
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने ३ जूनच्या रात्री इतिहास घडवला. त्यांनी इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पंजाब किंग्सला पराभूत करत १८ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर आयपीएलची ट्रॉफी पहिल्यांदा उंचावली. बंगळुरू आयपीएलचे आठवे आणि नवे विजेते ठरले.
अंतिम सामन्यावेळी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर बंगळुरूचे माजी क्रिकेटपटू एबी डिविलियर्स आणि ख्रिस गेल हे देखील उपस्थित होते. या दोघांनीही बंगळुरूच्या संघासाठी मोठे योगदान दिले आहे. त्यामुळे ज्यावेळी बंगळुरूने विजेतेपद जिंकले, त्यानंतर विराट कोहलीने या दोघांच्याही हातत विजेतेपदाची ट्रॉफी देत सेलिब्रेशन केले.
डिविलियर्स हा विराटचा मैदानाबाहेरही खास मित्र आहे. ज्यावेळी अंतिम सामन्यातील शेवटची षटके सुरू होती त्यावेळी डिविलियर्स बाऊंड्री लाईनच्या बाहेर उभा होता. त्यावेळी मैदानात क्षेत्ररक्षण करणाऱ्या विराटची त्याच्यावर नजर गेली तेव्हा दोघेही भावूक झाल्याचे दिसले. तसेच विजेतेपदानंतरही दोघांच्या डोळ्यात पाणी होतं.