Ranji Trophy 2024 : उपांत्यपूर्व फेरीचं वाजलं बिगुल; बडोद्याशी लढत, मुंबईचे पारडे जड

Ranji Trophy 2024 Quarter Final : रणजी ट्रॉफीची बाद फेरी सुरू होत असून मुंबई, कर्नाटक, बडोदा, सौराष्ट्र, विदर्भ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि मध्य प्रदेश हे संघ उपांत्य फेरी गाठण्यासाठी प्रयत्नशील असतील.
ajinkya rahane
ajinkya rahane esakal

Ranji Trophy 2024 Knock Out Stage Mumbai Vs Baroda :

मुंबई, ता. २२ : रणजी क्रिकेट करंडकातील उपांत्यपूर्व फेरीच्या लढतींना उद्यापासून सुरुवात होत आहे. सर्वाधिक ४१ वेळा या स्पर्धेचा विजेता ठरलेल्या बलाढ्य मुंबईला घरच्या मैदानावर होत असलेल्या या लढतीत बडोद्याचा सामना करावयाचा आहे. श्रेयस अय्यर, शिवम दुबे या प्रमुख खेळाडूंची अनुपस्थिती या लढतीला असणार आहे. मात्र यानंतरही मुंबई संघाचे पारडे जड मानले जात आहे.

ajinkya rahane
Ranji Trophy 2024 : हैदराबादनं पटकावलं प्लेट ग्रुपचं विजेतेपद, HCA अध्यक्षांनी संघाला दिलं तीन वर्षाचं टार्गेट

मुंबईच्या संघाने २०१५-१६ मध्ये अखरेचा रणजी करंडक पटकावला आहे. त्यानंतर दोन वेळा या स्पर्धेची अंतिम फेरी गाठण्यात त्यांना यश मिळाले, पण दोन्ही वेळा उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. मात्र यंदाच्या मोसमातील साखळी फेरीत ‘ब’ गटातून सर्वाधिक पाच लढती जिंकून मुंबई संघाने ३७ गुणांची कमाई करीत आपले वर्चस्व प्रस्थापित केले.

बडोद्याचा संघ ‘ड’ गटातून २४ गुणांसह दुसरा आला. यामध्ये तीन विजयांचा समावेश होता. मात्र बडोद्याच्या अखेरच्या चार लढतींपैकी तीन लढती अनिर्णित राहिल्या असून एका लढतीत त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे मुंबई संघाचे आव्हान परतवून लावण्यासाठी बडोद्याला प्रयत्नांची शिकस्त करावी लागणार आहे.

श्रेयस अय्यर हा तंदुरुस्तीअभावी व शिवम दुबे दुखापतीमुळे उपांत्यपूर्व लढतीत खेळू शकणार नाही. मुंबईसाठी हा धक्का असेल. कर्णधार अजिंक्य रहाणेचा सुमार फलंदाजी फॉर्मही डोकेदुखी ठरत आहे.

अशा परिस्थितीत भूपेन लालवानी (सात सामन्यांमधून एक शतक व पाच अर्धशतकांसह ४९३ धावा) याच्याकडून अपेक्षा वाढल्या आहेत. तसेच पृथ्वी शॉ यालाही जबाबदारीची फलंदाजी करावी लागणार आहे.

मुंबईच्या गोलंदाजी विभागाची मदार मोहित अवस्थी याच्या खांद्यावर असणार आहे. मोहित याने सहा सामन्यांमधून ३१ फलंदाज बाद केले आहेत. तीन वेळा त्याने सामनावीराचा मानही संपादन केला आहे.

तसेच तीन वेळा एका डावात पाच किंवा त्यापेक्षा जास्त विकेट मिळवण्याची किमयाही करून दाखवली आहे. रॉयस्टन डियास (१७ विकेट) व शम्स मुलानी (२३ विकेट) यांनाही गोलंदाजीत ठसा उमटवावा लागणार आहे.

ajinkya rahane
IPL 2024 Schedule : CSK vs RCB ने श्रीगणेशा! मुंबई पहिल्याच सामन्यात गुजरातशी भिडणार, जाणून घ्या शेड्युल

विदर्भाचा झंझावात कर्नाटक रोखणार?

मुंबईनंतर फक्त विदर्भ संघाने साखळी फेरीच्या लढतीत पाच विजय मिळवले आहेत. हाच विदर्भाचा संघ उद्यापासून घरच्या मैदानावर खेळवण्यात येणाऱ्या उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत कर्नाटकशी दोन हात करणार आहे.

देवदत्त पडिक्कल याची भारताच्या कसोटी संघासाठी निवड झाली आहे. त्यामुळे कर्नाटक संघाला त्याची अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवेल. त्यामुळे मनीष पांडे, शरथ श्रीनिवास यांना फलंदाजी चुणूक दाखवावी लागेल. वैशाख विजयकुमार याची अष्टपैलू कामगिरीही महत्त्वाची भूमिका बजावू शकते.

सौराष्ट्र - तमिळनाडूमध्ये अटीतटीची लढत

सौराष्ट्र - तमिळनाडू यांच्यामध्ये उद्यापासून कोईम्बतूर येथे उपांत्यपूर्व फेरीची लढत पार पडणार आहे. सौराष्ट्राने ‘अ’ गटातून चार विजयांसह २९ गुणांची कमाई करीत दुसरे स्थान पटकावले, तर तमिळनाडूने ‘क’ गटातून चार विजयांसह २८ गुणांची कमाई करीत पहिल्या स्थानावर मुसंडी मारली.

दोन तुल्यबळ संघांमधील रोमहर्षक लढत तमाम क्रिकेटप्रेमींना पाहायला मिळणार आहे. चेतेश्‍वर पुजारा (७८० धावा), अर्पित वसावडा (४४० धावा), प्रेरक मंकड (४२६ धावा) यांच्या फलंदाजीवर, तसेच धमेंद्र जडेजा (३९ विकेट) याच्या गोलंदाजीवर सौराष्ट्राला विजयाची आस बाळगता येणार आहे.

तमिळनाडूसाठी नारायणन जगदीशन (७७५ धावा), साई किशोर (३८ विकेट), एस. अजित राम (३६ विकेट) या खेळाडूंची कामगिरी निर्णायक ठरू शकते.

मध्य प्रदेशला आंध्रची चिंता

मध्य प्रदेशने २०२१-२२ मध्ये रणजी विजेता होण्याचा मान संपादन केला होता. यंदाच्या मोसमातही त्यांनी दमदार कामगिरी केली आहे. साखळी फेरीच्या लढतीत त्यांनी ‘ड’ गटातून चार विजयांसह ३२ गुणांची कमाई करीत पहिले स्थानही पटकावले.

या रणजी मोसमात त्यांचा संघ एकदाही हरलेला नाही. तरीही त्यांना आंध्रची चिंता लागून राहिली आहे. इंदोर येथे दोन संघांमध्ये उपांत्यपूर्व फेरीची लढत पार पडणार आहे. आंध्रच्या संघाला साखळी फेरीच्या अखेरच्या पाच लढतींत पराभवाचा सामना करावा लागलेला नाही.

अखेरच्या दोन लढती अनिर्णित राहिल्या आहेत. तसेच त्याआधीच्या तीन लढतींमध्ये आंध्रने विजय मिळवला आहे. या मोसमात त्यांचा एकमेव पराभव मुंबईविरुद्ध झाला आहे. त्यामुळे मध्य प्रदेशला सर्वस्व पणाला लावून खेळ करावा लागणार आहे.

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com