esakal | ipl | आयपीएल विजेतेपदाचे सोने कोण लुटणार?
sakal

बोलून बातमी शोधा

CSK vs KKR

IPL 2021: आयपीएल विजेतेपदाचे सोने कोण लुटणार?

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

दुबई : कोरोनामुळे भारतात अर्धवट राहिलेल्या आयपीएलच्या दुसऱ्या अंकाचा उद्या समारोप होत आहे. भारतात उद्या सर्वत्र दसऱ्याचा सण साजरा होत असताना दुबईमध्ये विजेतेपदाचे सोने कोण लुटणार, याची उत्सुकता वाढली आहे. महेंद्रसिंह धोनीच्या चेन्नईला चौथ्यांदा, तर कोलकत्याला तिसऱ्यांदा विजेतेपदाची संधी आहे. दोन्ही संघांची ताकद कागदावर तरी समान आहे. चेन्नईकडे अनुभवाची शिदोरी मोठी आहे, पण अमिरातीत झालेल्या या दुसऱ्या टप्प्यात कोलकताची प्रगती थक्क करणारी ठरली आहे. तसेच काल ‘क्लॉलिफायर-२’ सामन्यात दिल्लीविरुद्ध कमालीचे चढ-उतार झाल्याने उद्याचा विजेता कोण? याचे भाकीत करणे कठीण आहे.

अमिरातीत येण्यापूर्वी कोलकताचा संघ भारतात झालेल्या अर्ध्या स्पर्धेत गटांगळ्या खात होता, मात्र येथे आल्यावर त्यांनी नऊ पैकी सात सामने जिंकून सर्वाधिक प्रगती केली आहे. ही आकडेवारी त्यांच्या पारड्यात वजन टाकणारी आहे, पण दडपणाखाली त्यांचाही संघ कच खाऊ शकतो, हे कालच्या सामन्यातून सिद्ध झाले.डावपेचात आणि अनुभवात निष्णांत असलेला धोनी नेमका याच संधीचा फायदा घेऊ शकतो. अंतिम सामन्याचे दडपण वेगळे असते आणि ते जिंकण्याचा अनुभव धोनीकडे अधिक आहे. कोलकताचा कर्णधार ऑईन मॉर्गनही इंग्लंडचा एकदिवसीय विश्वकरंडक विजेता कर्णधार आहे, पण आयपीएलमध्ये धोनीचे पारडे नेहमीच जड राहिले आहे.

हेही वाचा: अभिमानास्पद! 'टीम इंडिया'च्या जर्सीला 'बुर्ज खलिफा'वर स्थान

कोलकता गोलंदाज वि. चेन्नई फलंदाज

हा अंतिम सामना कोलकताची कसलेली गोलंदाजी विरुद्ध चेन्नईची फलंदाजी असा रंगू शकेल. वरुण चक्रवर्ती, सुनील नारायण, लॉकी फर्ग्युसन अशा तीन हुकमी अस्त्रांसमोर भल्याभल्या फलंदाजांची भंबेरी उडालेली आहे. सोबत शिवम मावी आणि शकिब अल हसन हे सुद्धा तेवढेच प्रभावी ठरत आहेत. चेन्नईच्या फाफ डुप्लेसी, ऋतुराज गायकवाड, मोईन अली, अंबाती रायडू यांच्याकडे कोलकताचे चक्रव्यूह भेदण्याची क्षमता आहे. आता तर रॉबीन उथप्पाही फॉर्मात आला आहे. स्वतः धोनीही मॅचविनरची क्षमता बागळून आहे, तर रवींद्र जडेजा आणि द्वेन ब्रावो यांच्याकडे झंझावात आणण्याची ताकद आहे. त्यामुळे अखेरच्या क्षणापर्यंत सामना रंगू शकेल. कोलकताच्या तुलनेत चेन्नईची गोलंदाजी तेवढी कसलेली नाही, परंतु उद्याचा सामना दुबईच्या स्टेडियममध्ये होत आहे. कोलकताने शारजातील संथ खेळपट्टीवर दोन विजय मिळवून अंतिम फेरी गाठली आहे. कोलकताला आता मानसिकतेत आणि व्यूहरचनेतही बदल करावा लागणार आहे.

हेही वाचा: IPL 2021: "फायनलमध्ये KKRने कर्णधारालाच संघातून बाहेर करावं"

आकडे बोलतात...

एकूण सामने २७

चेन्नईचे विजय १७, कोलकता विजयी ८

धावांची सरासरी : चेन्नई १५८ : कोलकता १५४.३

सर्वाधिक धावा : चेन्नई २२० : कोलकता २०२

निच्चांकी : चेन्नई ५५ : कोलकाता ६१

प्रथम फलंदाजी करताना विजय : चेन्नई ६ : कोलकता १

धावांचा पाठलाग करताना विजय : चेन्नई ११ : कोलकता ८

यंदाच्या स्पर्धेत आमिरातीत आमने सामने

शारजा आणि अबुधाबी - चेन्नई विजय २ : कोलकता १

दुबई स्टेडियम - चेन्नई विजय १ : कोलकता 0

loading image
go to top