Mahavir Jayanti 2024: जिओ और जिने दो...

क्रोध, मान, माया, लोभ हे चार दोष संसारी वृक्षवाढीला बाधक असतात. यावर जो विजय मिळवितो, तो महावीर होतो.
Mahavir Jayanti 2024:
Mahavir Jayanti 2024:Sakal

संदीप लांडगे

क्रोध, मान, माया, लोभ हे चार दोष संसारी वृक्षवाढीला बाधक असतात. यावर जो विजय मिळवितो, तो महावीर होतो. समाजामध्ये होत असलेल्या पशुहत्या, यज्ञामध्ये प्राणी बळी देणे, हे सर्व दुष्कार्य आहे. त्याचा जनमानसामध्ये प्रचार करून भगवान महावीरांनी ‘जिओ और जिने दो’ हा संदेश विश्वाला दिला आहे.

भगवान महावीर यांचा सर्वांत मोठा सिद्धांत म्हणजे अहिंसा आहे. त्यांच्या प्रवत्येक अनुयायाने अहिंसा, सत्य, आचौर्य, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह या पाच व्रतांचे पालन करावे, असे त्यांनी सांगितले. लोकांनी अहिंसेच्या मार्गावर चालावे, यावर त्यांचा भर होता.

नेहमी सत्य बोलावे आणि सत्याची कास धरून चालावी, अशी त्यांची शिकवण होती. लोकांनी प्रामाणिक असावे आणि चोरी करू नये, असे त्यांचे म्हणणे होते. कामुक सुखाला आणि भौतिक गोष्टींपासून दूर राहिले पाहिजे, अशी त्यांची शिकवण होती. अहिंसा हाच परम धर्म ही जैन विद्वानांची मुख्य शिकवण आहे.

  • जैन धर्माला जैन हे नाव कसे पडले?

जैन धर्म हा जिन किंवा जिनेन्द्र यांना आपले इष्ट मानतो. जिन ही कोणी व्यक्ती नसून गुणवाचक शब्द आहे. ज्याने आपल्या आंतरिक शत्रूंवर विजय मिळवला तो म्हणजे जिन. या जिनाने जो धर्म प्रतिपादित केला, त्या धर्माचे पालन करणारे म्हणजे जैन.

Mahavir Jayanti 2024:
Mahavir Jayanti 2024: तीर्थंकर भगवान महावीर
  • दिगंबर अन् श्वेतांबर पंथ

जैन समाजाचे चोविसावे आणि शेवटचे तीर्थंकर भगवान महावीर यांच्या प्रभावाने जैन धर्म वाढला. परंतु, त्यानंतरच्या काळात दोन विचार प्रवाह या धर्मात निर्माण झाले. त्याचे पर्यवसान दिगांबर व श्वेतांबर या पंथांमध्ये झाले.

दिगांबर पंथाचा विचारप्रवाह असा आहे, की जीवनाबद्दल कसलीही आसक्ती बाळगायची नाही, त्याचाच एक भाग म्हणून अंगवस्त्राचीही आसक्ती ठेवण्यात आली नाही, तर श्वेतांबर पंथाचा विचारप्रवाह असा आहे की, कोणत्याही प्राणिमात्रांची हत्या होणार नाही, याची काळजी घ्यायची. याच भावनेतूनच या पंथात श्वेत मुखपट्टी धारण केली जाते.

आपल्या कृतीतून कोणत्याही जिवाला त्रास पोचणार नाही, यासाठी हा पंथ आग्रही असतो. हे दोन्ही पंथ नेमके कधी निर्माण झाले, याबाबत मात्र मतमतांतरे आढळतात, असे जैनालॉजिस्ट सीमा झांबड यांनी सांगितले.

  • दिगंबर संप्रदाय

दिगंबर संप्रदायामध्ये मंदिरांमध्ये पुजल्या जाणाऱ्या तीर्थंकरांच्या मूर्ती विवस्त्र असतात. त्याप्रमाणेच दिगंबर पुरुष साधूही विवस्त्र राहतात. स्त्री साध्वी पांढऱ्या साड्या नेसतात. पायात काहीही घालत नाहीत.

दोन्ही पंथांमध्ये साधू-साध्वी चातुर्मासाचे दिवस सोडले, तर एकाजागी फार काळ राहू शकत नाहीत. त्यांना भिक्षा मागूनच खावे लागते व सतत फिरत राहावे (याला ‘विहार’ असे म्हणतात) लागते. हा विहार पायीच करायचा असतो. वाहनाचा वापर दोन्ही संप्रदायांतील साधू-साध्वी करू शकत नाहीत.

Mahavir Jayanti 2024:
Mahavir Jayanti 2024: महावीरांच्या तत्त्वज्ञानात स्त्री-पुरुष समानता
  • श्वेतांबर संप्रदाय

श्वेतांबर संप्रदायामध्ये मूर्तीच्या कमरेला करदोडा, अंगावर रत्नामाणिक फुले आदी शृंगार, डोळ्यांवर कृत्रिम चक्षू अशी सजावट असते. श्वेतांबर साधू पांढरी वस्त्रे शक्यतो लुंगी, धोतर व उपरणे घालतात. साध्वी घागरा-साडी अशी पांढरीच वस्त्रे घालतात. तोंडाला पांढरी कापडाची पट्टी लावतात. हातात काठी वापरतात.

  • एकूण तीन भेद

श्वेतांबर संप्रदायाचे एकूण तीन भेद आहेत. मूर्तिपूजक किंवा देरावासी मंडळी मंदिरांमध्ये जाऊन पूजाअर्चा करतात, तर स्थानकवासी मंडळी मूर्तिपूजा करत नाहीत. ते स्थानक म्हणजे जिथे साधू-साध्वी राहतात, तिथे जाऊन धार्मिक शिक्षण व चर्चा करतात. तिसरा भाग म्हणजे तेरापंथी हा पंथ स्थानकवासी संप्रदायातून फुटून निघालेला आहे.

या संप्रदायाचे स्वरूप बरेच संघटित आहे; कारण त्यांचे आचार्य एकच असतात. संपूर्ण संप्रदायावर त्यांचे नियंत्रण असते. तुलनेने श्वेतांबर आणि दिगंबर संप्रदायामध्ये साधूंचे अनेक संघ असतात. जैन धर्मात दिगंबर, श्वेतांबर मूर्तिपूजक, श्वेतांबर स्थानकवासी, श्वेतांबर तेरापंथी असे मुख्य चार संप्रदाय आढळतात. हे बाह्य भेद असले, तरी चोवीस तीर्थंकर, अहिंसा, अपरिग्रह, अनेकांत असे तत्त्वज्ञान, कर्त्या ईश्वराला न मानण्याचा सिद्धांत आणि शाकाहार हे सगळ्या संप्रदायामध्ये समान आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com