LSG vs DC : मोहसीन खानने दिल्लीला गुंडाळले; लखनौ पोहचला दुसऱ्या स्थानावर | Mohsin Khan Impressive Bowling | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mohsin Khan Impressive Bowling Lucknow Super Giants defeat Delhi Capitals

मोहसीन खानने दिल्लीला गुंडाळले; लखनौ पोहचला दुसऱ्या स्थानावर

IPL 2022, DC vs LSG: लखनौ सुपर जायंटने (Lucknow Super Giants) शेवटच्या सामन्यापर्यंत रंगलेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा (Delhi Capitals) 6 धावांनी पराभव केला. लखनौने 20 षटकात 3 बाद 195 धावा ठोकल्या होत्या. मात्र दिल्लीने 20 षटकात 7 बाद 189 धावा केल्या. लखनौकडून केएल राहुलने सर्वाधिक 77 धावा केल्या. तर दिल्लीकडून शार्दुल ठाकूरने 3 विकेट घेतल्या. या धावांचा पाठलाग करणाऱ्या दिल्लीच्या फलंदाजीला मोहसीन खानने (Mohsin Khan) भेदक मारा करत सुरूंग लावला. त्याने 4 विकेट घेतल्या. दिल्लीकडून अक्षर पटेलने 24 चेंडूत 42 धावा करत एकाकी झुंज दिली.

लखनौ सुपर जायंटने ठेवलेल्या 195 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्सची सुरूवात खराब झाली. धावफलकावर 13 धावा लागल्या असतानाच त्यांचे दोन्ही सलामीवीर पॅव्हेलियनमध्ये परतले. पृथ्वी शॉला चमीराने 5 तर डेव्हिड वॉर्नरला मोहसीन खानने 3 धावांवर बाद केले. अवघ्या 13 धावांवर दोन्ही सलामीवीर माघारी गेल्यानंतर दिल्लीचा डाव मिशेल मार्श आणि कर्णधार ऋषभ पंतने सावरला. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 25 चेंडूत 60 धावांची भागीदारी रचली. मात्र कृष्णाप्पा गौतमने दिल्लीची जमलेली जोडी फोडली. त्याने मिशेल मार्शला 37 धावांवर बाद केले.

त्यानंतर ललित यादवचा रवी बिश्नोईचा त्रिफळा उडवत दिल्लीला अजून एक धक्का दिला. त्यानंतर मोहसीन खानने दिल्लीला एका पाठोपाठ एक धक्के देण्यास सुरूवात केली. त्याने दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंतचा 44 धावांवर असताना त्रिफाळा उडवला. त्यानंतर त्याने 21 चेंडूत 35 धावा करणाऱ्या रोव्हमन पॉवेलला बाद करत दिल्लीची अवस्था 6 बाद 146 धावा अशी केली. मोहसीन खानने दिल्लीचा धोकादायक अष्टपैलू खेळाडू शार्दुल ठाकूरला 1 धावेवर बाद केले. मोहसीन खानने दिल्लाचा चौथा फलंदाज गारद केला.

दरम्यान, अक्षर पटेलने झुंजार खेळी करत सामना 6 चेंडूत 21 धावा असा आणला. मात्र शेवटचे षटक टाकणाऱ्या स्टॉयनिसला कुलदीप यादवने पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकला. त्यामुळे सामना 5 चेंडूत 15 धावा असा आला. पुढचा चेंडू वाईट टाकल्याने हेच टार्गेट 5 चेंडूत 14 धावा असे आले. दरम्यान, कुलदीपने एक धाव करून स्ट्राईक अक्षर पटेलला दिले. 3 चेंडूत 13 धावांची गरज असताना स्टायनिसने दोन चेंडू निर्धाव टाकले. अखेर दिल्लीला एका चेंडूत 13 धावा असे अशक्यप्राय आले. अखेर अक्षरने षटकार मारला. मात्र सामना लखनौने 6 धावांनी जिंकला.

आयपीएलच्या 45 व्या सामन्यात लखनौ सुपर जायंटने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. लखनौला क्विटंन डिकॉकच्या रूपात पहिला धक्का बसल्यानंतर कर्णधार केएल राहुल आणि दीपक हुड्डा यांनी भागीदारी रचली.

या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 94 धावांची भागीदारी रचत संघाला शतकी मजल मारून दिली. केएल राहुल आणि दीपक हुड्डा (52) यांनी आपापली अर्धशतके देखील पूर्ण केले. मात्र हुड्डा अर्धशताकानंतर लगेचच बाद झाला. हुड्डा बाद झाल्यानंतर राहुलने डावाची सूत्रे आपल्या हातात घेतली. त्याने 51 चेंडूत 77 धावा चोपल्या. मात्र 19 व्या षटकात तो बाद झाला.

राहुल बाद झाल्यानंतर मार्कस स्टॉयनिस आणि क्रुणाल पांड्याने लखनौला 195 धावांपर्यंत पोहचवले. स्टोयनिसने 16 चेंडूत 17 धावा केल्या तर क्रुणाल पांड्याने 6 चेंडूत 9 धावा केल्या. दिल्लीकडून शार्दुल ठाकूरने तीन विकेट घेतल्या.