मोकळेपणाची ‘वाट’

मी स्वतः सायकॉलॉजिस्ट आहे. ‘वॉक इट आऊट, टॉक इट आऊट’ हा ग्रुप सुरू करण्याचा विचार माझ्या मनात आला तो माझ्या क्लाएंट्ससाठी.
walk it out talk it out group
walk it out talk it out groupsakal

- नेहा येवले, संस्थापिका, वॉक इट आऊट, टॉक इट आऊट ग्रुप

मी स्वतः सायकॉलॉजिस्ट आहे. ‘वॉक इट आऊट, टॉक इट आऊट’ हा ग्रुप सुरू करण्याचा विचार माझ्या मनात आला तो माझ्या क्लाएंट्ससाठी. मी २०१३ मध्ये फेसबुकवर हा ग्रुप सुरू केला. त्याच्यामागे मुख्य कारण होते ते माझे क्लाएंट्स.

जे मानसिक समस्यांना सामोरे जात आहेत, डिप्रेशनमधून जात आहेत, जे व्यायाम करत नाहीत, ज्यांना आपल्या आयुष्यात काहीतरी सकारात्मक बदल घडावा असे वाटते; ज्यांना कम्युनिटी सपोर्ट हवाय त्यांच्यासाठी हा ग्रुप सुरू केला होता. सुरुवातीला यामध्ये फक्त क्लाएंट्स होते; पण हळूहळू ओळखीचे, मित्र-मैत्रिणी असे बरेच लोक सामील व्हायला लागले. मग त्यानंतर मी ग्रुप पब्लिकली ओपन केला. ग्रुपचा मुख्य हेतू एकत्र येऊन वॉक करणे हाच होता.

शारीरिक आरोग्यासाठी लोक बरेच काही करत असतात; पण मानसिक आरोग्यासाठी काही करत नाहीत. हा ग्रुप सुरू केल्यानंतर वर्षभरातच त्याला चांगला प्रतिसाद मिळत गेला. माझ्यासोबत डॉ. अनुप किणीकर व अपर्णा डोळे हे दोघेही या ग्रुपचे काम बघतात. ग्रुपचा विस्तार वाढत गेला, तसे माझ्या लक्षात आले, की आपण या ग्रुपच्या माध्यमातून समाजासाठी काहीतरी करू शकतो.

त्यातूनच २०१६ मध्ये आम्ही दृष्टिहीन मुलांसाठी एक वॉक ठेवला होता, ज्यामध्ये मी स्वतः ५० किलोमीटर चालले होते. त्या वॉकमधून मिळालेली देणगी आम्ही एका संस्थेला दिली. त्यानंतर वृक्षारोपणाचे उपक्रम, रक्तदान, शालेय मुलांसाठी चालण्याबाबत जागृती असे उपक्रम आम्ही सुरू केले. ‘शाळेतल्या मुलांनी शाळेत चालत जायला हवे, ज्यांची दहावी-बारावी होते, त्यांना लगेच टू व्हीलर घेऊन न देता त्यांनी कॉलेज जवळ असेल, तर नक्कीच चालत जायला हवं,’ अशा प्रकारची जनजागृती आम्ही अनेक उपक्रमांतून करत होतो.

अनेक गरजूंना अनेक प्रकारची मदत हवी असते. या ग्रुपच्या माध्यमातून आम्ही तीही उभी करत असतो. चालणे हा मूळ हेतू असला, तरी ग्रुपच्या माध्यमातून आम्ही सामाजिक उपक्रमही राबवत असतो. आमचा एक व्हॉट्सॲप ग्रुप आहे, ज्यावर तीनशे ते चारशे सदस्य आहेत. त्यावर लोक रोज किती चाललो, हे पोस्ट करतात; तसेच फेसबुकवरही पोस्ट करतात.

महिन्यातून एकदा तळजाई, विद्यापीठ परिसर, पर्वती अशा एखाद्या ठिकाणी आम्ही एकत्रित वॉक करतो. आता त्या त्या ठिकाणचे बरेच सबग्रुप्स पडले आहेत. एकत्र वॉकसाठी आम्ही वेगवेगळ्या थीम्स ठरवतो, जेणेकरून आणखी रस वाढेल. उदाहरणार्थ, स्त्रिया साड्या नेसून येतात, तर पुरुष सदरा- पायजमा असे पारंपरिक पोशाख करून येतात.

आम्ही फेसबुकवर जवळजवळ २१ हजार लोक एकत्र आहोत आणि त्यामध्ये सात ते आठ हजार लोक हे पुण्यातून जोडलेले आहेत. आमच्या ग्रुपचा विस्तार हळूहळू वाढला; पण त्याचे काम कधीही थांबले नाही. महिलांबरोबरच पुरुषांचाही चांगला प्रतिसाद आहे. परदेशातले लोकही यामध्ये सामील झालेले आहेत. बरेच लोक एकमेकांना भेटलेलेसुद्धा नसले, तरी एकमेकांबरोबर मैत्रीचे दृढ नाते अनेकांमध्ये निर्माण झाले आहे.

त्यामुळेच मला असे वाटते, की ग्रुपचा अजून जास्त विस्तार व्हायला हवा, ज्यामुळे आरोग्याविषयी जागरूकता पसरवता येईल. गेल्या दोन ते तीन वर्षांत बऱ्याच लोकांना खूप संकटांना तोंड द्यावे लागले, त्यावेळी ग्रुपमध्ये अनेकांनी एकमेकांना हवी ती मदत केली होती. एक समांतर कुटुंबच यातून तयार झाले आहे.

बऱ्याच लोकांना व्यवसायातही मदत ग्रुपच्या माध्यमातून मिळते. तळजाईमध्ये आम्ही एक वॉकॅथॉन केली होती, जिच्यात सातशे ते आठशे लोक सहभागी झाले होते. असाच एक मोठा वॉकॅथॉन भविष्यात करण्याची इच्छा आहे.

मला सर्वांना सांगावेसे वाटते, की सर्वांनी चालावे. ते सहज जमते, त्यासाठी पैसे लागत नाहीत आणि त्याच्यासारखा उत्तम व्यायाम नाही. किमान रोज एक तास तरी तुम्ही चालायला हवे. चालणे हे अनेक आजारांवरचे औषध आहे.

(शब्दांकन : प्रियांका सत्यवान)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com