अन्यथा असाही इंडिया कंपनीच्या विरोधात आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 नोव्हेंबर 2017

९१ कामगारांना कामावर घेण्याची मागणी ठाणे औद्योगिक न्यायालयात प्रलंबित असताना कंपनी व्यवस्थापनाने बेकायदेशीरित्या नव्याने कामगार भरती केली आहे. यापूर्वी काम करत असलेल्या कामगारांना कामावरून कमी केल्यामुळे त्यांच्या कुटूंबावर उपासमारीची वेळ आली आहे. अशा परिस्थितीत कंपनीने नवीन कामगारांची भरती करीत जुन्या कामगारांवार अन्याय केला आहे. त्यामुळे जुन्या कामगारांना न्याय मिळाला पाहिजे,
- आमदार प्रशांत ठाकूर

पनवेलः असाही इंडिया कंपनीने कामावरुन कमी केलेल्या जुन्या कामगारांना पुन्हा नोकरीत सामावून न घेतल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिला आहे.

असाही इंडिया कंपनीने 2014 साली कंपनीच्या 91 कामगारांना कामावरुन कमी केले होते. कमी केलेल्या कामगारांनी या विरोधात न्यायालयात दाद मागितल्यावर कंपनी व्यवस्थापनाने कंपनी चालवण्यास पुरेसा निधी उपलब्ध नसल्याचे कारण देत महाराष्ट्र सरकार कडून कंपनी बंद करण्याची परवानगी मिळवल्या नंतर या कामगारांनवर बेरोजगारीची कुर्हाड कोसळली होती. मात्र, कंपनीने आता पुन्हा नव्याने प्लांट उभारुन कामाला सुरवात केली आहे. शिवाय, नवीन कर्मचार्यांची भरती केली आहे. नवीन भरती केल्याने जुन्या कामगारांनवर अन्याय करण्यात आलाचे मत जुन्या कामगारांचे आहे. या कामगारांनी आमदार प्रशांत ठाकुर यांच्याकडे दाद मागीतल्याने या कामगारांना पुन्हा नोकरीत सामावून घेण्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली कामगारांनी लढा उभारला आहे. त्या अनुषंगाने आज (गुरुवार) तळोजा औद्योगिक क्षेत्रातील असाही कंपनी विरॊधात निषेध व्यक्त करण्यात आला.

यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, उपाध्यक्ष संजय पाटील, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष एकनाथ देशेकर, भाजपचे तालुका सरचिटणीस प्रल्हाद केणी, महानगरपालिकेचे स्थायी समिती सभापती अमर पाटील, कामगार नेते जितेंद घरत, यांच्यासह कार्यकर्ते, कामगार व त्यांचे कुटुंबीय मोट्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पोलिसांचा मोठा फौजफाटा सज्ज ठेवला गेला होता.

दरम्यान, नामदार रविंद्र चव्हाण, रायगडचे जिल्हाधिकारी विजय सूर्यवंशी यांनी या संदर्भात विशेष लक्ष देण्याचे आश्वासन आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिले असून, १५ दिवसात या संदर्भात बैठक होणार आहे. या बैठकीत कामगारांना न्याय मिळेल अशी अपेक्षा आमदार प्रशांत ठाकूर यांनी व्यक्त केली आहे.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: panvel news asahi India Company employee issue