U19CWC : टीम इंडियाचा नवा स्टार; जैस्वालची वर्ल्डकपमधील 'यशस्वी' कामगिरी पाहिली का?

Yashasvi_Jaiswal
Yashasvi_Jaiswal

U19 World Cup : अंडर-19 वर्ल्डकप स्पर्धेत अनेक खेळाडूंनी आपल्या खेळीने क्रिकेट फॅन्सचे मनोरंजन केले. यामध्ये युवा टीम इंडियाच्या यशस्वी जैस्वालने सगळ्यांचे लक्ष्य वेधून घेतले आहे. या वर्ल्डकपमधील त्याची कामगिरी पाहता आगामी काळात तो टीम इंडियाचा ओपनर होऊ शकतो, यात वावगे काहीच नाही. 

वर्ल्डकप फायनलमध्ये टीम इंडियाला बांगलादेशने चांगलेच झुंजवले. अविषेक दास, शोरिफूल इस्लाम यांच्या अचूक माऱ्यापुढे टीम इंडिया 177 पर्यंतच पोहचू शकली. भारताचा सलामीवीर यशस्वी जैस्वालने 88 रन्सची अर्धशतकी खेळी केली. 

पहिल्या बॉलपासून बांगलाच्या तोफखान्याने टिच्चून मारा केला. त्यामुळे भारताला मोठे आव्हान उभारण्यात अपयश आले. सलामीवीर दिव्यांश सक्सेनाने लगेच तंबूचा रस्ता धरला. त्यानंतर दुसऱ्या विकेटसाठी तिलक वर्मा आणि जैस्वालने 94 रन्सची पार्टनरशिप केली.

एका बाजूने यशस्वी किल्ला लढवणाऱ्या जैस्वालने वर्ल्डकपमधील आपले पाचवे अर्धशतक साजरे केले. यावेळी त्याने अनेक विक्रम आणि पराक्रम केले. अंडर-19 वर्ल्डकप स्पर्धेत सर्वात जास्तवेळा 50 किंवा त्यापेक्षा जास्त रन्स बनविण्याचा शिखर धवनचा विक्रम त्याने मोडला. या यादीत तो सर्फराज खानसह अव्वलस्थानी विराजमान झाला आहे. 

आणखी एक म्हणजे, यशस्वीने बॅटिंगच्या सगळ्या प्रकारांत आपला झेंडा गाडला आहे. फायनल मॅचमध्ये त्याला शतकी खेळी करता आली नसली तरी त्याने पूर्ण टुर्नामेंटमध्ये आपल्या कामगिरीने सर्वांचे लक्ष्य वेधून घेतले आहे. संघ निवड समिती आणि देशभरातील असंख्य चाहत्यांना त्याने आपल्या बॅटिंगद्वारे इम्प्रेस केले आहे. 

जैस्वालने या वर्ल्डकप स्पर्धेत 6 मॅचमध्ये 133.33 च्या सरासरीने 400 रन्स झोडपल्या आहेत. यामध्ये पाकिस्तानविरुद्धची नाबाद 105 रन्स ही त्याची या टुर्नामेंटमधील बेस्ट खेळी ठरली. त्याने या वर्ल्डकपमध्ये 1 सेंच्युरी आणि 4 हाफ-सेंच्युरीही ठोकल्या आहेत.

याबरोबरच त्याने सर्वाधिक फोर आणि सिक्स ठोकण्यामध्येही बाजी मारली आहे. जैस्वालने या वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक 39 फोर आणि 10 सिक्स टोलवले आहेत. यामुळे मॅन ऑफ द सीरिजचा तो प्रबळ दावेदार बनला आहे. 

या स्पर्धेतील यशस्वीच्या एकूण कामगिरीमुळे त्याला टीम इंडियाची दारे खुली झाली आहेत. सध्या रोहित शर्मा आणि शिखर धवन हे दुखापतीमुळे संघाबाहेर आहेत. पृथ्वी शॉ आणि के. एल. राहुल हे सध्या भारतीय संघाच्या ओपनरची जबाबदारी आपल्या खांद्यावर सांभाळत आहेत. मात्र, धवनची जागा भरून काढण्यासाठी संघाला डावखुऱ्या खेळाडूची नितांत आवश्यकता आहे. यासाठी यशस्वी जैस्वाल हा चांगला पर्याय संघ निवड समितीसमोर आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com