esakal | सिंधुदुर्गच्या पाऊलखुणा; दुर्गाबाईंनी दिला निपाणकरांना शह
sakal

बोलून बातमी शोधा

सिंधुदुर्गच्या पाऊलखुणा; दुर्गाबाईंनी दिला निपाणकरांना शह

सिंधुदुर्गच्या पाऊलखुणा; दुर्गाबाईंनी दिला निपाणकरांना शह

sakal_logo
By
शिवप्रसाद देसाई

सावंतवाडी : लक्ष्मीबाईंच्या पश्‍चात तिसरे खेमसावंत अर्थात राजश्रींच्या द्वितीय पत्नी दुर्गाबाई यांनी राज्याची धुरा सांभाळली. त्यांनी अत्यंत मुत्सद्दी पद्धतीने परिस्थिती हाताळत विखुरलेल्या सावंतवाडीच्या सैनिकी ताकदीला एकत्र केले. यांच्या जोरावर शिस्तबद्ध आखणी करत सिदोजीराव ऊर्फ आपासाहेब निंबाळकर निपाणकर यांच्या सैन्याला सावंतवाडीतून पळवून लावले; मात्र पुढे हेच सरदार स्वैर वागू लागल्याने त्यांच्या समुद्रातील चाचेगिरीचा इंग्रजांना त्रास होवू लागला. यातून इंग्रजांचा पुन्हा सक्रीय हस्तक्षेप सुरू झाला.

लक्ष्मीबाईच्या निधनानंतर राजश्रींच्या द्वितीय पत्नी दुर्गाबाई राज्यकारभार पाहू लागल्या. त्या धुर्त, मुत्सद्दी आणि न्यायी होत्या. त्या काळात इंग्रज अंमलदारांनीही त्यांच्या कारभाराची तारीफ केल्याचे दाखले मिळतात. सत्ता हातात घेतल्यावर त्यांनी सगळ्यात आधी आपल्या सत्तेचे एकत्रीकरण केले. करवीरकरांच्या हल्ल्यामुळे तसेच अंतर्गत संघर्षामुळे सरदार संभाजी गोविंद सावंत, चंद्रोबा सुभेदार आदी सावंतवाडीच्या बाहेर जावून राहत होते. त्यांना त्यांनी सावंतवाडीत आणले. त्यांना एकत्र येण्याचे आवाहन केले. परस्परामधील द्वेष भावना नाहीशी केली. त्यामुळे संस्थानच्या सैन्यात नवचैतन्य आले.

यानंतर निपाणकरांचा सरदार आपाजी सुबराव राणे यांचा अंमल हटवण्याची योजना आखण्यात आली. सगळ्यात आधी चंद्रोबा सुभेदार यांनी आपली काही फौज हनुमंतगडावर पाठवली. तेथे आपाजी याने अंमल बसवला होता. चंद्रोबा यांच्या सैन्याने हनुमंतगडाला वेढा दिला. हे वृत्त समजताच आपाजी सावंतवाडीतील बहुतेक सैन्य घेऊन फुकेरीच्या दिशेने निघाला. ही संधी हेरून चंद्रोबा यांनी उर्वरीत सैन्य सावंतवाडीत घुसवले. तिथे आपाजीची तुटपुंजी फौज होती. तिला पराभूत करून सावंतवाडी कोटाला पडलेला वेढा मोडून काढला. हा कोट सावंतवाडीकरांच्या ताब्यात आला. यानंतर चंद्रोबाच्या फौजेने आपाजीच्या सैन्याला फुकेरीच्या दुर्गम अशा घाटीत गाठून घेरले. अखेर एप्रिल १८१० मध्ये आपाजी सावंतवाडीकरांना शरण आला. यानंतर इतर सरदारांच्या मदतीने बांद्याचा कोट व निपाणकरांच्या ताब्यात असलेली इतर ठाणी सावंतवाडीकरांनी ताब्यात घेतली. पुढच्या एक-दीड महिन्यातच पावसाळा सुरू होण्याआधी निपाणकरांच्या सैन्याला सावंतवाडीतून बाहेर काढले. या मोहिमेनंतर दुर्गाबाईंनी पोर्तुगिजांशीही राजकीय संपर्क ठेवला.

