बुद्धीबळातील छुप्या चाली रोखण्यासाठी ऑनलाईन देखरेख

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 5 मे 2020

मुंबईतील निर्माण चॅरीटेबल ट्रस्टने घेतलेली देशातील सर्वाधिक रकमेची ऑनलाईन ब्लिट्झ स्पर्धा उद्या (ता. 6) होणार आहे. मात्र या स्पर्धेच्यावेळी कोणत्याही स्पर्धकाने चिटींग करु नये यासाठी खास उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

मुंबई : मुंबईतील निर्माण चॅरीटेबल ट्रस्टने घेतलेली देशातील सर्वाधिक रकमेची ऑनलाईन ब्लिट्झ स्पर्धा उद्या (ता. 6) होणार आहे. मात्र या स्पर्धेच्यावेळी कोणत्याही स्पर्धकाने चिटींग करु नये यासाठी खास उपाययोजना करण्यात आल्या आहेत. स्पर्धा संपल्यावर स्पर्धेतील प्रत्येक चालीचा अभ्यास झाल्यावरच निकाल निश्चित करण्यात येणार आहेत. 

मोठी बातमी ः ऑलिंपिक समितीचे उपप्रमुख कोझो ताशीमा यांना कोरोनाची लागण

कोरोनाच्या आक्रमणामुळे सर्वच क्रीडा स्पर्धा बंद पडल्या आहेत. त्यामुळे ऑनलाईन बुद्धिबळ स्पर्धा सुरु झाल्या आहेत. अनेक स्पर्धक त्यात आपले कसब पणास लावतात. अर्थात सर्वांना हे मान्य नाही. बुद्धिबळ ऑनलाईन शिकण्यास काहीच हरकत नाही. त्यावरील प्रश्न सोडवा, पण ऑनलाईन स्पर्धा खेळू नका. यामुळे लागोपाठ स्पर्धा खेळण्याची सवय लागते. त्याचबरोबर काही जण फसवणूक करतात. त्यामुळे खेळावर परिणाम होतो. त्याचबरोबर ऑनलाईन स्पर्धा जलद (रॅपिड) आणि अतीजलद (ब्लिट्झ) या प्रकारात होतात, त्यामुळे खेळात सुधारणा होत नाही, असे पुणे जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष जोसेफ डिसूझा यांनी सांगितल्याचे वृत्त आहे. 

मोठी बातमी ः ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटपटूंना आयपीएलसाठी भारतात खेळण्याची परवानगी मिळणार का?

जान्हवी राहुल शाह यांच्या निर्माण चॅरीटेबल ट्रस्टन घेतलेल्या या ऑनलाईन स्पर्धेचा कालावधी उद्या सकाळी 8 पासून रात्री 9.30 पर्यंत आहे. ``आम्ही ही ऑनलाईन स्पर्धा चेस डॉट कॉम या संकेतस्थळाच्या सहकार्याने घेतली आहे. स्पर्धा संपल्यावर संकेतस्थळाची अँटी चिटींग कमिटी या स्पर्धेतील सर्व सामन्यांचे विश्लेषण करणार आहे. स्पर्धकांनी खेळताना कोणतीही बाह्य मदत घेतली नाही ना याचा अभ्यास करतात. हे काम संगणकाच्या मदतीने होत असले तरी त्यास 24 तास लागतात," असे जान्हवी यांनी सांगितले. 

मोठी बातमी ः युरो फुटबॉल स्पर्धा कधी होणार? वाचा!

दरम्यान, या स्पर्धेत रशिया, पोलंड, उझबेकिस्तान, पेरु यातील देशांसह एकंदर नऊ परदेशी खेळाडू सहभागी होतील. या स्पर्धेसाठी आत्तापर्यंत 225 प्रवेशिका आल्या आहेत, तर 260 स्पर्धक सहभागी होतील असा कयास आहे. स्वीस साखळी पद्धतीने होणाऱ्या या स्पर्धेत 16 ग्रँडमास्टर्स, 20 आंतरराष्ट्रीय मास्टर्स, 4 महिला आंतरराष्ट्रीय मास्टर्स, 3 फिडे मास्टर्स आणि 1 महिला फिडे मास्टर्सचा सहभाग आहे. या एक लाख बक्षिसाच्या स्पर्धेत नऊ वर्षाचे दहा खेळाडू आहेत, त्यावरुन स्पर्धेचा उत्साह लक्षात येतो. या स्पर्धेतील सर्वात बुजुर्ग देशातील दुसरे ग्रँडमास्टर प्रवीण ठिपसे असण्याची शक्यता आहे. 

ऑनलाईन स्पर्धेवेळी असलेला धोका
ऑनलाईन स्पर्धेच्यावेळी स्पर्धक संगणकावरुन प्रतिस्पर्ध्याबरोबर खेळतात, पण त्याचवेळी स्पर्धक अन्य अॅप सुरु ठेवतात. बुद्धिबळाचे अनेक ऑनलाईन अॅप आहेत. त्यावर स्पर्धकांना ते सर्वोत्तम चाली सूचवत असतात. स्पर्धक अनेकदा याचा उपयोग करताना काही जण सहकाऱ्यांची मदत घेतात,  त्यामुळे हे रोखण्याचा प्रयत्न आहे. अँटि चीटिंग कमिटी सामन्यातील चालींचा अभ्यास करताना विविध अॅपवरील सामन्यांच्या स्थितीत सर्वोत्तम चाल कोणती सूचवली असती याचे विश्लेषण करतील. अॅप अथवा संगणकीय कार्यक्रमाने सूचवलेली सर्वोत्तम चाली दिसल्यास खेळाडूंना कारवाई करण्यात येईल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: players will not be able to cheat in online chess competition