esakal | धक्कादायक ; शिवसेना आमदारांचा खा. सुनील तटकरे यांच्याविरोधात हक्कभंग 
sakal

बोलून बातमी शोधा

shivsena sena mla yogesh kadam files privilege motion against mp sunil tatkare

भूमीपुजनाच्या पाटीवर माझे नाव न टाकता खासदार महोदयांनी राष्ट्रवादी पक्षाचाच भूमीपूजन कार्यक्रम केला आहे

धक्कादायक ; शिवसेना आमदारांचा खा. सुनील तटकरे यांच्याविरोधात हक्कभंग 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

दापोली : रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनील तटकरे हे दापोली विधानसभा मतदारसंघात होणार्‍या विकासकामांच्या भूमीपुजनाला निमंत्रण देत नाहीत तसेच ते विश्‍वासात न घेता कार्यक्रम करत असल्याने दापोली विधानसभा मतदासंघाचे आ. योगेश कदम यांनी खा. सुनील तटकरे यांच्या विरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव विधानसभा अध्यक्षांकडे दिला आहे.

आ. योगेश कदम म्हणतात की, खा. सुनील तटकरे हे सातत्याने माझ्या दापोली विधानसभा मतदारसंघात मला डावलून विविध शासकीय कार्यक्रम घेत आहेत. 12 ऑक्टोबर रोजी मला निमंत्रण न देता त्यांनी दापोली येथील पंचायत समीती सभागृहात शासकीय अधिकार्‍यांसोबत आढावा बैठक घेतली.  रायगड रत्नागिरी जिल्हे जोडणारा आंबेत पूल कमकुवत झाल्यामुळे या पुलावरून जड वाहने नेण्यास मनाई करण्यात आली असल्याने या पुलाच्या पुर्नंबांधणीसाठी आपण प्रयत्न केले तर राज्यमंत्री आदिती तटकरे यांनीही संबंधित अधिकार्‍यांच्या या पुलासंदर्भात बैठका घेतल्या होत्या.

आंबेत पुलावरून जड वाहने नेण्यास परवानगी नसल्याने ही वाहने महाड मार्गे न्यावी लागत असल्याने वेळ व आर्थिक भुर्दंड वाहनचालकांना सोसावा लागतो त्यामुळे म्हाप्रळ ते आंबेत दरम्यान फेरी बोट सेवा सुरू करण्यात येणार असून या दोन्ही बाजूला फेरीबोट लावण्यासाठी जेटीचे बांधकाम करण्यासाठी  शासनाकडून निधीही मंजूर झाला असून या कामाचा कार्यादेश (वर्क ऑर्डर) देण्याअगोदरच खा. सुनील तटकरे यांनी 11 ऑक्टोबर रोजी त्यांचे चिरंजीव आ. अनिकेत तटकरे व माजी आमदार संजय कदम यांना घेऊन या कामाचे भूमीपूजन केले. या कार्यक्रमाचे मला निमंत्रणही देण्यात आले नाही तसेच या भूमीपुजनाच्या पाटीवर माझे नाव न टाकता खासदार महोदयांनी राष्ट्रवादी पक्षाचाच भूमीपूजन कार्यक्रम केला आहे. 

ही बाब अतिशय गंभीर असून माझ्या हक्कावर गदा आणण्याचे काम सातत्याने खा. सुनील तटकरे करत आहेत. त्यामुळे नाइलाजाने आपण 20 ऑक्टोबर रोजी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे हक्कभंग प्रस्ताव दाखल केला आहे व खा. सुनील तटकरे यांच्यावर पुढील योग्य कारवाई करण्याची विनंती केली असल्याची माहिती आ. योगेश कदम यांनी दिली आहे. 
या सर्व प्रकारामुळे आता महाविकास आघाडीतच बिघाडी होण्याची शक्यता आहे. आता दोन्ही पक्षाचे नेते या संदर्भात कोणती भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हे पण वाचा - इतिहासात प्रथमच जोतिबाचा जागर झाला भाविकांविना

12 ऑक्टोबर रोजी दापोली पंचायत समितीत येथे आढावा बैठकीसाठी आलेल्या खा. सुनील तटकरे यांना आ. योगेश कदम या बैठकीला उपस्थित का नाहीत अशी विचारणा केली असता ते पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे ते या बैठकीला आले नसल्याचे खा. तटकरे यांनी सांगितले होते. तसेच जिल्हा पातळीवर तसेच स्थानिक पातळीवर तिन्ही राजकीय पक्षांमध्ये समन्वय होईल या दृष्टीने आपला प्रयत्न राहणार आहे. तिन्ही पक्षाच्या लोकप्रतिनिधींना तसेच पक्षाच्या पदाधिकार्‍यांना विश्‍वासात घेत स्थानिक पातळीवर तसेच ग्रामपातळीवर कान कसे करायचे हे येत्या काही दिवसात ठरविण्यात येईल अशी माहिती खा. सुनील तटकरे यांनी तेव्हा दिली होती.

हे पण वाचासरस्वती स्तवन रुपात श्री अंबाबाईची पूजा 

संपादन - धनाजी सुर्वे