हेही वाचा: MPSC च्या मुद्द्यावरुन संभाजीराजेंची राज्य सरकारला विनंती

निपाणकरांचे संकट टळले असले तरी राजगादीचा पेच मात्र कायम होताच. भाऊसाहेबांची हत्या झाल्यानंतर या गादीला कोण मालक नव्हता. तो असावा असा निर्णय इतर सरदारांच्या मताने दुर्गाबाईंनी घेतला. त्या क्षणी गादीचे वारस होवू शकतील, असे सावंत भोसले वंशात फोंड सावंत हेच होते; मात्र ते महाडमध्ये पळून गेले होते. दुर्गाबाईनी आपले सरदार चंद्रोबा सुभेदार आणि बाबुराव राणे यांच्यावर त्यांना परत सावंतवाडीत आणण्याची जबाबदारी सोपवली. त्यांनी त्यांची समजूत काढून सावंतवाडीत आणले. फोंड सावंत यांनी मागील सगळ्या गोष्टी विसरून दुर्गाबाईंशी सलोख्याने वागण्याचे कबुल केले. यानंतर फोंड सावंतांना गादीवर बसवून दुर्गाबाई राज्यकारभार पाहू लागल्या.

दुर्गाबाईंनी संस्थानच्या किल्ल्यांची व्यवस्था लावण्याच्या दृष्टीने पावले उचलली. विविध महत्त्वाच्या किल्ल्यावर किल्लेदार नियुक्त केले. किल्ल्याच्या खर्चासाठी लगतच्या गावामधून वसुलीची व्यवस्था तयार करून दिली. बांदा कोटावर चंद्रोबा सुभेदार, निवती किल्ल्यांवर बामणो नाईक रेडीच्या यशवंतगडावर संभाजी गोविंद, आंबोलीच्या महादेवगडावर फोंड सावंत तांबुळकर, कुडाळ कोटावर कुडाळकर सावंत यांची नेमणूक केली. ही व्यवस्था काही दिवस नीट चालली. या किल्लेदारांनी खर्चासाठी नेमून दिलेल्या ठराविक गावातील करच वसूल करणे अपेक्षीत होते; मात्र नंतर यातील काही जण नेमणुकीबाहेरही वसुली करू लागले. यातून किल्लेदार झालेल्या सरदारामध्येही आपापसात कलह सुरू झाले. यातही चंद्रोबा सुभेदार, बामणो नाईक आणि संभाजी गोविंद यांच्या प्रांतात अधिकच गोंधळ सुरू झाला. यातून तिन्ही किल्लेदार एकमेकांविरोधात दुर्गा बाईंकडे तक्रार करू लागले; पण प्रत्येकाची कमी-जास्त चूक असल्याने यातून निर्णय काही होईना.

सगळ्यात मोठा प्रश्‍न समुद्रातील स्वैर चाचेगिरीमुळे उभा राहिला. बामणो नाईक आणि संभाजी गोविंद हे किनारी किल्ल्यांवर नियुक्त होते. त्यांनी समुद्रात जोरात चाचेगिरी सुरू केली. याचा मुंबईतून ये-जा करणाऱ्या इंग्रजांच्या जहाजांना खूप त्रास होवू लागला. याच्या तक्रारी मुंबईच्या इंग्रज सरकारकडे वाढू लागल्या. हा त्रास मुळापासूनच नाहीसा करण्याचा निर्णय इंग्रजांनी घेतला. यासाठी सावंतवाडीकरांशी बोलून याचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी गोव्यातील इंग्रजांचे वकील कॅप्टन स्कुईलर यांच्यावर देण्यात आली. त्याने बांदा कोटाचे किल्लेदार चंद्रोबा सुभेदार यांना मध्यस्त करत सावंतवाडीकरांशी संपर्क साधून तह करण्याचा पर्याय समोर ठेवला. त्या काळात इंग्रजांचा दबदबा वाढला होता. सावंतवाडीकर याला तयार झाले. ३ ऑक्टोबर १८१२ मध्ये मडूरा येथे या दोन्ही पक्षात तह झाला.

