
भारताच्या स्नेह राणा आणि तानिया भाटिया यांनी संघाला पराभवाच्या खाईतून बाहेर काढलं.
ब्रिस्टल - भारतीय महिला इंग्लंड दौऱ्यावर असून दोन्ही देशांमध्ये एकमेव कसोटी सामना खेळण्यात आला. या सामन्यात भारताच्या स्नेह राणा आणि तानिया भाटिया यांनी संघाला पराभवाच्या खाईतून बाहेर काढलं. इंग्लडने सामन्यावर पकड मिळवली असताना शतकी नाबाद भागिदारी करत स्नेह राणा आणि तानिया यांनी सामना अनिर्णित राखण्यात मोलाची भूमिका पार पाडली. नवव्या विकेटसाठी दोघींच्या 104 धावांच्या भागिदारीमुळे चौथ्या दिवशी सामना अनिर्णित अवस्थेत संपला. स्नेह राणा 80 धावांवर तर तानिया भाटिया 44 धावांवर नाबाद राहिल्या.
इंग्लंडने दुसऱ्या दिवशी नऊ बाद 396 धावांवर पहिला डाव घोषित केला होता. त्यानंतर प्रत्युत्तरादाखाल खेळलेल्या भारताचा पहिला डाव 231 धावांवर गुंडाळला होता. स्मृती मानधना आणि शेफाली वर्मा यांच्या अर्धशतकी खेळीनंतरही इतर फलंदाज झटपट बाद झाल्यानं संघावर फॉलोऑनची नामुष्की ओढावली होती. इंग्लंडने 165 धावांची आघाडी मिळवली होती. त्यानंतर दुसऱ्या डावात फॉलोऑन घेऊन मैदानात उतरलेल्या भारताची सुरुवात खराब झाली. मात्र त्यानंतर तळाच्या फलंदाजांनी केलेल्या कामगिरीमुळे सामना अनिर्णित राखण्यात यश मिळवलं.
भारताने दुसऱ्या डावात चहापानापर्यंत 8 बाद 243 धावा केल्या होत्या. तोपर्यंत भारताचा पराभव होणार असं वाटत होतं. मात्र अखेरच्या सत्रात स्नेह राणा आणि तानिया भाटिया यांनी जबरदस्त फलंदाजी करत सामना अनिर्णित राखला. भारताने दुसऱ्या डावात 8 बाद 344 धावा केल्या.
स्नेह राणाने 154 चेंडूत 13 चौकारांसह 80 धावा केल्या तर तानिया भाटियाने 88 चेंडूत सहा चौकारांसह 44 धावा केल्या. त्याआधी शेफाली वर्माने 63 धावांची आणि दीप्ती शर्माने 54 धावांची खेळी केली होती. तर पूनम राऊतने 39 धावा केल्या. इंग्लंडकडून सोफी एकल्सटनने चार तर नॅटली सीवरनं दोन विकेट घेतल्या. याशिवाय कॅथरीन ब्रंट आणि हिथर नाईट यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
इंग्लंडवर भारतच भारी
विशेष म्हणजे भारताच्या महिला संघाने इंग्लंडमध्ये कसोटीत एकही पराभव पत्करलेला नाही. आतापर्यंत इंग्लंडमध्ये 9 सामने झाले. त्यात एकाही सामन्यात इंग्लंडला विजय मिळवण्यात आलेला नाही. 9 पैकी 7 सामने अनिर्णित राहिले तर भारताने दोन सामने जिंकले आहेत.
स्नेह राणाची अष्टपैलू कामगिरी
स्नेह राणा हिने अष्टपैलू खेळी करताना गोलंदाजीसह फलंदाजीतही कमाल केली. 50 पेक्षा जास्त धावा आणि 4 पेक्षा जास्त विकेट पदार्पणातच घेणारी ती भारताची पहिली महिला क्रिकेटपटू ठरली आहे. तसंच आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटमध्ये आतापर्यंत अशी कामगिरी चारच खेळाडूंना करता आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.