
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने मंगळावारी इतिहास घडवला आहे. त्यांनी इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेत दुसऱ्या क्रमांकावर हक्क सांगताना क्वालिफायर १ सामन्याचं तिकीट पक्कं केलं. बंगळुरूने मंगळवारी एकाना क्रिकेट स्टेडियमवर लखनौ सुपर जायंट्स संघाला ६ विकेट्सने पराभूत केले.
या विजयासह आता बंगळुरूचे १४ सामन्यानंतर ९ विजयांसह १९ गुण झाले असून पंजाब किंग्स पाठोपाठ ते दुसर्या क्रमांकावर आहेत. लखनौचा मात्र शेवट कडू झाला. कर्णधार रिषभ पंतच्या शतकानंतरही लखनौला त्यांच्या शेवटच्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. लखनौ पाँइंट्स टेबलमध्ये ७ व्या क्रमांकावर राहिले.
या सामन्यात लखनौने बंगळुरूसमोर विजयासाठी २२८ धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग बंगळुरूने १८.४ षटकात ४ विकेट्स गमावत २३० धावा करून पूर्ण केला. अमरावतीचा जितेश शर्मा बंगळुरूसाठी हिरो ठरला.
त्याने कर्णधारपदाला शोभेल अशी दणदणीत अर्धशतकी खेळी केली. विराट कोहलीनेही अर्धशतक करत योगदान दिले. या विजयानंतर आता २९ मे रोजी बंगळुरूला पंजाब किंग्सविरुद्ध मुल्लनपूर येथे क्वालिफायर १ सामना खेळायचा आहे.