हेही वाचा: ‘जरंडेश्‍वर’वर ‘ईडी’ला पाय ठेवू देणार नाही; आमदार शिंदेंचा इशारा

यावेळी फोंड सावंत स्वतः उपस्थित होते. यात असे ठरले, की चाचेगिरी बंद करण्यासाठी सावंतवाडीकरांनी वेंगुर्ल्याचा कोट, तिथला तोफखाना, बंदर यासह संपूर्ण अधिकार इंग्रजांना द्यावे. संस्थानच्या आरमारातील सर्व लढावू जहाजे इंग्रजांच्या स्वाधिन करावी. कोणतेही गलबत इंग्रजांनी नियुक्त अंमलदारांनी तपासल्याशिवाय निवती बंदरातून पुढे जावू देवू नये. यासाठी इंग्रज अमलदारांना त्याठिकाणी काही फौज ठेवल्यास परवानगी द्यावी. इतके करूनही सावंतवाडीकराशी संबंधित कोणी चाचेगिरी केली तर रेडी व निवती हे किल्ले इंग्रजांच्या स्वाधिन करावे असे ठरले. गादीचे मालक असलेले फोंड सावंत या तहानंतर काही कामासाठी वालावल येथे गेले होते. ते तेथे आजारी पडले. तिथून परतत असताना २७ ऑक्टोबर १८१२ला वाटेत आकेरी येथे त्यांचे निधन झाले. त्यावेळी ते अवघे ३२ वर्षांचे होते. त्यांच्यावर सावंतवाडीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यानंतर पुन्हा राजगादी रिकामी झाली.

फोंडा सावंतांना दोन बायका होत्या. ज्येष्ठ पत्नी पार्वतीबाई या लक्ष्मनराव शिंदे सेना खासकिल तोरगलकर यांच्या कन्या. त्यांचा मुलगा खेम सावंत उर्फ बापूसाहेब यांचा जन्म २६ मार्च १८०५ला पेडणे महालात झाला. पुढे काही दिवसांनी पार्वतीबाई मुलाला घेऊन माहेरी गेल्या. तिथेच काही कारणाने त्यांचा मृत्यू झाला. खेम सावंत त्यानंतरही सावंतवाडीत न येता तिथेच राहत होते. पार्वतीबाईच्या निधनानंतर फोंड सावंत यांनी १८०७ मध्ये नरसिंगराव शिंदे नेसरीकर यांची मोठी बहिण कृष्णाबाई यांच्याबरोबर नेसरी (जि. कोल्हापूर) येथे विवाह केला. त्यांच्यापासून त्यांना १८११ मध्ये पुत्र झाला. त्याचे नाव नार सावंत उर्फ नानासाहेब असे होते.

फोंड सावंत यांच्या निधनामुळे गादीचा नवा वारस नेमण्याच्या हालचाली सुरू झाल्या. खेम सावंत उर्फ बापूसाहेब यांना याआधी निपाणकर यांच्या मदतीने गादीचा वारस करण्याचा प्रयत्न झाला होता; पण तो फारसा यशस्वी झाला नव्हता. दुर्गाबाईंनी खेम सावंत यांना सावंतवाडीत आणले आणि गादीवर बसवले. यावेळी ते अवघे आठ वर्षांचे होते. यानंतर दुर्गाबाई पुन्हा पूर्वीप्रमाणे कारभार पाहू लागल्या.

(निपाणकर यांना शह दिल्यानंतर दुर्गाबाईंनी गोव्याच्या पोर्तुगिजांशीही संपर्क साधला होता. त्याबाबतची पत्र गोव्याच्या पुराभिलेख संग्रहालयात उपलब्ध आहेत. ही भाषांतरीत केलेली पत्रे सोबत देत आहोत.)

