कोकणच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा ; लोककलांचे जतन करणाऱ्या लोककलाकाराचा पद्मश्री किताबाने गौरव

padma shri award declared for parshuram gangawane in sindhudurg
padma shri award declared for parshuram gangawane in sindhudurg

कुडाळ (सिंधुदुर्ग) : गेली ५० वर्षे आदिवासी लोककलांचे जतन व संवर्धन करणाऱ्या लोककलाकार परशुराम गंगावणे यांना भारत सरकारचा पद्मश्री किताब मिळाल्याने सिंधुदुर्गाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला.

आदिवासी लोककलांचे जतन व संवर्धन करणारे पिंगुळी गुढीपूर येथील लोककलाकार परशुराम गंगावणे यांना भारत सरकारने पद्मश्री किताब जाहीर केला. हा पुरस्कार जिल्ह्यासह पिंगुळी गावाचे भूषण आहे. प्रजासत्ताकदिनी पालकमंत्री उदय सामंत यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कुडाळ तालुक्‍यातील सांस्कृतिक लोककलांचे माहेरघर असणाऱ्या पिंगुळी गुढीपूर येथील परशुराम गंगावणे हे गेले ४५ ते ५० वर्षे आदिवासी ठाकर समाजाच्या पारंपरिक लोककला जतन व प्रसार करण्याचे काम करीत आहेत. कठीण परिस्थतीमध्ये त्यांनी ही लोककला जपून ठेवली.

ठाकर आदिवासी कला आंगण म्युझियम आर्ट गॅलरी हे जिल्ह्यातील पहिले आदिवासी लोककला संग्रहालय आहे. जे ३ मे २००६ ला सुरू झाले. हे म्युझियम त्यांनी गुरांच्या गोठ्यामध्ये सुरू केले. शिवाजी महाराजांच्या राजाश्रय लाभलेली ही कला काळाच्या ओघात नाहीशी झाली होती. ती कला जतन करण्याचे काम श्री. गंगावणे यांनी केले. या संग्रहालयात सिंधुदुर्गचा ठाकर आदिवासी समाजाचा पारंपरिक लोककला कळसूत्री बाहुल्या, चित्रकथी, चामड्याच्या बाहुल्या, पांगुळ बैल, डोना, वाद्यगोंधळ, पोथराज अशा लोककलेची मांडणी केली आहे. श्री. गंगावणे यांनी विश्राम ठाकर आदिवासी कला आंगण या चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’, व्यसनमुक्ती, स्वच्छ भारत अभियान, एड्‌स जनजागृती अशा अनेक विषयांवर कळसूत्री बाहुल्यांच्या माध्यमातून कार्यक्रम केले आहेत.

या लोककला जतन व संवर्धन करण्याचे काम पारंपरिक लोककलाकार श्री. गंगावणे व त्यांचे दोन्ही चिरंजीव एकनाथ गंगावणे व चेतन गंगावणे करीत आहेत. या लोककला जतन व संवर्धन करत असताना भारत सरकारचा सांस्कृतिक विभागामार्फत त्यांना चित्रकथी व कळसूत्री बाहुल्यांसाठी गुरू म्हणून नेमले आहे. यासाठी भारत सरकारचा गुरू - शिष्य परंपराचा योजनेअंतर्गत त्यांनी ८ कार्यशाळेतून १५० हून अधिक विद्यार्थी तयार केले आहेत. त्यांचा या प्रयत्नांना यश म्हणजे दहावीचा इतिहास या विषयात चित्रकथी आणि कळसूत्री बाहुल्या यांचा एक भाग ही आलेला आहे.

अनेक पिएचडी करणारे अभ्यासक  तसेच शाळेच्या शैक्षणिक सहली कला, आंगणला भेटी देत असतात. श्री. गंगावणे यांना महाराष्ट्र पर्यटनचा सिंधुदुर्ग पर्यटन मित्र पुरस्कार ही प्राप्त झालेला आहे. असे अनेक राज्य व इतर राज्य पुरस्कार ही त्यांना मिळाले आहेत. या संग्रहालयात आता देश-विदेशी पर्यटक भेटी देत असतात, सोबत विविध शैक्षणिक सहल सुद्धा भेटी देतात.

भारतात पर्यटक घेऊन फिरणारी रेल्वे डेक्कन ओडिसी येथील पर्यटक जिल्ह्यातील या कला आंगण येथे भेट देतात. सिंधुदुर्ग जिल्हा हा कल्चर टुरिझम म्हणून पुढे यावा, यासाठी श्री.गंगावणे ठाकर आदिवासी कला आंगणच्या माध्यमातून काम करत असतात. या ठिकाणी रहिवासी कार्यशाळा सुद्धा आयोजित केल्या जातात. ज्यामध्ये तुम्ही या कला आंगणच्या सुंदर होमस्टेला राहून ही कला शिकू शकता. पारंपारीक कोकण संस्कृती येथे कला आंगणला दाखविली जाते.

पालकमंत्र्यांकडून विशेष अभिनंदन

गंगावणे यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्याचे समजताच पालकमंत्री उदय सामंत, आमदार वैभव नाईक यांनी आज सकाळी त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, युवानेते संदेश पारकर, अतुल बंगे, विकास कुडाळकर, सरपंच निर्मला पालकर यांच्यासह ठाकर समाजाचे पदाधिकारी आदी उपस्थित होते.

"या पुरस्काराने माझ्या पिंगुळी गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. माझ्या या यशात माझे चेतन व एकनाथ या दोन्ही मुलांचे फार मोठे योगदान आहे. भारत सरकारच्या या पद्मश्री पुरस्काराने माझ्यासह माझ्या कुटुंबाच्या आनंदाला उधाण आले आहे."

- परशुराम गंगावणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com