

शनिवारी (१२ एप्रिल) इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेत झालेला सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध पंजाब किंग्स सामना २४ वर्षांच्या अभिषेक शर्माने गाजवला. त्याने या सामन्यात हैदराबादसाठी आक्रमक शतक ठोकत संघाला दुसरा विजयही मिळवून दिला.
राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात हैदराबादने पंजाबने दिलेलं २४६ धावांचे लक्ष्य यशस्वी पार करत ८ विकेट्स आणि ९ चेंडू राखून विजय मिळवला.
हैदराबादसाठी या सामन्यात अभिषेकने तब्बल १४ चौकार आणि १० षटकारांचा पाऊस पाडत ५५ चेंडूत १४१ धावांची खेळी साकारली. त्याने सलामीला ६६ धावा करणाऱ्या ट्रॅव्हिस हेडसोबत १७१ धावांची भागीदारी केली.