Konkan news
Konkan newsesakal

Konkan News : दादा, बापू, मॅडम तिघांचा अपूर्णांक

गावात नवीन असल्यामुळे माणसे, त्यांचे स्वभाव, आर्थिक परिस्थिती, संभाव्य ग्राहक असू शकेल का? असा कोणताच अंदाज नव्हता.
Summary

दबक्या आवाजात कोणीतरी दुसरा पुरुष काहीतरी पहिल्या आवाजाशी बोलला असावा, असं वाटलं आणि परत एकदा शांतता पसरली.

-राजा बर्वे, परशुराम

आमची बँकेची शाखा त्या गावात नवीनच उघडली होती आणि माझी कॅशियर म्हणून तिथे बदली झाली होती. नव्या शाखेत जास्तीत जास्त खाती उघडून घ्यावीत, अशा सूचना ऑफिसकडून आल्यामुळे आणि त्या काळात आमचं वय तिशीच्या आत असल्यामुळे आम्ही उत्साहात कामाला लागलो होतो. गावात नवीन असल्यामुळे माणसे, त्यांचे स्वभाव, आर्थिक परिस्थिती, संभाव्य ग्राहक असू शकेल का? असा कोणताच अंदाज नव्हता. त्यामुळे एकेका घरात जायचे, बँकेचे मार्केटिंग (Bank Marketing) करायचे आणि बचत मुदत खाती उघडून घ्यायची, असे हे अभियान सुरू होते. दुपारी आर्थिक व्यवहार त्या काळी होत असत. ते संपले की, रोज एक-दोन तास आम्ही असे रोज गावभर फिरत असू. या माध्यमातूनच आज मी घराचा दरवाजा ठोठावला होता...

Konkan news
कोकणातले रहस्यमय कोळसुंदे

‘बापू, माझ्या दुपारच्या गोळ्या काढून ठेवल्यास का?’आतून आलेला थोडा खर्जातला वृद्ध, पुरुषी आवाज आला आणि ओटीवर कोणी बाहेर येईल, अशी वाट बघत बसलेला मी जरा दचकलोच. दरवाजा बराच वेळ खटखटावून त्या घरात आणि ओटीवर कोणतीच चाहूल लागत नव्हती की, कोणी बाहेरदेखील माझी दखल घ्यायला येत नव्हतं. त्यामुळे मी जरासा वैतागलोच होतो. त्यानंतर आतून फडताळावरून काहीतरी पडल्याचा एकदा आवाज आला. दबक्या आवाजात कोणीतरी दुसरा पुरुष काहीतरी पहिल्या आवाजाशी बोलला असावा, असं वाटलं आणि परत एकदा शांतता पसरली. ५ ते १० मिनिटांनी सुमारे पासष्ठी पार झालेले गृहस्थ आतल्या अंधाऱ्या माजघरातून सावकाश चालत बाहेर आले.

बहुतेक हे ते ''बापू'' असावेत असा अंदाज करून मी ‘नमस्कार बापू, मी बँक ऑफ इंडियातून (Bank of India) तुम्हाला भेटायला आलोय. दादा आणि मॅडम आहेत ना घरात?’असा प्रस्तावनेचा प्रश्न आणि आरंभ मी केला. त्या घरात फक्त तीन अविवाहित वृद्ध भावंडे राहतात, इतक्याच जुजबी माहितीवर मी प्रस्तावना केली होती. माझा अंदाज बरोबर होता. ते बापूच होते. ते माझ्या शेजारी बाकावर येऊन बसले. घरात शिरल्यापासून एक उग्र असा वाईट दर्प त्या घरात जाणवत होता. तो बापू शेजारी आल्यावर अजून तीव्र झाला. पुढच्या घरी जावं का, अशा विचारात असतानाच आतून हळूहळू ''दादा'' बाहेर आले. अनेक वर्षे आजारी असल्यासारखे ते दिसत होते. ते ओटीवर येतात न येतात तोच बाहेरून एक पन्नास-बावन्न वयाच्या बाई पायरी चढून वर आल्या.

Konkan news
Health News : डोकेदुखीचे तब्बल 150 प्रकार असू शकतात; 17 कोटी लोकं या आजाराने त्रस्त

ती बहुधा हीच तीन भावंडे असावीत, असा अंदाज बांधून मी अधिकच्या प्रस्तावानेकडे वळणार तोच, ‘बापू, भडव्या, तुला अक्कल कधी येणार रे? औषधे काढलीस आणि डबा उघडाच ठेवलास. माझ्या लाथेने आता कुठे उडालाय बघ आणि ठेवून दे ती सगळी परत नीट डब्यात आणि हे कोण आलेत आपल्याकडे? काय काम आहे विचार आणि वाटेला लाव.’...अरे देवा!! कुठल्या घरात आणि माणसांकडे मी आलो, असं क्षणभर वाटून गेलं इतक्यात, ‘अरे बापू, त्यांना पाणी दिलंस का?’असा मॅडमचा प्रेमळ प्रश्न आला तरी त्या घरात पाणीच काय हवासुद्धा घेऊ नये इतका मी त्या उग्र वासाने बेचैन झालो होतो.

