esakal | बापरे 'एवढे' रोईंगपटू दोषी...कुछ तो गडबड है..! वाचा सविस्तर...

बोलून बातमी शोधा

roing

गेल्या काही वर्षांत भारताने रोईंगच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांत लक्षणीय कामगिरी केली आहे; मात्र आता उत्तेजक चाचणीत भारताचे 22 युवा रोईंगपटू दोषी ठरल्यामुळे क्रीडा क्षेत्रास हादरा बसला आहे.

बापरे 'एवढे' रोईंगपटू दोषी...कुछ तो गडबड है..! वाचा सविस्तर...
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

हैदराबाद : गेल्या काही वर्षांत भारताने रोईंगच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांत लक्षणीय कामगिरी केली आहे; मात्र आता उत्तेजक चाचणीत भारताचे 22 युवा रोईंगपटू दोषी ठरल्यामुळे क्रीडा क्षेत्रास हादरा बसला आहे. दोषी रोईंगपटूंनी एकच उत्तेजक घेतल्याने संशयाचे धुके गडद झाले आहे; मात्र सप्लिमेंटस्‌मुळे हे घडले असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. 

मोठी बातमी - मुंबईनंतर आता नवी मुंबईच्या आयुक्तांची तडकाफडकी बदली...

दोषी ठरलेले हे सर्व खेळाडू 16 ते 18 वयोगटातील आहेत. आशियाई कुमार स्पर्धेस संघ रवाना होण्यापूर्वी संघातील सर्व 24 खेळाडूंची चाचणी झाली होती. नमुन्यात उत्तेजक आढळल्याने राष्ट्रीय उत्तेजक प्रतिबंधक संस्थेने नोटीस बजावली आहे. हे खेळाडू दोषी ठरल्यामुळे भारतास पट्टायामधील स्पर्धेत जिंकलेल्या दोन रौप्यपदकांवर पाणी सोडावे लागणार आहे. 

या सर्व निकालाभोवतीच संशयाचे धुके आहे. चाचणी गतवर्षी जुलैत झाली होती. त्यानंतर नमुने कित्येक महिने नवी दिल्लीतील प्रयोगशाळेत होते. आता या सर्व प्रक्रियेत काही चुकीचे घडलेले नाही, याची खात्री कशी देणार, अशी विचारणा भारतीय संघटनेचे सचिव एम. व्ही. श्रीराम यांनी केली. त्याचबरोबर त्यांनी राष्ट्रीय उत्तेजक प्रतिबंधक संस्थेचे संचालक नवीन अगरवाल यांच्यासह क्रीडा प्राधिकरणाच्या डॉक्‍टरांनी रोईंग शिबिरास अनेकदा भेट दिली आहे, याकडे लक्ष वेधले आहे. 

...कायद्याचे उल्लंघन झाल्यास जबाबदारी तुमची; फडणवीस यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

भारतीय रोईंगपटूंनी ब नमुन्याची चाचणी करण्याची मागणी केलेली नाही. त्यांच्या गतवर्षीच्या जुलैमधील चाचणीत युरिकॉसुरिक आढळले. उत्तेजक चाचणीत दोषी आढळू नये, यासाठी हे घेतले जाते. त्यामुळे ते आढळल्यास बंदी घातली जाते. आता मोठ्या प्रमाणावर खेळाडू दोषी आढळल्याने रोईंग महासंघ तसेच संघाचे मार्गदर्शक संशयाच्या भोवऱ्यात आले आहेत. 

सर्वात मोठी बातमी - चीनी हॅकर्सकडून 5 दिवसात 40 हजार सायबर हल्ले...

मार्गदर्शक संशयाच्या भोवऱ्यात 
आशियाई स्पर्धेस जाणाऱ्या रोईंग संघाचे जेनिल कृष्णन, दलवीर सिंग राठोड, अमित सिंग मार्गदर्शक होते. कुमार खेळाडू उत्तेजकांपासून दूर राहतील, याची जबाबदारी मार्गदर्शकांवर असते. ""चौकशी पूर्ण होण्यापूर्वी कोणाला दोषी धरणे गैर आहे. मोठ्या प्रमाणावर हे सुरू आहे, हे मत व्यक्त करणे तर चुकीचे आहे. चाळीस वर्षापासून रोईंगमध्ये पदके मिळत आहेत,' याकडे संघटनेच्या सचिवांनी लक्ष वेधले. 
 

कुठेतरी चूक नक्कीच झाली असणार. भारतीय क्रीडा प्राधिकरणाने मान्य केलेल्या सप्लिमेंटस्‌मधूनच हे उत्तेजक घेतले गेले असावे. आता या सप्लिमेंटस्‌च्या एखाद्या बॅच खराब असेल आणि त्याची जाणीव आम्हाला नसेल. 
- एम. व्ही. श्रीराम, भारतीय रोईंग महासंघाचे सचिव 

रोईंग असो किंवा कोणत्याही खेळात एकाच वेळी एवढ्या प्रमाणावर खेळाडू दोषी आढळणे, ही चिंतेची बाब आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर खेळाडूंनी उत्तेजकाचे सेवन कसे केले, याची सखोल तपासणी आवश्‍यक आहे. 
- नवीन अगरवाल, राष्ट्रीय उत्तेजक प्रतिबंधक संस्थेचे संचालक