
इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेत सोमवारी (२१ एप्रिल) गुजरात टायटन्सने कोलकाता नाईट रायडर्सला त्याच्याच घरच्या मैदानात ३९ धावांनी पराभूत केले. ईडन गार्डन्सवर झालेल्या या सामन्यातही गेल्या सामन्याप्रमाणेच कोलकाताची फलंदाजांनी निराशा केल्याचे दिसले. गेल्या सामन्यात पंजाबविरुद्ध ११२ धावांचाही पाठलाग करता आला नव्हता. या सामन्यातही त्यांना फार काही करता आले नाही.
कोलकाताचा हा ८ सामन्यांतील पाचवा पराभव आहे. तथापि, गुजरातने मात्र आपली वाटचाल प्लेऑफच्या दिशेने सुरू ठेवली आहे. गुजरातचा ८ सामन्यांतील ६ वा विजय आहे. त्यामुळे त्यांचे १२ गुण झाले आहेत. या हंगामात १२ गुण मिळणारा गुजरात पहिला संघ आहे. गुणतालिकेतही ते गेल्या काही दिवसांपासून पहिले स्थान राखून आहेत.
साधारणत: आयपीएलमध्ये पहिल्या १० सामन्यातच १२ गुण मिळवल्यानंतर संघांचे प्लेऑफमधील स्थान जवळपास पक्के मानले जाते. त्यामुळे आता गुजरात पुढेही चांगला खेळ करत प्लेऑफमध्ये तिसऱ्यांदा स्थान मिळणार का हे पाहावे लागणार आहे.