
इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेत मंगळवारी मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्स संघात वानखेडे स्टेडियमवर झालेला सामना पावसामुळे गाजला. दुसऱ्या डावात सातत्याने पावसाचा व्यत्यय आला. त्यामुळे सामना कधी मुंबईच्या कधी गुजरातच्या बाजूने झुकत होता. पण अखेर या सामन्यात गुजरातने डकवर्थ लुईस नियमानुसार ३ विकेट्सने रोमांचक विजय मिळवला.
हा सामना जिंकून गुजरातने ११ सामन्यांतील ८ विजयासह १६ गुण मिळवत पाँइंट्स टेबलमध्ये अव्वल क्रमांक मिळवला. मात्र सलग ६ विजयानंतर मुंबईला पराभवाचा धक्का बसला. त्यामुळे आता मुंबई १२ सामन्यांनंतर ७ विजय आणि ५ पराभवांनंतर १४ गुणांसह चौथ्या क्रमांकावर घसरले आहेत.
या सामन्यात १८ व्या षटकानंतर पावसाच्या व्यत्ययानंतर जेव्हा पुन्हा सामना सुरू झाला, त्यावेळी गुजरातसमोर विजयासाठी १९ षटकात १४७ असे आव्हान ठेवण्यात आला. म्हणजेच विजयासाठी पावसानंतर खेळ सुरू झाला, तेव्हा गुजरातला ६ चेंडूत १५ धावांची गरज होती. गुजरातने शेवटच्या चेंडूवर हे लक्ष्य पूर्ण करत विजय मिळवला.