लोकमान्य टिळक स्मारकाची परवड थांबणार! उदय सामंतांचे प्रयत्न | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Lokmanya Tilak

मंत्री उदय सामंत यांच्या प्रयत्नामुळे हा निधी उपलब्ध झाला आहे. विशेषबाब म्हणून पालिका फंडात निधी आला आहे. लवकरच पुरातत्व विभागाकडे तो वर्ग होणार आहे.

लोकमान्य टिळक स्मारकाची परवड थांबणार! उदय सामंतांचे प्रयत्न

रत्नागिरी: ‘स्वराज्य’ हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, असे इंग्रजांना ठणकावून सांगणार्‍या लोकमान्य टिळक यांची रविवारी (ता. १ ऑगस्ट) पुण्यतिथी. कोरोनामुळे सलग दुसऱ्यावर्षीही नियम पाळून अतिशय साधेपणाने ही पुण्यतिथी साजरी करण्यात येणार आहे. गेल्या अनेक वर्षे या स्मारकाची परवड सुरू आहे. मात्र ती थांबणार असून रखडलेल्या स्मारकाच्या विकासासाठी साडेचार कोटी रुपये मंजूर झाले आहेत. मंत्री उदय सामंत यांच्या प्रयत्नामुळे हा निधी उपलब्ध झाला आहे. विशेषबाब म्हणून पालिका फंडात निधी आला आहे. लवकरच पुरातत्व विभागाकडे तो वर्ग होणार आहे.

कोरोनामुळे राज्यातील मंदिरे, स्मारकांमध्ये प्रवेश बंदी आहे. दुसऱ्या लाटेतही हे नियम कायम असल्याने इतिहासात प्रथमच दुसऱ्यावर्षी टिळक स्मारक पर्यटकांसाठी बंद आहे. राज्य संरक्षित असलेल्या येथील लोकमान्य टिळकांच्या जन्मस्थळाची अवस्था बिकट आहे. सुस्थितीत नसलेली छतावरील कौले आता काढून ठेवली आहेत, स्मारकाचा उडालेला रंग, तुटलेले म्युरल हेच पाहायला मिळणार आहे. पुरातत्त्व विभागाने तात्पुरती रंगरंगोटी आणि स्वच्छता मोहीम केली आहे.

राज्य संरक्षित स्मारक म्हणून टिळक जन्मभूमी पुरातत्त्व खात्याने मुळ रूपात जतन करून ठेवली आहे. त्या काळचे घर जसेच्या तसे जतन करण्यात पुरातत्त्व विभागाने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. या घरावर पूर्वीचे नळे (कौले) असून आतील भागही जसाच्या तसा जतन केला आहे. आत असलेल्या मोर्‍या, जुने कोनाडे जतन केले आहेत. घरामध्ये वस्तुसंग्रहालय असून त्यात वंशावळ, दुर्मिळ फोटो, टिळकांचा चष्मा, लेखणी आदी दुर्मिळ वस्तू आहेत.

गेल्यावर्षी स्मारकाची परिस्थिती पाहून मंत्री उदय सामंत यांनी थिबापॅलेस येथे बैठक घेतली होती. यामध्ये स्मारकाचे मुळ स्वरूप जतन करीत त्याचा अधिक आकर्षित आराखडा तयार करण्याची जबाबदारी जे. जे. स्कूल ऑफ आर्टला देण्याचा निर्णय झाला होता. उदय सामंत त्याच्या पाठपुराव्याला यश आले असून टिळक स्मारकाच्या विकासासाठी शासनाने साडेचार कोटीचा निधी दिला असून तो पालिकेला प्राप्त झाला आहे. लवकरच तो पुरातत्व विभागाकडे वर्ग केला जाणार आहे. त्यामुळे अनेक वर्षांपूर्वीच या राष्ट्रपुरूषाच्या स्मारकाची परवड थाबणार आहे. कोरोनामुळे पुण्यतिथी साधेपणाने साजरी केली जाणार आहे. जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील, मंत्री उदय सामंत व अन्य अधिकारी टिळकांना अभिवादन करणार आहे.

कोरोनाची दुसरी लाट असल्याने टिळक स्मारक पर्यटकांसाठी बंदच होते. पुण्यतिथी साधेपणाने साजरी केली जाणार आहे. त्यानंतर स्मारक पर्यटनासाठी सुरू ठेवायचे की बंद हा प्रशासनाचा निर्णय आहे. मात्र स्मारकाच्या विकासासाठी साडेचार कोटी रुपये प्राप्त झाले आहेत.

- विलास वाहणे, पुरातत्त्व विभाग, सहाय्यक संचालक

टॅग्स :RatnagiriLokmanya Tilak