आयपीएलबाबतची गोड बातमी लवकरच कळणार; वाचा नेमकी कशी ती...

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 9 June 2020

18 ऑक्‍टोबर ते 15 नोव्हेंबर या कालावधीत ऑस्ट्रेलियात ट्‌वेन्टी-20 विश्वकरंडक स्पर्धा नियोजित होती; परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव, त्यामुळे करण्यात आलेले लॉकडाऊन अशा सर्व अडथळ्यांनी स्पर्धेची वाट एकदमच खडतर केलेली आहे.

दुबई ः गेले दोन महिने चर्चेच्या गुऱ्हाळात हेलखावे खाणाऱ्या ऑस्ट्रेलियातील ट्‌वेन्टी-20 विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेबाबतची अनिश्‍चितता उद्या संपण्याची शक्‍यता आहे. आयसीसीच्या महत्त्वपूर्ण बैठकीत स्पर्धा पुढे ढकलली जाणार, हे बहुतेक निश्‍चित आहे. 

वाचा  ः मन हेलावणारी बातमी! मृत्यू दाखला देण्यास नकार, तब्बल 16 तास मृतदेह घरात

18 ऑक्‍टोबर ते 15 नोव्हेंबर या कालावधीत ऑस्ट्रेलियात ट्‌वेन्टी-20 विश्वकरंडक स्पर्धा नियोजित होती; परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव, त्यामुळे करण्यात आलेले लॉकडाऊन अशा सर्व अडथळ्यांनी स्पर्धेची वाट एकदमच खडतर केलेली आहे. ऑक्‍टोबरला अजून वेळ असला तरी आणि कोरोनाचे सावट पूर्णपणे दूर झालेले नसताना बहुराष्ट्रीय स्पर्धा आयोजित करणे कठीण आहे. 

वाचा ः धक्कादायक! मुंबई महापालिका उपायुक्तांचं कोरोनानं निधन...

पुढील सर्व आव्हानांचा अंदाज घेऊन यजमान ऑस्ट्रेलिया क्रिकेट मंडळानेच ही स्पर्धा पुढे ढकलावी, अशी लेखी मागणी आयसीसीकडे केलेली आहे. गेल्या महिन्याच्या अखेरीस झालेल्या आयसीसी बोर्डाच्या बैठकीत प्राथमिक चर्चा झाली आणि बैठकीची 10 जून ही तारीख निश्‍चित करण्यात आली. 

वाचा ः मुंबईतील गुन्हेगारीवर बसणार वचक; चकमक फेम सचिन वाझेंची झाली 'इथे' नियुक्ती....

आयपीएलचा मार्ग मोकळा? 
आयसीसीच्या या बैठकीकडे बीसीसीआयचे अधिक लक्ष असणार आहे. ऑस्ट्रेलियातील विश्वकरंडक स्पर्धा पुढे ढकलली गेली, तर तो कालावधी आयपीएलसाठी मिळणार आहे. प्रथम विश्वकरंडक स्पर्धा पुढे ढकलण्याची अधिकृत घोषणा आयसीसीला करू द्या; मग आम्ही आयपीएलबाबत विचार करू, असे बीसीसीआयचे खजिनदार अरुण धुमल यांनी सांगितले. स्टार स्पोर्टस्‌ हे आयसीसीबरोबर आयपीएलचेही ब्रॉडकास्टर्स आहेत. त्यामुळे त्यांची भूमिका महत्त्वाची ठरणार असल्याचे बीसीसीआयकडून सांगण्यात येत आहे. 

कार्याध्यक्षपदासाठी गांगुलीचे नाव? 
आयसीसीच्या कार्याध्यक्षपदाचा शशांक मनोहर यांचा कार्यकाळ संपलेला आहे. या जागेवर इंग्लंड मंडळाच्या कॉलिन ग्रीव्हज यांना गेल्या महिन्यापर्यंत एकमुखी पसंती मिळत होती, पण भारताचा माजी कर्णधार आणि बीसीसीआयचे विद्यमान अध्यक्ष सौरव गांगुली यांचे नाव अचानक चर्चेत आले आहे आणि त्यांना क्रिकेटविश्वातून पाठिंबा मिळत आहे. त्यामुळे उद्याच्या बैठकीत गांगुलीच्या नावाची चर्चा होऊ शकते; पण बीसीसीआयने अजूनपर्यंत अधिकृतपणे गांगुलीच्या नाव्याची घोषणा केलेली नाही. पहिल्यांदा त्यांना निवडणूक प्रक्रिया तर घोषित करू द्या; मग आम्ही रिंगणात उतरू शकतो, असे आश्वासक मत बीसीसीआयच्या सूत्रांनी व्यक्त केले. 

वाचाक्रिकेटच्या पंढरीत कधी सुरू होणार क्रिकेटची वारी; 'ही' स्पर्धा झाली जवळपास रद्द

करमुक्तीची गुंतागुंत 
विश्वकरंडक स्पर्धेच्या आयोजनाचे हक्क देताना आयसीसीची करमुक्ती मिळकतीची अट असते. भारतात 2021 मध्ये टी-20 विश्वकरंडक होणार आहे, त्यासाठी आयसीसीने बीसीसीआयवर दडपण टाकलेले आहे. अगोदर 2016 मधील स्पर्धेच्या 2 कोटी 37 लाख डॉलरच्या करमुक्तीवरून बीसीसीआय आणि आयसीसीमध्ये वाद सुरू आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: icc important meeting will decide future of icc t20 world cup and ipl