
अरे याची हाईट किती, हा कर्णधार कसा झाला? असे अनेक प्रश्न विचारून त्याची मस्करी करण्यात आली. त्याच्यावर आजही अनेक मीम्स व्हायरल होत असतात. पण, या सगळ्या गोष्टींना झुगारून त्याने जग जिंकण्याची किमया करून दाखवली. तो आज जगज्जेता आहे. होय ही गोष्ट आहे दक्षिण आफ्रिकेच्या टेम्बा बावूमाची.
ज्या दक्षिण आफ्रिकेत वर्णभेद होता, त्या देशात त्यानं आपलं नाव सुवर्णाक्षरांनी कोरलंय. तो आज दक्षिण आफ्रिकेचा २१ व्या शतकातील सध्याचा एकमेव आयसीसी विजेता कर्णधार आहे.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप २०२५ स्पर्धेच्या अंतिम सामन्यात त्याच्या नेतृत्वात दक्षिण आफ्रिकेने गतविजेत्या आणि अनुभवी ऑस्ट्रेलियाला पराभूत करत विजेतेपदाला गवसणी घातली आहे. तेही क्रिकेटची पंढरी समजल्या जाणाऱ्या लॉर्ड्स क्रिकेट ग्राऊंडमध्ये.