
भारत आणि पाकिस्तान या दोन देशातील तणाव सध्या वाढत असून युद्धजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. याचा फटका इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेलाही बसला. ८ मे रोजी धरमशाला येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर होणारा पंजाब किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स सामना १०.१ षटकानंतर अचानक रद्द करावा लागला होता.
सुरक्षेच्या कारणाने स्टेडियममधील फ्लडलाईट्सही बंद करण्यात आल्या होत्या. सुरुवातीला तांत्रिक समस्या कारण सांगण्यात आले होते. पण नंतर सुरक्षेच्या कारणाने हा सामना रद्द करण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट झाले होते.
त्यावेळी स्टेडियममध्ये जवळपास २५ हजार प्रेक्षक होते. त्यावेळी त्यांना स्टेडियममधून बाहेर जायला सांगितले होते, एकूण सर्व परिस्थिती कशी होती, याबाबत आयपीएलचे अध्यक्ष अरुण धुमाल यांनी खुलासा केला आहे.