
रॉयल चॅलेंजर्स बंगळूर संघाने मंगळवारी आयपीएलच्या अंतिम फेरीत पंजाब किंग्सला सहा धावांनी पराभूत करीत पहिल्यांदाच विजेता होण्याचा मान संपादन केला.२००८ पासून सुरु झालेल्या या स्पर्धेत बंगळूरला पहिल्यांदाच अजिंक्यपदाला गवसणी घालता आली.
पंजाब संघाला २०१४नंतर पुन्हा एकदा उपविजेतेपदावरच समाधान मानावे लागले. त्यामुळे रजत पाटिदार हा बंगळुरूचा आयपीएल विजेतेपद जिंकणारा पहिला कर्णधार ठरला. तसेच त्याने विजयानंतर हे विजेतेपद विराट कोहलीसाठी असल्याचे सांगितले.
कारण, विराट गेली १८ वर्षे या संघाकडून खेळत आहे. त्याने यापूर्वी या संघाकडून ३ अंतिम सामने खेळले होते. पण त्याला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. पण चौथ्या प्रयत्नात त्याला विजेता होण्याचा मान मिळाला.