कोस्टा रिका आपल्याबरोबर जर्मनीलाही घेऊन बुडाली; ग्रुप E मध्ये मोठा उलटफेर | FIFA World Cup 2022 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

FIFA World  Cup 2022 Group E 4 Time World Cup Winner Germany eliminated

FIFA World Cup 2022 : कोस्टा रिका आपल्याबरोबर जर्मनीलाही घेऊन बुडाली; ग्रुप E मध्ये मोठा उलटफेर

FIFA World Cup 2022 Germany Eliminated : फिफा वर्ल्डकप 2022 मधील सर्वात मोठा उलटफेर हा ग्रुप E मध्ये झाला. जर्मनीने कोस्टारिकाला 4 - 2 अशी मात दिली मात्र तरी देखील जर्मनीला बाद फेरी गाठता आली नाही. दुसरीकडे जपानने बलाढ्य स्पेनचा 2 - 1 असा पराभव करत ग्रुपमध्ये अव्वल स्थान गाठले. कोस्टारिका स्पेनसोबत पहिला सामना 7 - 0 ने हरली होती. यामुळेच 4 वेळा वर्ल्डकप जिंकणारी जर्मनी साखळी फेरीतच गारद झाली. उत्तम गोलफरकाच्या आधारे स्पेन दुसऱ्या क्रमांकावरून का होईना बाद फेरीसाठी पात्र ठरली. स्पेनने कोस्टारिकाचा 7 गोल्सनी केलेला पराभव त्यांच्या कामी आला. कारण जर्मनी आणि स्पेनचे प्रत्येकी 4 गुण झाल्याने गोलफरकाच्या आधारे स्पेन बाद फेरीसाठी पात्र झाले.

जर्मनीसाठी कोस्टारिका विरूद्धच्या सामन्यात विजय आवश्यक होता. जर्मनीने करो या मरो सामन्यात पहिल्या हाफपासूनच आक्रमक खेळ केला. 10 व्या मिनिटालाच सर्जने पहिला गोल करत जर्मनीचे खाते उघडले. जर्मनीने आपली ही 1 - 0 आघाडी पहिल्या हाफपर्यंत कायम राखली. मात्र त्यानंतर कोस्टारिकाच्या येल्टसिनने 58 व्या मिनिटाला गोल करत जर्मनीशी बरोबरी साधली. कोस्टारिकाने दुसऱ्या हाफच्या सुरूवातीलाच बरोबरी साधल्याने आधीच टेन्शनमध्ये आलेल्या जर्मनीचे टेन्शन गोलकिपर मानुएलने अधिकच वाढवले. त्याने 70 व्या मिनिटाला गोल वाचवण्याच्या नादात स्वयम गोल केला. त्यामुळे कोस्टारिका 2 - 1 ने आघाडीवर गेली.

मात्र जर्मनीने अवघ्या 3 मिनिटात दुसरा गोल करत सामना 2 - 2 असा बरोबरीत आणला. काई हावेर्त्झने फुलक्रुगच्या साथीने हा गोल केला. यामुळे जर्मनीचा जीव भांड्यात पडला. दरम्यान दुसरा हाफ संपण्यासाठी काही मिनिटे शिल्लक असताना हावेर्त्झने पुन्हा एखदा कोस्टारिकाची गोलपोस्ट भेदली. त्याने 85 व्या मिनिटाला गोल करत जर्मनीला 3 - 2 अशी आघाडी मिळवून दिली. यातबरोबर 89 व्या मिनिटाला निकोलस फुलक्रगने जर्मनीचा चौथा गोल केला. जर्मनीने सामना 4 - 2 असा जिंकला. मात्र तरी देखील जर्मनीला याचा फायदा झाला नाही.

ग्रुप E मधील दुसऱ्या सामन्यात जपानने स्पेनला 2 - 1 अशी मात दिली. पासेसचा बादशाह असेलेल्या स्पेनने आजच्या सामन्यात देखील बॉलवर आणि पर्यायाने सामन्यावर चांगले नियंत्रण राखले. स्पेनच्या अल्वारो मोराटाने सामन्याच्या 10 व्या मिनिटालाच पहिला गोल केला. पहिल्या हाफपर्यंत स्पेनने सामन्यावर नियंत्रण ठेवत जपानच्या गोलपोस्टवर दबाव निर्माण केला होता. मात्र जपानने चांगला बचाव करत स्पेनचे आक्रमण रोखून धरले होते. अखेर जपानला बरोबरीचा गोल करण्याची संधी दुसऱ्या हाफच्या तिसऱ्या मिनिटालाच मिळाली. रित्सू डोआनने 48 व्या मिनिटाला गोल करत सामना 1 - 1 असा बरोबरीत आणला. यानंतर 51 व्या मिनिटाला तनाकाने जपानसाठी दुसरा गोल करत आघाडी मिळवून दिली.

यानंतर मात्र स्पेनने जपानवर आक्रमक चढाया करत गोल फेडण्याचा प्रयत्न केला. स्पेनने तब्बल 12 वेळा जपानच्या गोलपोस्टवर आक्रमण केले. त्यातील 5 वेळा त्यांचे शॉट्स ऑन टार्गेट होते. मात्र त्यातील एकावरच गोल करता आला. दुसरीकडे जपानच्या 5 आक्रमणातील 3 शॉट्सच ऑन टार्गेट राहिले. विशेष म्हणजे त्यातील 2 शॉट्सवर गोल झाला. स्पेनने सामन्यात 1058 पासेस देत बॉलवर 83 टक्के ताबा मिळवला होता. तरी देखील त्यांना सामना जिंकता आला नाही. स्पेन पराभूत झाल्याने ग्रुप E मध्ये मोठे उलटफेर झाले.

जपान दोन सामने तीन पैकी दोन सामने जिंकून 6 गुणांसह अव्वल स्थानावर पोहचले. तर बलाढ्य स्पेन आणि जर्मनी 1 विजय आणि 1 बरोबरीसह प्रत्येकी 4 गुणांवर होते. मात्र स्पेनने कोस्टारिकावर पहिल्या सामन्यात 7 गोल्सनी विजय मिळवला होता. याचाच फायदा त्यांना बाद फेरीत जाण्यास झाला. स्पेनने 9 गोल प्रतिस्पर्ध्यावर डागले होते. तर 3 गोल खाल्ले होते. यामुळे त्यांचा गोलफरक 6 होता. दुसरीकडे जर्मनीने 6 गोल केले आणि 5 गोल स्विकारले होते. त्यांचा गोल फरक फक्त 1 होता. त्यामुळे स्पेन पॉईंट टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर राहिली आणि 4 वेळा वर्ल्डकप जिंकणारी जर्मनी तिसऱ्या स्थानावर राहिली. जरी जर्मनीने कोस्टारिकाला शेवटच्या साखळी सामन्यात पराभूत केले असले तरी स्पेनने कोस्टारिकाचा दारूण पराभव करणे जर्मनीच्या मुळावर आले.