
इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेच्या लिलावात यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतने इतिहास रचला होता. त्याला सर्वाधिक २७ कोटी रुपयांमध्ये लखनौ सुपर जायंट्सने खरेदी केले होते. पण स्पर्धेत मात्र तो या किंमतीला साजेशी कामगिरी करू शकला नाही. याशिवाय त्याच्या नेतृत्वात लखनौ संघही ७ व्या क्रमांकावर राहिला.
पहिल्या १३ सामन्यात तर त्याला एकच अर्धशतक करता आले होते. पण शेवटच्या १४ व्या सामन्यात मात्र त्याने कमाल केली. मंगळवारी (२७ मे) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाविरुद्ध झालेल्या आयपीएल २०२५ च्या अखेरच्या सामन्यात पंतने खणखणीत शतक ठोकत टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिले.