
नेहाची ‘स्पीड बाईक रायडिंग’ मध्ये बाजी
लोणावळा येथे आयोजन ; पुरुष स्पर्धकांमध्ये एकटी महिला
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ४ः स्पर्धेच्या युगात आज महिला कोणत्याही क्षेत्रात मागे नाहीत, हे संगमेश्वर-साखरपा येथील नेहा सोहनी (वय २७) या तरुणीने दाखवून दिले आहे. धोकादायक अशा स्पीड बाईक रायडिंग स्पर्धेत तिने देशात प्रथम तिसरा क्रमांक पटकावला आहे. या बाईक स्पर्धेत देशभरातील ५०० तरुणांनी सहभाग घेतला होता. त्यामध्ये ती एकमेव महिला स्पर्धक होती.
नेहा सोहनी ही मुळ संगमेश्वर साखरपा येथील असून ती मुंबईत स्थायिक आहे. तिच्या घरची परिस्थीत तशी बेताचीच. तिने बीबीएम त्यानंतर पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केले आहे. मात्र नेहाच्या मनात काहीतरी वेगळे करण्याचा विचार होता जेणेकरुन आपला सर्वाना हेवा वाटेल आणि इतर महिला आपला आदर्श घेतील. तिने २०२४ मध्ये झालेल्या स्पोर्टस् बाईक राईडच्या स्पर्धेत सहभाग घेतला. त्याच स्पर्धेतून प्रेरणा घेत मित्रांच्या मदतीने ती बाईक चालवायला शिकली. नेहाचे मित्र नदीम शाह आणि झहीर शाह या दोन सख्या भावांनी तिला या क्षेत्रात जाण्यासाठी प्रोत्साहन दिले. ते दोघेही रायडींग स्पर्धेत माहीर आहेत. १३ ते १५ एप्रिल २०२५ मध्ये कॅस्ट्रोल कंपनीने व्हॅली रन २०२५ ही स्पीड बाईक रायडींग स्पर्धा अॅबे व्हील लोणावळा येथे आयोजित केली होती. त्यामध्ये देशभरातून ५०० स्पर्धकांनी भाग घेतला. नेहानेही त्यात सहभाग घेतला होता. तिच्या बाईकची नदीम आणि झहीर यांनी उत्तम प्रकारे सजावट, देखभाल केली. या स्पर्धेत सगळीकडे तिला पुरुष स्पर्धकच दिसत होते. त्यात ही महिला काय करणार अशी चर्चा रंगली होती. परंतु नेहाने त्याकडे दुर्लक्ष करत स्पर्धा जिंकून त्यांची तोंडे बंद केली. ही स्पर्धा जिंकून देशात तिसरा क्रमांक येण्याचा बहुमान तिला मिळाला.
चौकट
फास्ट फिमेल रेसर बनण्याचा मानस
एवढ्या मोठ्या धोकादायक स्पर्धेत उतरणे हे आई-वडिलांसाठी भितीदायक होते. परंतु माझ्या निर्णयामुळे त्यांनी पाठिंबा दिला. त्यांच्या आशिर्वादामुळेच आणि माझ्या मेहनतीमुळे ही स्पर्धा जिंकू शकले. आता मला सगळ्यात फास्ट फिमेल ड्रॅग रेसरचे प्रथम पारितोषिक मिळवायचे आहे, असे नेहाने सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.