बापरे ! काडवलीत वर्षाने मिळाले पाणी...

Water Supply Problems In Chipun  Kokan Marathi News
Water Supply Problems In Chipun Kokan Marathi News

चिपळूण (रत्नागिरी) : खेड तालुक्‍यातील काडवली बौद्धवाडी-रोहिदासवाडीसाठी सात वर्षांपूर्वी राष्ट्रीय पेयजल योजनेतून सौरऊर्जेवरील दुहेरी पंप नळ-पाणी योजना राबविण्यात आली होती; मात्र गेल्या वर्षी तांत्रिक बिघाडामुळे ही योजना बंद पडली. वर्षभर ही योजना बंद राहिल्याने येथील ग्रामस्थांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागले. ग्रामस्थांच्या पाठपुराव्याने या विंधन विहिरीवर इलेक्‍ट्रिक पंप बसवण्याचे काम पूर्ण झाले. तब्बल वर्षभरानंतर ही योजना पुन्हा कार्यान्वित झाल्याने येथील दोन्ही वाड्यांमधील ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले आहे. 
शासनाच्या राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत माजी सरपंच अनंत कांगणे व माजी सदस्यांनी २०१३ साली काडवली बौद्धवाडी-रोहिदासवाडीसाठी दुहेरी पंप पाणी योजना राबवली होती. यासाठी येथील ग्रामस्थ व संतोष सावर्डेकर यांनी दोन्ही वाड्यांमधील ग्रामस्थांना विश्वासात घेऊन पुढाकार घेतला होता. ही योजना पूर्णत्वास गेल्याने येथील ग्रामस्थांच्या डोक्‍यावरील हंडा उतरला होता. यामुळे या दोन्ही वाड्यांमध्ये ग्रामस्थांना घरपोच पाणी मिळण्यास मदत झाली होती.

योजना पडली बंद

सौर ऊर्जेवरील नळपाणी योजना तब्बल सात वर्ष व्यवस्थित चालली. मार्च २०१९ मध्ये विंधन विहिरीमध्ये तांत्रिक बिघाड निर्माण झाल्याने योजना बंद पडली. यामध्ये तांत्रिक त्रुटी समजून घेण्यासाठी काडवली ग्रामपंचायत प्रशासन व येथील ग्रामस्थांनी प्रयत्न केले. शेवटी या विंधन विहिरीवर इलेक्‍ट्रिक पंप बसवण्याचा येथील ग्रामस्थांनी निर्णय घेतल्यानंतर तशी मागणी ग्रामपंचायत प्रशासनाने करण्यात आली. दरम्यानच्या, काळात येथील ग्रामस्थांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागले.

सरपंच, उपसरपंचांनी घेतली दखल

सरपंच रमेश मांजरेकर, उपसरपंच राकेश महाडिक, सदस्य सौ नंदिनी मोहिते व इतर सदस्य तसेच ग्रामसेवक संभाजी जाधव यांनी याची दखल घेऊन या विंधन विहिरीवर इलेक्‍ट्रिक पंप बसवणे संदर्भातील अंदाजपत्रक बनवून मिळण्याची मागणी जिल्हा परिषद पाणीपुरवठा उपविभागाकडे केली होती. यानंतर जिल्हा परिषद पाणीपुरवठा उपविभाग खेडमधील शाखा अभियंता अविनाश जाधव यांनीही तत्काळ नळपाणी योजनेतील विंधन विहिरीवर इलेक्‍ट्रिक पंप बसविण्याचे अंदाजपत्रक बनवून दिले. अंदाजपत्रक ग्रामपंचायत प्रशासन विभागाकडे आल्यानंतर ग्रामपंचायतीने कार्यवाही करून या विंधन विहिरीवर इलेक्‍ट्रिक पंप बसवण्याचे काम चिपळुणातील एजन्सीला दिले.

ग्रामस्थांची मेहनत

एजन्सीने तत्काळ या विंधन विहिरीवर इलेक्‍ट्रिक पंप बसवला. त्यामुळे पुन्हा येथील ग्रामस्थांच्या नळांना पाणी आले आहे. या वेळी येथील ग्रामस्थ व बौद्धवाडीचे अध्यक्ष धोंडू मोहिते, उपाध्यक्ष चंद्रकांत मोहिते, सचिव संदीप मोहिते, विलास मोहिते, हरिष मोहिते, भगवान मोहिते, प्रकाश मोहिते, शंकर सावर्डेकर व विद्यार्थी यश मोहिते, ऋषिकेश मोहिते, अभिषेक मोहिते यांनी मेहनत घेतली. 

एकजुटीचा विजय
सर्वांनी एकजूट दाखविल्यामुळे ही योजना पुन्हा एकदा सुरू झाल्याने ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले आहे. ही योजना पुन्हा सुरू झाल्याने येथील ग्रामस्थांनी सरपंच रमेश मांजरेकर, उपसरपंच राकेश महाडिक, सदस्य व ग्रामसेवक संभाजी जाधव यांना धन्यवाद दिले आहेत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com