राष्ट्रवादीचे नाना मयेकर यांचे कोल्हापुरात निधन

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 3 October 2020

नाना मयेकर यांना कोरोनाची बाधा झाल्याने गेले चार दिवस शासकीय रुग्णालयात उपचार घेत होते.

रत्नागिरी : राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष आणि मोहिनी-मुरारी शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष नाना ऊर्फ दिलीप मुरारी मयेकर (वय ६०) यांचे कोल्हापूर येथे निधन झाले. त्यांच्या अकाली निधनामुळे राजकीय, सहकार, क्रीडा आणि शैक्षणिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली. अजातशत्रू व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुलगे, भाऊ असा परिवार आहे.

हेही वाचा - भारीच की : गच्चीवरच पिकवला साडेसात किलोचा भोपळा आणि चार किलोची काकडी 

नाना मयेकर यांना कोरोनाची बाधा झाल्याने गेले चार दिवस शासकीय रुग्णालयात उपचार घेत होते. अचानक त्यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना काल रात्री कोल्हापूरला हलविण्यात आले. कोल्हापूर येथील डायमंड हॉस्पिटलमध्ये दाखल केले; मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. नाना मयेकर यांनी विविध क्षेत्रांमध्ये चांगले काम केल्याने त्यांचे नाव होते. त्यांचा जनसंपर्कही दांडगा होता. नाना मयेकर हे राष्ट्रवादीचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांचे समर्थक मानले जात.

१९९९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर नाना मयेकर यांनी रत्नागिरीचे तालुकाध्यक्षपद स्वीकारून संपूर्ण तालुका राष्ट्रवादीमय केला होता. त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसला २००४ मध्ये विधानसभेमध्ये भाजपच्या मतदारसंघात यश मिळाले होते; मात्र त्यानंतर पक्षात अनेक घडामोडी झाल्या आणि नाना यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर ते काँग्रेसमध्येही तालुकाध्यक्ष म्हणून काही काळ कार्यरत होते. मध्यंतरी काही काळ ते राजकारणात फारसे सक्रिय नव्हते.

हेही वाचा -  पुरुषांच्या बचत गटांंनी पिकवली सहा एकरांत साठ टन केळी 

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या माध्यमातून सहकार क्षेत्रातही त्यांनी चांगले काम केले. त्यातूनही ते अलिप्त झाले; मात्र या काळात त्यांनी आपल्या शैक्षणिक संस्थेकडे एकमार्गी लक्ष देऊन ती अधिक सुदृढ केली. क्रीडा क्षेत्रामध्येही त्यांना विलक्षण रस होता. कबड्डी, खो-खो खेळाला वेगळी उंची देण्याचे काम त्यांनी केले. कोकणातील पहिल्या प्रो कबड्डीचे आयोजन त्यांनी केले होते. नुकताच त्यांनी स्वगृही प्रवेश करून पुन्हा राष्ट्रवादी तालुकाध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली होती. मोहिनी मुरारी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून मालगुंड आणि परिसरातील अनेक मुलांना शिक्षणाची संधी दिली होती.

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: tehsil chief of rashtravadi nana mayekar dead yesterday cause corona positive from ratnagiri