Coronaviras : भिऊ नका मांसाहारामुळे कोरोना होत नाही...

coronaviras impact in sindudurg kokan marathi news
coronaviras impact in sindudurg kokan marathi news

रत्नागिरी : कोरोनाचा फैलाव होण्याशी मांसाहाराचा काहीही संबंध नाही. या आजाराचे घातक वेगळेपण आहे, ते त्याच्या वेगाने पसरण्यामध्ये. अर्थात, यामुळे पसरलेली घबराट अनाठायी आहे. तसेच यानिमित्ताने समाजातील अर्धवट ज्ञानाचे आणि अंधश्रद्धेचे जे काही दर्शन होते आहे, तेही खंत वाटावी, असेच आहे. यावर जागतिक आरोग्य संघटना आणि तत्सम मान्यवर स्रोतांनी दिलेल्या माहितीच्या आधारे मूलभूत वैज्ञानिक माहिती साऱ्यांपर्यंत पोहोचणे आवश्‍यक आहे, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. 

याविषयी सेवाभावी डॉक्‍टर म्हणून प्रसिद्ध असलेले व वैद्यकीय पेशाबाबत अत्यंत संवेदनशीलपणे काम करणारे डॉ. अनंत फडके यांनी सांगितले की, स्वाइन-फ्लूसारखा हा विशिष्ट प्रकारचा विषाणू आजार आहे. त्याची सुरुवात चीनमध्ये जरी प्राण्यांपासून झालेली असली, तरी आता तो जगभर पसरला आहे, तो कोरोना या आजाराच्या रुग्णांच्या खोकल्यामार्फत. आता मांसाहाराशी त्याचा काहीही संबंध उरलेला नाही. या आजाराचे घातक वेगळेपण म्हणजे, तो खूपच जास्त वेगाने पसरतो. त्यामुळे चीनमध्ये थोड्याच दिवसांत नव्वद हजार लोकांना हा आजार झाला. त्यामानाने कमी म्हणजे सुमारे तीन हजार (सुमारे 3 टक्के) रुग्ण दगावले. (देवी, घटसर्प, गोवर, स्वाइन फ्ल्‌यू यांच्या साथीमध्ये दगावणाऱ्यांची टक्केवारी यापेक्षा जास्त होती.)

लागण झाली तर काय होईल?

चीनचा अनुभव सांगतो की, समजा 100 जणांच्या शरीरात विषाणू शिरले, म्हणजेच त्यांना लागण झाली तर काय होईल? त्यापैकी 20 जणांना काहीही होणार नाही, 80 जणांना खोकला-तापाचा सौम्य आजार होऊन 7 ते 14 दिवसांत आपोआप बरे होतील, त्यातील 15 जणांना मात्र "कोरोना-न्युमोनिया' हा गंभीर आजार होईल आणि त्यापैकी तीन जण दगावतील. लहान मुले, तरुण, मधुमेह, हृदयविकार, दमा इत्यादी आजार नसलेली माणसे या आजारात सहसा दगावणार नाहीत. भारतात आता कडक उन्हामुळे या विषाणूंच्या प्रसाराला काही प्रमाणात आळा बसेल, अशी आशा आहे.

हे विषाणू तुषारांमध्ये असतात

करोनाचे विषाणू सुटे, रुग्णाच्या साध्या श्वासोच्छवासातून आपोआप पसरत नाहीत. रुग्णाच्या खोकल्यामार्गे बाहेर पडणाऱ्या तुषारांमध्ये हे विषाणू असतात. या तुषारांमार्फत या विषाणूंचा इतरांना संसर्ग होतो. खोकताना रुग्णाच्या तोंडासमोर रुमाल, मास्क नसेल, तर खोकल्याचे तुषार समोरच्या व्यक्तीच्या नाकात जाऊन, त्यामार्फत विषाणू थेट श्वासमार्गात शिरतात. हे खोकल्याचे तुषार, त्यातील विषाणू जवळपासच्या वस्तूंवर पडतात. तिथून ते इतरांच्या हाताला लागतात. तो हात नाकाला, चेहऱ्याला लागला, तर त्यातून ते श्वासमार्गात शिरतात. 

विषाणूंवर विजय मिळवण्याची वाट.. 
करोना विषाणू मारणारे औषध उपलब्ध नाही. त्यासाठी संशोधन सुरू झाले आहे. औषध सापडले, तरी त्याच्या चाचण्या होऊन बाजारात यायला काही महिने तरी लागतील. पूर ओसरण्याची वाट बघावी लागते, तसे शरीर या विषाणूंवर विजय मिळवण्याची वाट पाहावी लागते. तोपर्यंत विश्रांती, तापावर साध्या पॅरेसिटोमॉलच्या गोळ्या, खोकल्याची ढास कमी करणाऱ्या गोळ्या, गरज लागल्यास कृत्रिम श्वासाची व्यवस्था, असे उपाय आहेत. 

रिकामटेकड्यांच्या चर्चेकडे दुर्लक्ष करा 
यानिमित्ताने सोशल मीडियावर आयुर्वेदिक, होमिओपॅथीक औषधांचा किंवा इतर कोणत्याही उपचाराचा पुरस्कार होत असेल अथवा कोणी करू इच्छित असेल, तर त्याला कोणताही शास्त्रीय पाया नाही. हा पूर्णपणे नवीन आजार आहे, त्याचे विषाणू मारायला कोणाकडेही औषधे नाहीत, हे नक्की. व्हॉट्‌सऍपवरील या बाबतची रिकामटेकडी चर्चा, सल्ले याकडे दुर्लक्ष करावे, असा सल्लाही डॉक्‍टरांनी दिला आहे. 

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com