मच्छीमारांना मिळणार 'या' पॅकेजमधून भरपाई; महादेव जानकर यांची माहिती 

Package For Fisherman Mahadev Jankar Comment Sindhudurg News
Package For Fisherman Mahadev Jankar Comment Sindhudurg News

मालवण - "क्‍यार' चक्रीवादळ व अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाईसाठी मुख्यमंत्र्यांनी दहा हजार कोटीच्या पॅकेजची घोषणा केली आहे. या पॅकेजमधून शेतकऱ्यांबरोबरच कोकणातील मच्छीमार, पर्यटन व्यावसायिकांनाही नुकसान भरपाई दिली जाणार आहे.

रापणकर संघ, मत्स्य व्यवसाय सोसायट्या यांनी पत्र दिले तरी तो पंचनामा गृहीत धरावा अशा सक्त सूचना मत्स्य व्यवसायच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. कोकणातील मच्छीमारांना दिलासा देण्यास मी आलो आहे. त्यामुळे मच्छीमार, पर्यटन व्यावसायिकांना पॅकेजमधून लवकरच नुकसान भरपाई दिली जाईल, असे राज्याचे मत्स्यविकास मंत्री महादेव जानकर यांनी तारकर्ली येथे पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. 

जानकर यांनी आज तालुक्‍यातील किनारपट्टीची पाहणी करत मच्छीमार तसेच पर्यटन व्यवसायिकांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष -बाबा मोंडकर, तालुकाध्यक्ष- विजय केनवडेकर, विकी तोरसकर, महेश मांजरेकर, उल्हास तांडेल, बबलू राऊत, संदीप भोजने, विनोद भोगावकर, यांच्यासह रासपचे अन्य पदाधिकारी, सहायक मत्स्यव्यवसाय आयुक्त प्रदीप वस्त, मत्स्य व्यवसाय विभागाचे अन्य अधिकारी, जिल्हा मच्छीमार फेडरेशनचे मेघनाद धुरी, तारकर्ली पर्यटन संस्थेचे पदाधिकारी आदी उपस्थित होते. 

श्री. जानकर म्हणाले, ""किनारपट्टी भागाची पाहणी केली असता मच्छीमारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या मच्छीमारांना दिलासा देणे हे मत्स्यविकास मंत्री म्हणून माझे काम आहे. निसर्गाच्या लहरीपणाचा फटका मच्छीमारांना बसला आहे. मच्छीमारांनी यात घाबरून जाऊ नये. त्यांना शासनाकडून जास्तीत जास्त नुकसान भरपाई दिली जाईल. गेल्या तीन वर्षात साडे तीन हजार कोटीचे बजेट कोकणासाठी दिले आहे. यातील बरीच कामे सुरू आहेत काही कामांच्या निविदा निघाल्या आहेत. बऱ्याच ठिकाणी गाळ काढण्याचे कामही करायला हवे. मत्स्य व्यवसाय खात्यातील अनेक पदे रिक्त होती; मात्र येथील बरीच पदे भरण्याची कार्यवाही झाली आहे.'' 

वायरी ते देवबाग बंधाराकम रस्ता, देवबाग ते कोरजाई जेटी ही कामे येत्या काळात मार्गी लावली जाणार आहेत. 121 रापणसंघ आहेत यात 50 ते 60 कुटुंबे अवलंबून आहेत. या रापण संघातील 75 टक्के मुला-मुलींना, भूमिपूत्रांना रोजगार कसा उपलब्ध करून देता येईल? यादृष्टीने प्रयत्न केले जाणार आहेत.

मासेमारी आणि पर्यटन यांना एकत्रित आणत जर मासे कमी झाले तर पर्यटनाच्या माध्यमातून त्या कुटुंबांचा उदरनिर्वाह कसा चालेल? यासाठीचेही नियोजन केले जात आहे. कृषीचा दर्जा मत्स्य व्यवसाय विभागाला मिळाल्यास मत्स्यदुष्काळ जाहीर करणे शक्‍य होईल. कारण सद्यःस्थितीत नेमके काय नुकसान झाले हे दाखविता येत नसल्यानेच मत्स्यदुष्काळ जाहीर करता येत नाही.

हा विषय सद्यःस्थितीत प्रलंबित आहे. यात कृषीचा दर्जा मत्स्यव्यवसायला मिळाल्यास मच्छीमारांनाही अनुदान देता येणार आहे. ज्या मच्छीमारांनी बॅंकांची कर्जे घेतली त्या संबंधित बॅंकांना तीन महिने कोणतीही कार्यवाही करू नये तसेच वीज वितरणलाही शेतकरी, मच्छीमारांना त्रास न देण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत असेही ते म्हणाले. 

परराज्यातील ट्रॉलर्सची राज्यात घुसखोरी होत असून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात मासळीची लूट होत आहे. त्यामुळे ही घुसखोरी रोखण्यासाठी आणि याची माहिती मत्स्य व्यवसायच्या अधिकाऱ्यांना तत्काळ उपलब्ध होण्यासाठी ऍप विकसित केले जात आहे. हे ऍप स्थानिक पारंपरिक मच्छीमारांच्या नौकांवर बसविले जाणार आहे. यावरून परप्रांतीय ट्रॉलर्स कुठल्या भागातील आहेत याची माहिती मिळणार असून समुद्रातील संघर्ष टाळण्यास मदत मिळणार आहे. 
- महादेव जानकर  

 
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com