
माजी विकेटकिपर विजय यादव आर्थिक विवंचनेत, उपचाराचा खर्चही परवडेना
नवी दिल्ली : भारताचे माजी विकेटकिपर विजय यादव (Vijay Yadav) हे किडनीच्या आजाराने (Kidney Failure) त्रस्त आहेत. ते सध्या डायलेसिसवर आहेत. मात्र उपचारासाठी त्यांना पैशाची चणचण भासत आहे. याबाबतची माहिती वरिष्ठ क्रीडा पत्रकार विजय लोकापल्ली यांनी ट्विटवर दिली. विजय यादव यांनीच सचिन तेंडुलकरला (Sachin Tendulkar) 1993 ला दक्षिण आफ्रिकेत झालेल्या हिरो कपच्या (Hero Cup 1993) सेमी फायनलमध्ये शेवटची ओव्हर टाकण्याचा सल्ला दिला होता.
लोकापल्ली यांनी ट्विट केले की, 'भारताचे माजी विकेटकिपर यांना त्वरित आर्थिक मदतीची गरज आहे. त्यांची किडनी निकामी झाली आहे. ते सध्या डायलसिसवर आहेत. त्यांना आतापर्यंत दोन हार्ट अटॅक येऊन गेले आहेत. त्यानेच 1993 च्या हिरो कपमध्ये सेमी फायनल सामन्यात सचिन तेंडुलकरला शेवटच्या षटकात गोलंदाजी देण्याचा सल्ला दिला होता.'
विजय यादव हे 2006 मध्ये एका कार अपघातात (Car Accident) जबर जखमी झाले होते. तेव्हापासून त्यांच्या तब्येतीच्या तक्रारी सुरू झाल्या. या अपघातात विजय यादव यांनी आपल्या 11 वर्षाच्या मुलीला देखील गमावले होते. या अपघातानंतर त्यांना दोन हार्ट अटॅक देखील येऊन गेले आहे. यादव यांनी भारताकडून एक कसोटी आणि 19 वनडे सामने खेळले आहेत. त्यांनी 1991 मध्ये रणजी ट्रॉफीमध्ये (Ranji Trophy) हरियाणा संघाला विजयापर्यंत पोहचवले होते. त्यांनी या हंगामात 24 कॅचेस 6 स्टंपिंग तर 25 बळी घेतले होते. देशांतर्गत क्रिकेटमधील या दमदार कामगिरीमुळे त्यांना भारतीय संघाची दारे उघडली होती. त्यांनी 1992-93 ला दक्षिण आफ्रिकेविरूद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.