रत्नागिरीत सापडलेल्या व्हेल शार्कचा मृत्यू यामुळे झाल्याचा अंदाज

Whale Shark Fish Found Dead In Ratnagiri Beach
Whale Shark Fish Found Dead In Ratnagiri Beach

रत्नागिरी - शहरातील मुरुगवाडा येथे गुरुवारी सकाळी नऊच्या सुमारास व्हेल शार्क मासा आढळून आला. सकाळी तो जिवंत होता, मात्र काहीवेळाने तो मृत पावला. अनेक दिवसांची उपासमार झाल्यामुळे त्याचा मृत्यू झाला असावा, अशा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

अरबी समुद्रात उठलेल्या चक्रीवादळामुळे खोल पाण्यातील मासे किनारपट्टी भागात आले आहेत. गुरुवारी सकाळी मिरकरवाडा येथील कस्टमच्या फ्लोटिंग जेट्टी समोर 12 फूट लांबीचा हा मासा लाटांमधून वाहत किनारपट्टीवर आला. येथे नौकांवर काम करणार्‍या खलाशांनी हा मासा पाहिल्यावर याची स्थानिकांना माहिती दिली. स्थानिकांनी येथे येऊन पाहिले असता हा मासा जिवंत होता. त्याला पुन्हा समुद्रात सोडण्याचे प्रयत्न करण्यात आले; परंतु काही वेळातच तो मृत पावला.

वन विभागाचे कर्मचारीही घटनास्थळी दाखल झाले होते. या माशाचा एक डोळा निकामी झाल्याने भक्ष्य पकडण्यात त्याला अडचण होत होती. अनेक दिवसांची उपासमार झाल्याने त्याचा नैसर्गिक मृत्यू झाला असावा असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. दुर्मिळ जातींपैकी एक असणार्‍या या व्हेल माशाला 1972 च्या वनसंरक्षक कायद्यानुसार संरक्षण देण्यात आले आहे. देवामाशी, वाघबीर असे त्या माशाचे प्रचलित नाव आहे.

या माशाचे पोस्टमार्टम होणार असून त्यानंतर त्याची विल्हेवाट लावण्यात येणार आहे. कोकण किनारपट्टीवर या जातीचे मासे आढळत असून कमी पाण्यात ते वास्तव करतात. या माशांच्या अवतीभवती इतर छोटे मासे सापडत असल्याने मच्छीमार त्याला देव मानतात.

दरम्यान, मिरकरवाडा बंदरात येण्यासाठी दोन बाजूला संरक्षक भिती आहे. वादळाच्या प्रवाभामुळे समुद्र खवळलेला असला तरीही बंदरात येण्याच्या भागातून हा मासा आतमध्ये कसा आला याबाबत तर्कवितर्क मांडले जात आहेत.

शवविच्छेदनाचा अहवाल

शवविच्छेदनाच्या अहवालानुसार या माशाची शेपूटीला दुखापत झाली होती. तसेच या माशाच्या तोंडावर व डोळ्याच्या भागावर मार लागल्याचे स्पष्ट झाले आहे. दुखापतीमुळे तो उपाशी असल्याचेही मत तज्ज्ञानी व्यक्त केले आहे. या माशाची शेपूट कशामध्ये तरी अडकली असल्यामुळे हा घटना घडली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com