
How modern couples are redefining arranged marriage culture: मुलगी पाहण्याचा कार्यक्रम म्हंटला की कांदेपोहे आलेच. या कार्यक्रमात इच्छुक तरुण-तरुणीला एकांतवासात बोलणे सोडाच, परंतु धडाचे बघता सुद्धा येत नव्हते. अर्थात, घरातील थोरामोठ्यांचा असलेला धाक. परंतु, आजच्या या फास्ट युगात इच्छुक तरुण-तरुणी कांदेपोह्यांच्या टिपिकल कार्यक्रमाऐवजी प्री-वेडिंग डेटला अधिक पसंती देत आहेत. कुटुंबीयांना भेटण्यापूर्वी एखाद्या हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये मुलांच्या या भेटी होतात.
मराठी संस्कृतीत लग्न ठरविण्याची प्रक्रिया कायमच वैशिष्ट्यपूर्ण राहिली आहे. पारंपरिक पद्धतीने मुलगा आणि मुलगी पाहण्याचा कार्यक्रम, त्यानंतर कांदेपोह्याचा समारंभ आणि मग साखरपुडा अशी प्रक्रिया पुढे सरकत असे. मात्र, आधुनिक काळात तरुण-तरुणींच्या विचारसरणीत बदल झालाय. लग्नापूर्वी एकमेकांना समजून घेण्यासाठी आणि परस्परांमधील नात्यांचा अदाज लावण्यासाठी तरुण-तरुणी ‘प्री-व्हेडिंग डेटिंग’चा पर्याय निवडत आहेत. हा ट्रेंड नागपूरसह विशेषतः शहरी भागात झपाट्याने लोकप्रिय होत आहे.
या भेटींमुळे दोघांना स्वभावाबद्दल आणि विचारांबद्दल माहिती होण्यास मदत होत असल्याने हा ट्रेंड केवळ तरुणांपुरता मर्यादित नाही. अर्थात, कुटुंबीयांची त्याला सहमती असतेच. पालकांनाही हळूहळू याची सवय होत आहे. काही पालकांना अजूनही या नव्या पद्धतीबद्दल संकोच वाटतो. परंतु, बदललेल्या काळानुसार मुलांना एकमेकांना ओळखण्यासाठी वेळ हवा आहे. मुले भेटतात, ठीक आहे. पण, कुटुंबाला विश्वासात घेऊनच पुढे जातील, याची त्यांना खात्री असते.
हा ट्रेंड मराठी समाजातील बदलत्या सामाजिक आणि सांस्कृतिक मूल्यांचे द्योतक आहे. आधुनिक मराठी तरुणाई आता केवळ पारंपरिक पद्धतींवर अवलंबून न राहता, स्वतःच्या जीवनसाथीच्या निवडीत सक्रिय सहभाग घेत आहे. मॅट्रिमोनियल साइट्स आणि ॲप्सच्या वाढत्या वापरामुळेही हा ट्रेंड अधिक बळकट होत आहे. या ॲप्सवरून प्रोफाइल्स निवडल्यानंतर तरुण-तरुणी स्वतःच भेटी ठरवतात आणि त्यानंतरच पुढील पावले उचलली जातात.
प्री-व्हेडिंग डेटिंग म्हणजे लग्न ठरविण्यापूर्वी मुलगा आणि मुलगी एकमेकांना भेटून संवाद साधतात, एकमेकांच्या आवडी-निवडी, जीवनशैली, आणि भविष्यकालीन अपेक्षा समजून घेतात. या भेटी सहसा कॅज्युअल (अनौपचारिक) वातावरणात, जसे की हॉटेल, कॅफे, किंवा रेस्टॉरंटमध्ये होतात. यामुळे, दोघांनाही एकमेकांशी मोकळेपणाने बोलण्याची संधी मिळते आणि लग्नासारख्या महत्त्वाच्या निर्णयापूर्वी परस्पर सुसंवाद निर्माण होतो. या भेटींना ‘प्री-वेडिंग डेट’ असे म्हटले जाते. या भेटीनंतर जर दोघांचाही सकारात्मक प्रतिसाद असेल, तरच पुढे कांदेपोह्याचा कार्यक्रम ठरतो.
नागपूरसह मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद यांसारख्या शहरी भागात हा ट्रेंड विशेषतः लोकप्रिय होत आहे. आजच्या तरुण पिढीला लग्नापूर्वी एकमेकांना ओळखण्यासाठी वेळ हवा असतो. त्यामुळे मुलगा किंवा मुलगी पाहण्याच्या एकाच भेटीत सर्व काही ठरविणे कठीण आहे. प्री-वेडिंग डेटमुळे दोघांना एकमेकांना समजून घेण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो, अशी दोघांची भावना असते. हॉटेल्स आणि कॅफेमधील या भेटी तरुण-तरुणींना तुलनेने मोकळ्या आणि तणावमुक्त वातावरणात संवाद साधण्याची संधी देतात. यामुळे पारंपरिक पद्धतीने होणाऱ्या औपचारिक भेटींमधील अवघडलेपणा कमी होतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.