दुसरे बापू, वयाच्या मानाने अधिक वृद्ध दिसणारे, गळ्यात मफलर, कानटोपी, जीर्ण स्वेटर, पंचा, दोरा गळ्यात अडकवून पोटावर लोळणारा चष्मा, संबंध अंगावर चर्मरोगाने ठाण मांडलेले, पायापर्यंत गजकर्णाने वेढून पायात जणू खरखरीत पायमोजे घातल्याचा भास, वाढलेल्या मिशांच्या आडून चेहऱ्यावर एक ओशाळे हसू. त्यांचं पूर्ण आयुष्य हे कायम गावात राहून बागायत बघण्यात दिशाहीन सरकून गेलेले असेच. तिसऱ्या मॅडम, तीन भावंडांत थोड्याशा उजव्या वाटाव्यात अशा बहुधा व्हफा होऊन शिक्षिका झालेल्या. निवृत्तीला अद्याप पाच-सात वर्षे असली तरी वय साठीपार असावे, अशा दिसायच्या. गळ्यात तुळशीची माळ, दोन भुवयांमध्ये गोल काळे कुंकू, मनगटांपर्यंत लांब बाह्यांचा ब्लाऊज, गोल साडी, गालावर वांगाचे काळे डाग, त्यांचा सोवळे ओवळ्याचा प्रचंड अतिरेक. शाळेत निघाल्या की, ऋतू कुठलाही असला तरी एक जुनी छत्री उघडलेली.

Konkan news
Business : कोणताही 'उद्योग' घाईघाईने नाही तर संयमाने, सातत्याने करायचा असतो; यासाठी काय करावं लागेल?

बगलेत काही वह्या, समोरून कोणी येताना दिसलं की, हातातल्या पंचपात्रीमधून तुळशीपत्राने ''अपवित्र पवित्रो वा,'' असं पुटपुटत स्वतःवर, समोर रस्त्यावर आणि इकडेतिकडे पाणी शिंपत त्या शाळेत जात. त्यांच्या बाजूनेच शाळेतली मुले हे पाहून फिदीफिदी हसत असत. दादा आणि मॅडम कधीही गावात कोणत्या कार्यक्रमात दिसली नाहीत. दादा क्षयी त्यामुळे कायम अंथरूणावर. मॅडमचे समाजजीवन फक्त घरातून शाळेत आणि शाळेतून घरी इतकेच. बापू मात्र वाण सामान, पोस्ट, बँक, भाजी, औषधे अशाकरिता बाहेर दिसत.

एक दिवस बापू बँकेत उगवले. माझ्या कॅश केबिनच्या बाहेर ओठांगून "राजाभाऊ, जरा एक काम होतं..दादाचा हयातीचा दाखला भरायचा होता. तुम्हाला माहित आहे की, तो बाहेर पडतच नाही. दुपारी याल का जरा फॉर्म घेऊन? बापूंचा तोच ओशाळला स्वर. बापू, शिपायाला पाठवतो. तुम्ही घरी गेलात तरी चालेल. मला त्या घरात परत जाणं हेच संकट वाटत होतं. "नको हो, तुम्हीच या ना राजाभाऊ. दादा खूप त्रास देतो, तो शिपायाला बघणार नाही. नको नको त्या शिव्यासुद्धा देईल". मी बरं म्हटलं आणि दुपारी गेलो. या वेळी मी आमंत्रित असून देखील तीच नीरव शांतता तोच अंधार. वैतागून बापू, अशी मोठ्याने हाक मारली. "या, आतच या, दादा आत आहेत".. त्या खूप काही पोटात दडवून ठेवलेल्या अंधारातून मी हळूहळू आत गेलो.

Konkan news
कोकणात सायकलस्वार पर्यटक; टी शर्ट्स, ट्रॅक पॅन्टस, जॅकेट्सनी सायकलिंगला आणला ग्लॅमरस लूक

समोर स्वयंपाकघरातून थोडी उजेडाची येणारी तिरीप अडवून मॅडम बसल्या होत्या. डावीकडे एक शिसवी प्रशस्त पलंग होता आणि त्यावर दादा दिसतदेखील नव्हते. हातातल्या हयात दाखल्याची सुरनळी मी उघडली आणि कधी एकदा दादांची सही होईल असं मला झालं होतं. अचानक मॅडम पुढे आल्या आणि हातातल्या पंचपात्रीतून माझ्या अंगावर त्यांनी पाणी उडवले.."साहेब, वाईट वाटून घेऊ नका; पण बँकेत किती लोक, विटाळश्या बायका रोज येत असतील ना म्हणून थोडी शुद्धी हो ही, दुसरं काय? मला काय बोलावे तेच कळेना. इतक्यात, "बापू, भडव्या साहेब आला, मला आधी का नाही सांगितलंस, मी नुसता लंगोटीवर असतो तुला माहीत आहे ना? मला कपड्याचा दाहदेखील सहन होत नाही, हे कळतंय ना तुला?..दादांच्या अंगावर पातळ पांघरूण होते हे माझे नशीबच.. बापूंची धांदल उडाली.

ओशाळल्या नजरेने एकदा दादा, एकदा मॅडम आणि एकदा माझ्याकडे बघत बापू दादांची नाडीचड्डी आणायला आत कुठेतरी गडप झाले आणि मी हातात फॉर्म घेऊन उभा.. कसाबसा तो उपद्व्याप उरकून बाहेर पडलो. कोणे एकेकाळी मुंबईकर नोकरदार म्हणून दादांनी भाऊंना केलेली मदत, त्याचे भाऊंनी बाळगलेले सततचे ओशाळेपणाचे ओझे, दादांचा फटकळ आणि शिवराळ स्वभाव, मॅडमचा मंत्रचळेपणा, जन्मापासून अविवाहित राहिलेले हे भावंडांचे त्रिकुट आणि त्यांनी त्यांच्या आयुष्याच्या मोठ्या पटावर हे सारं कसं निभावून नेलं असेल, हा विचारही मला नेहमी कष्टप्रद वाटतो.

(लेखक कोकणवर मनस्वी प्रेम करणारा व कोकण टिपणारा आहे.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com