
IPL 2022: हैदराबादचा दोन पराभवानंतर ब्रेबॉर्न स्टेडियमवर दिल्लीशी सामना
IPL 2022 Today Match: केन विल्यमसनच्या नेतृत्वात मैदानात उतरणाऱ्या सनरायझर्स हैदराबादसाठी आयपीएलचा यंदाचा मोसम चढ-उताराप्रमाणे राहिला आहे. पहिल्या दोन लढतींत पराभूत झाल्यानंतर या संघाने सलग पाच सामन्यांत विजय मिळवले. पण विजयाची मालिका कायम असतानाच त्यांना सलग दोन पराभवांना सामोरे जावे लागले. याच पार्श्वभूमीवर आता सनरायझर्स हैदराबादचा संघ आज ब्रेबॉर्न स्टेडियमवर होणाऱ्या लढतीत दिल्ली कॅपिटल्सशी लढेल. यावेळी सनरायझर्स हैदराबादला सहाव्या, तर दिल्ली कॅपिटल्सला पाचव्या विजयाची आस लागली असेल. दोन्ही संघांचे लक्ष्य यावेळी पुनरागमन करण्याचे असणार आहे. (Delhi Capitals and Sunrisers Hyderabad)
हेही वाचा: RCB सोबत 'प्रामाणिक' तर मुलीशी पण प्रामाणिक' थेट स्टेडिअममध्ये प्रपोज
अभिषेक शर्मा (३२४ धावा) व विल्यमसन (१९५ धावा) या सलामी जोडीकडून हैदराबादला मोठी अपेक्षा आहे. विल्यमसनला अद्याप म्हणावा तसा सूर गवसलेला नाही. पण तो केव्हाही फॉर्ममध्ये येऊ शकतो. एडन मार्करम (२६३ धावा), राहुल त्रिपाठी (२२८ धावा), निकोलस पूरण (१८० धावा) यांच्या खांद्यावर हैदराबादच्या फलंदाजीची मदार असणार आहे. मात्र या सर्वांकडून यापुढे सातत्यपूर्ण कामगिरी होणे गरजचे आहे.
हैदराबादकडे अव्वल दर्जाचे गोलंदाज उपलब्ध आहेत. भुवनेश्वर कुमार (९ बळी), टी. नटराजन (१७ बळी), उमरान मलिक (१५ बळी), मार्को यान्सेन (६ बळी) या वेगवान चौकडीने ठसा उमटवला आहे. पण प्रत्येक सामन्यात हे चारही गोलंदाज एकत्रितपणे छान कामगिरी करतील, अशी आशा करणे चुकीचे ठरेल. त्यामुळे वॉशिंग्टन सुंदर, शशांक सिंग, मार्करम यांनीही गोलंदाजीत चमक दाखवायला हवी.
हेही वाचा: RCB vs CSK : आरसीबीचा विजय; चेन्नईच्या प्ले ऑफची आशा मावळली
दिल्ली संघातील फलंदाज फॉर्ममध्ये आहेत; पण या संघातील फलंदाजांच्या कामगिरीत सातत्याचा अभाव दिसून येत आहे. त्यामुळे आतापर्यंत झालेल्या ९ सामन्यांमधून त्यांना ४ लढतींमध्येच विजय मिळवता आला आहे. पृथ्वी शॉ (२५९ धावा), डेव्हिड वॉर्नर (२६४ धावा), रिषभ पंत (२३४ धावा) या प्रमुख फलंदाजांकडून उर्वरित लढतींमध्ये अपेक्षा आहेत. रोवमन पॉवेल (१३५ धावा), ललित यादव (१३७ धावा), अक्षर पटेल (१४५ धावा) यांनीही फलंदाजीत चुणूक दाखवली आहे. उद्या या सर्व फलंदाजांना हैदराबादच्या वेगवान गोलंदाजांचे आव्हान परतवून लावावे लागणार आहे.
कुलदीपचा ठसा
डावखुरा फिरकी गोलंदाज कुलदीप यादवसाठी आयपीएलचा मोसम लाभदायक ठरत आहे. त्याने आतापर्यंत १७ फलंदाज बाद केले आहेत. त्यामुळे ही स्पर्धा त्याच्यासाठी नवसंजीवनी देणारी ठरली आहे. या वर्षीच्या टी-२० विश्वकरंडकासाठी त्याच्या नावाचा विचार भारतीय संघासाठी होऊ शकतो. खलील अहमद (११ बळी), मुस्तफिजूर रहमान (८ बळी) यांना उद्या हैदराबादच्या फलंदाजांना रोखावे लागणार आहे. शार्दूल ठाकूर (७ बळी) व अक्षर पटेल (४ बळी) या दोन आंतरराष्ट्रीय खेळाडूंना प्रतिमेला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. या दोघांनी चमकदार कामगिरी केल्यास दिल्लीसाठी ही हितकारक बाब ठरू शकते.
हेही वाचा: BCCI च्या निर्णयामुळे भविष्यातील 'अशा' घटनांना चाप बसेल : अजहरूद्दीन
प्रत्येक सामना जिंकावा लागेल - वॉर्नर
दिल्ली कॅपिटल्सचा सलामी फलंदाज डेव्हिड वॉर्नर यावेळी म्हणाला, आयपीएलचा मोसम सध्या मध्यावर आला आहे. आतापर्यंत आम्ही चार सामने जिंकले आहेत. या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी आम्हाला पुढील सर्व लढतींमध्ये विजय मिळवणे आवश्यक आहे. पंजाब किंग्ज व सनरायझर्स हैदराबाद या दोन संघांची परिस्थिती आमच्यासारखीच आहे. आम्ही उद्याच्या लढतीत सनरायझर्स हैदराबादला हरवल्यास अंतिम चारमध्ये आमचा संघ पोहचू शकतो. अर्थात रॉयल चॅलेंजर्स बंगळूरच्या लढतींवरही आम्हाला लक्ष द्यावे लागणार आहे, असेही वॉर्नरने आवर्जून नमूद केले.
Web Title: Ipl 2022 Today Match Dc Vs Srh Delhi Capitals And Sunrisers Hyderabad
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..