INDvsAUS : शतक हुकलं तरी कोहलीचं ठरलाय 'किंग'!

टीम ई-सकाळ
Sunday, 19 January 2020

तिसऱ्या वनडे सामन्यात 89 धावांची अर्धशतकी खेळी करणाऱ्या विराटला 'मॅन ऑफ द सिरीज'ने गौरविण्यात आले आहे.

बंगळूर : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने केलेल्या महत्त्वपूर्ण 89 धावांची अर्धशतकी खेळी संघाला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची ठरली. त्याला सलामीवीर रोहित शर्माने दणदणीत शतक ठोकत चांगली साथ दिली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

रोहित आणि विराटने चौफेर टोलेबाजी केली. त्यामुळे तिसऱ्या आणि अखेरच्या वन-डे सामन्यात 7 विकेटने विजय मिळवत भारताने मालिका 2-1 ने खिशात घातली. 

- INDvsAUS : रोहितने रचला पाया, कोहलीने चढवला कळस; भारताने मालिका घातली खिशात!

रोहितचा अडथळा झॅम्पाने दूर केल्यानंतर डावाची सूत्रे विराटने आपल्या हाती घेतली. श्रेयस अय्यरला सोबत घेत त्याने भारताला विजयाच्या जवळ नेलं. मात्र, हेजलवूडला जोरदार फटका मारण्याच्या नादात त्याचा बोल्ड उडाला. आणि त्याचे शतकही हुकले. 

मात्र, या खेळीतही त्याने अनेक विक्रम मोडीत काढले आहेत. एकीकडे रोहित शर्माने अनेक नवे विक्रम रचण्यास सुरवात केल्यानंतर दुसऱ्या बाजूने कर्णधार विराट कोहलीनेही आपल्या नावावर अनेक विक्रम नोंदवले आहेत. वनडे क्रिकेटमध्ये सर्वात जलद 5000 धावांचा टप्पा गाठत विराट अव्वलस्थानी विराजमान झाला आहे. हा विक्रम त्याला आपल्या नावे करण्यासाठी केवळ 17 धावांची आवश्यकता होती. त्याने हा कारनामा केवळ 81 डावांमध्ये गाठला आहे.

याआधी भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी (127 डाव), ऑस्ट्रेलियाचा रिकी पाँटिंग (131 डाव), दक्षिण आफ्रिकेचा ग्रॅमी स्मिथ (135) आणि भारताच्या सौरव गांगुली (136 डाव) आणि मोहम्मद अझरुद्दीन (151 डाव) यांनी अशी कामगिरी बजावली आहे. 

- INDvsAUS : 'शर्माजी का बेटा छा गया'; रोहितने शतकी खेळीत केले 5 विक्रम!

आणखी एक म्हणजे, विराटने 89 धाव घेताच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा भारतीय कर्णधार तो ठरला आहे. विराटला हा कारनामा करण्यासाठी 172 सामने खेळावे लागले आहेत. यामध्ये त्याने 11208 धावा केल्या आहेत. तर माजी कर्णधार असलेल्या महेंद्रसिंह धोनीच्या नावावर 11207 धावा जमा आहेत. पण, यासाठी धोनीला 332 सामने खेळावे लागले आहेत. 

यामध्ये ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग अव्वलस्थानी आहे. त्याने 324 सामन्यांत 15444 धावा केल्या आहेत. दक्षिण आफ्रिकेचा ग्रॅमी स्मिथ (14878 धावा) आणि न्यूझीलंडचा स्टीफन फ्लेमिंग (11561 धावा) हे अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यापाठोपाठ आता विराटचा चौथ्या स्थानी विराजमान झाला असून या सर्वांचे विक्रम तो येत्या काही दिवसांत मोडेल, असा विश्वास सर्व क्रिकेटप्रेमींना आहे. 

- INDvsAUS : 'बुमरासारखी बॉलिंग करतो, मग दे पुरावा'; ICCचं ट्विट व्हायरल!

दरम्यान, तिसऱ्या वनडे सामन्यात 89 धावांची अर्धशतकी खेळी करणाऱ्या विराटला 'मॅन ऑफ द सिरीज'ने गौरविण्यात आले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: INDvsAUS Indian skipper Virat Kohli brake former captain MS Dhoni record