
इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेत शनिवारी (१२ एप्रिल) राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेला २७ वा सामना विक्रमी ठरला. तब्बल ४९० हून अधिक धावांचा पाऊस पडलेल्या या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने पंजाब किंग्सविरुद्ध ८ विकेट्स आणि ९ चेंडू राखून विजय मिळवला. या सामन्यात सनरायझर्स हैदराबादकडून २४ वर्षीय अभिषेक शर्माने शतकही ठोकले.
या सामन्यात पंजाब किंग्सने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ६ बाद २४५ धावा ठोकल्या होत्या. पंजाब किंग्सकडून कर्णधार श्रेयस अय्यरने ३६ चेंडूत ८२ धावांची खेळी केली, ज्यात त्याने ६ चौकार आणि ६ षटकार मारले. त्यानंतर २४६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग सनरायझर्स हैदराबादने १८.३ षटकात २ विकेट्स गमावत २४७ धावा करत पूर्ण केले.