U19 World Cup : मराठमोळ्या अथर्व अंकोलेकरचा करिष्मा अन् न्यूझीलंडवर विजय!

टीम ई-सकाळ
Saturday, 25 January 2020

 रवी बिश्नोईने सर्वात जास्त 4 विकेट घेतल्या असल्या तरी चर्चा झाली अथर्व अंकोलेकरची. अंकोलेकरने 5 षटकात 28 धावा देताना तीन फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. 

24 जानेवारी हा दिवस संपूर्ण भारतातील स्पोर्ट्स लव्हर्ससाठी आनंदाचा ठरला. कारण भारतातील सर्वात लोकप्रिय खेळ क्रिकेट आणि आपला राष्ट्रीय खेळ असलेल्या हॉकीमध्ये भारतीय संघांनी विजय साजरे केले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

भारतीय क्रिकेट संघाचा कॅप्टन विराट कोहलीने न्यूझीलंडला पहिल्या टी-20 सामन्यात 6 विकेटने पराभव केला. तर दुसरीकडे भारतीय महिला हॉकी संघाने न्यूझीलंड महिला हॉकी संघा 4-0 ने धूळ चारली. 

आणखी एका सामन्यात भारतानेच न्यूझीलंडचा पराभव केला. अंडर-19 वर्ल्डकपमध्ये नाणेफेक जिंकत न्यूझीलंडने भारताला पहिल्यांदा फलंदाजीचे आमंत्रण दिले. सलामीवीर यशस्वी जैस्वाल (नाबाद 57), दिव्यांश सक्सेना (नाबाद 52) यांनी चांगली सुरवात केली. मात्र, वरुणराजाने हजेरी लावत सामन्यात अडथळा निर्माण केला. बराच वेळ मैदानावर तळ ठोकलेल्या वरुणराजाने निरोप घेतल्यावर पंच आणि सामनाधिकारी मैदानात उतरले. आणि त्यांनी 23 ओव्हरचा खेळ करण्याचे जाहीर केले.

- INDvsNZ : मॅच जिंकल्यावर विराट म्हणाला, '...त्या गोष्टींचा विचार करत बसलो की मन भरटकतं!'

टीम इंडियाने न्यूझीलंडसमोर विजयासाठी 193 धावांचे टार्गेट ठेवले होते. भारताने दिलेल्या टार्गेटचा सामना करण्यासाठी मैदानात उतरलेल्या न्यूझीलंडला 147 पर्यंतच मजल मारता आली. भारताच्या रवी बिश्नोई आणि मराठमोळा अथर्व अंकोलेकर या धडाक्यापुढे न्यूझीलंडचे खेळाडू टिकाव धरू शकले नाहीत. 

न्यूझीलंडच्या सलामीवीरांनी 53 धावांची पार्टनरशिप केल्यानंतर रवी बिश्नोईने ही जोडी फोडली आणि न्यूझीलंडचा पतनाला सुरवात झाली. बिश्नोई आणि अंकोलेकर यांनी एकापाठोपाठ न्यूझीलंडचे सात फलंदाज तंबूत पाठवले. बिश्नोईने 4, अंकोलेकरने 3, सुशांत मिश्रा आणि कार्तिक त्यागी यांनी 1-1 विकेट घेतल्या.

- टीम इंडियाचा 'टी-20 किंग' करणार कमबॅक!

... तरीही चर्चा अंकोलेकरचीच!

रवी बिश्नोईने सर्वात जास्त 4 विकेट घेतल्या असल्या तरी चर्चा झाली अथर्व अंकोलेकरची. अंकोलेकरने 5 षटकात 28 धावा देताना तीन फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. 

सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, त्याच्या उजव्या हाताच्या दोन बोटांना सरावादरम्यान दुखापत झाली होती. या दोन्ही बोटांना बँडेज लावून तो मैदानात उतरला. पहिल्या ओव्हरमध्ये 15 रन्स दिल्यानंतर जोरदार कमबॅक करत महाराष्ट्राच्या या पठ्ठ्याने तीन विकेट पटकावल्या. आणि कॅप्टन प्रियम गर्गचा विश्वासही सार्थ ठरवला.

- INDvsNZ : 200 पेक्षा जास्त रन्सचं टार्गेट गाठायचंय? डोण्ट वरी, राहुल आहे ना!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: U19 World Cup Atharva Ankolekar thrives under pressure and India celebrate solid win against New Zealand