U19 CWC Final : दु:खाचा डोंगर मनात साठवून खेळत राहिला अकबर अन् ठरला हिरो!

टीम ई-सकाळ
Monday, 10 February 2020

पोचेस्ट्रूमच्या सेनवेस पार्कवर झालेल्या फायनल मॅचमध्ये महत्त्वपूर्ण 43 रन्स केल्यामुळे तो 'मॅन ऑफ द मॅच' ठरला.

INDvsBAN : पोचेस्ट्रूम : अंडर-19 क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेची फायनल मॅच रविवारी (ता.9) भारत-बांगलादेश या दोन टीममध्ये रंगली. बांगलादेशने टीम इंडियाचा तीन विकेटने पराभव करत पहिले जेतेपद आपल्या नावावर केले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मात्र, या मॅचचा शिल्पकार ठरला तो बांगलादेशचा कॅप्टन अकबर अली. भारताचा फिरकीपटू रवी बिष्णोईने पहिले चार बॅट्समन तंबूत धाडत बांगलाला चांगलाच दणका दिला होता. त्यामुळे मॅचचे पारडे भारताच्या बाजूने झुकले होते. मात्र, टीम बांगलाचा कॅप्टन असलेला अली एका बाजूने किल्ला लढवत राहिला. आणि टीमला विजयही मिळवून दिला. त्यानंतर जे झाले ते सर्वांना माहित आहे. पण अली खूप मोठे दु:ख मनात ठेवून फायनल मॅच खेळत होता. 

वर्ल्डकपची फायनल खेळणे आणि जिंकणे हे प्रत्येक क्रिकेटपटूचं स्वप्न असतं. अलीही त्यांच्यापैकीच एक. मात्र, रविवारी तो दोन आघाड्यांवर लढाई लढत होता. एक मैदानावरची आणि दुसरी मानसिक. कारण, वर्ल्डकप स्पर्धेदरम्यान अलीची बहीण खदिजा खतूनचे निधन झाले होते. ही बाब अनेकांना माहित नाही.

- सानियाने 4 महिन्यात घटवलं तब्बल 26 किलो वजन; पाहा आता ती कशी दिसतेय?

बांगलादेशने झिम्बाब्वेविरुद्धची मॅच नऊ विकेटने जिंकत धडाक्यात सुरवात केली होती. ही मॅच अलीची बहीण खदिजाने पाहिली होती. मात्र, ती शेवटची फायनल मॅच पाहू शकली नाही. कारण 22 जानेवारीला जुळ्या मुलांना जन्म दिल्यानंतर डिलिव्हरी दरम्यान खदिजाचे निधन झाले.

चार भाऊ आणि बहिणींमध्ये अकबर अली सर्वात लहान आहे. त्याच्या बहिणीचे निधन झाले आहे ही माहिती त्याच्या घरच्यांनी लपवून ठेवली होती. कारण वर्ल्डकपसारख्या महत्त्वाच्या टुर्नामेंटमधून त्याचे लक्ष्य दुसरीकडे जाऊ नये, अशी त्याच्या घरच्यांची इच्छा होती. पण त्याला ही बातमी समजण्यास वेळ लागला नाही.

- U19CWC Final : विजयाचा उन्माद बांगलादेशच्या अंगलट; खेळाडूंना भोगावी लागणार फळं!

पाकिस्तानविरुद्धची मॅच पावसामुळे रद्द करावी झाल्यानंतर त्याला बहिणीच्या निधनाची बातमी कळाली. घरच्यांनी ही गोष्ट लपवून ठेवल्यामुळे त्याचे त्याच्या भावाशी भांडणही झाले होते. 

अकबर त्याच्या बहिणीचा खूप लाडका होता. ती अकबरवर खूप प्रेम करायची अशी माहिती अकबरच्या वडिलांनी बंगाली दैनिक 'प्रोथोम आलो'च्या प्रतिनिधींशी बोलताना दिली. घरातील सर्वांनी ही गोष्ट त्याच्यापासून लपवून ठेवली होती. मला त्याच्याशी बोलण्याची हिंमत होत नव्हती. आणि काय बोलावे तेही समजत नव्हते, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. 

- Bushfire Cricket League : तिच्या विनंतीनंतर क्रिकेटचा देव उतरला मैदानात!

एकीकडे एका पाठोपाठ एक बॅट्समन पॅव्हेलियनमध्ये जात असताना अकबरने पहिल्यांदा परवेझ हुसेन इमॉनसह बांगलाचा डाव सावरला. विजयापासून 15 रन्स दूर असताना पावसाने हजेरी लावली. मात्र, मॅच सुरू झाल्यानंतर त्याने टीमला विजय मिळवून दिला. बहीण गेल्याचं दु:ख मनात साठवून अकबर फायनल खेळला आणि पोचेस्ट्रूमच्या सेनवेस पार्कवर झालेल्या फायनल मॅचमध्ये महत्त्वपूर्ण 43 रन्स केल्यामुळे तो 'मॅन ऑफ द मॅच' ठरला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bangladesh U19 skipper Akbar Ali battled pain of pregnant sister demise during World Cup