटील, चिपळूण पालिकेचे मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे, जलसंपदा विभागाचे सेवानिवृत्त मुख्य अभियंता शरद जोशी, संजीव आणेराव, डॉ. प्रकाश पाटणकर, किशोर रेडीज, सतीश कदम उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com