हेही वाचा: 'राजकीय अस्तित्व संपवण्याच्या धमकीला घाबरून घरी बसणार नाही'

कुडाळ, दि. २ मे १८१०

श्रेष्ठतम, महाकुलीन सरसेनापती,

उज्वल श्री बेर्नाद द लोरेना

काऊंट ऑफ सारझेदास व्हाईसरॉय व

पोर्तुगीज इंडियाचे गोवा बंदरातील

कॅप्टन जनरल

आपणास अढळ सुख लाभो!

मी दुर्गाबाई भोसले, कुडाळ व तदनुलगिक, प्रांतांची सरदेसाई, आपणास अनेकदा प्रणाम करून आम्हा उभयतात वसत असलेली मैत्री वृद्धींगत होण्यासाठी आपणांकडून कुशल वृत्त यावे, अशी इच्छा बाळगीत आहे. निपाणीकरांनी व्यापलेले माझे कोट व किल्ले त्यांनी खाली केले असून त्यांचे संरक्षण माझ्या सैन्याकडून होत आहे. या राज्याचे आपण रक्षणकर्ते असल्याने ही बातमी आपणांस कळवित आहे व नेहमीप्रमाणे आपल्या मैत्रीची अपेक्षा बाळगतो. आमच्यासाठी दहा पिंपे दारू व दोन खंडी शिसे पाठविण्याचे हुकूम कृपया द्यावे. ही माझी गरज पुरविण्यास आपण काकू करणार नाही अशी खात्री आहे.

हे पत्र २६ रबिलावल (२ मे १८१०) रोजी लिहिण्यात आले.

विशेष लिहीत नाही.

दि. ४ मे १८१६ रोजी या पत्राचे भाषांतर करण्यात आले.

- सखाराम नारायण वाघ, सरकारी दुभाषा

शेरा ः दि. ७ सप्टेंबर १८१० रोजी उत्तर लिहिले.

गोवा दि. ७ मे १८१०

श्रेष्ठ व थोर दुर्गाबाई भोसले,

कुडाळ व तदनुलगिक प्रांतांची सरदेसाई यांस

आमची मैत्री अढळ राहो!

आपल्या प्रांतांवर आपण संपूर्ण ताबा मिळविला असल्याची आपण कळविलेली बातमी वाचून फार संतोष झाला. परमेश्‍वर आपणास सुखांत ठेवो अशी प्रार्थना करतो. आपल्या पत्राच्या अखेरीस लिहिलेल्या मजुकराबद्दल बारदेश प्रांतांचे प्रमुख ब्रिगेडियर मानुयल गुदिन्यू द मीर यांना हुकूम देण्यात आला असून त्याप्रमाणे तत्संबंधी त्यांच्याकडून तत्काळ व्यवस्था होईल. कोणत्याही प्रसंगी न कचरता राज्यसंरक्षणाच्याबाबतींत योग्य ती पावले उचलून कार्यवाही करीत राहावे, अशी थोर सरदेसाई बाईसाहेबांना मी शिफारस करीत आहे. विशेष लिहीत नाही, परमेश्‍वराची कृपा थोर सरदेसाई बाईसाहेबांवर राहो!

गोवा दि. ७ मे १८१०

काउंट ऑफ सारझेदाश

असे होते निपाणकर

सावंतवाडीवरील करवीरकरांचे संकट दूर करण्यासाठी असलेले व पुढे इथेच ताबा मिळवण्याचा प्रयत्न केलेले शिदोजीराव नाईक निंबाळकर-निपाणकर हे आधुनिक निपाणीचे (कर्नाटक) जनक मानले जातात. त्यांची तिथे श्रीमंत सिदोजीराव ऊर्फ आपासाहेब देसाई निपाणकर नाईक निंबाळकर, सरलष्कर अशी ओळख आहे. त्यांचा वाडा आजही निपाणीत असून त्यांचे वंशज येथे राहतात. निपाणीचा किल्ला या नावाने हा वाडा ओळखला जातो. सिदोजीराव यांच्या पराक्रमाच्या गाथा आजही तेथे सांगितल्या जातात.

loading image