
Stress Free Life : दहावी, बारावी बोर्डाला मुलं घाबरतायंत? असे ठेवा मुलांना स्ट्रेस फ्री!
मुलांची परीक्षा असते तेव्हा घरातले सदस्यही नकळत त्याचा भाग होऊन जातात. त्यातही दहावी बारावी बोर्डाची परीक्षा असेल तर विचारच करायला नको. मुलांचा अभ्यास, त्यांच्या पूर्वपरीक्षा, वह्या, पुस्तके एवढेच काय तर त्यांच्या पेन पेन्सिलची काळजीही पालक घेतात. पण, काहीवेळा मुलांना या गोष्टींची नाही तर पालकांच्या आधाराची गरज जास्त असते.
मुलांना सर्वात जास्त काळजी असते पहिल्यांदा सामोरे जावे लागणाऱ्या बोर्डाची. मनाला हुरहुर लागणे ही स्वाभाविक गोष्ट आहे. परंतु काहीवेळा ती खूप तणावपूर्ण बनते. तर, काही विद्यार्थ्यांमध्ये ती भीतीचे कारणही बनते. काही मुले त्याचा इतका विचार करतात की त्या चिंतेचे रूपांतर फोबियामध्ये होते.
मुलांना परीक्षेत तणतणावापासून दुर ठेवण्यासाठी पालकांनाही काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात. परीक्षेदरम्यान भीती, चिंता, भीती आणि अस्वस्थता यांचाही विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर आणि स्मरणशक्तीवर परिणाम होतो. विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षा फोबियाचा धोका जास्त असतो.या गोष्टीचा त्यांच्या मार्कलिस्टवरही परिणाम होतो. म्हणूनच जाणून घेऊया परीक्षेच्या काळात कोणत्या गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे.
घरात चांगले वातावरण ठेवा
मुलांनी शांत मनाने परीक्षेला सामोरे जावे, यासाठी घरातील वातावरणही शांत असणे आवश्यक आहे. घरात तणावविरहीत आणि आनंदाचे वातावरण ठेवा. तणावपूर्ण वातावरणात अभ्यास करणारे विद्यार्थी कधीही चांगली कामगिरी करू शकत नाहीत.
मुलांना मोकळीक द्या
मुलांवर दबाव टाकू नका. त्यांना त्यांच्या मुडनूसार अभ्यास करू द्या. बोर्डाची परीक्षा जीवनातील महत्त्वाचा टप्पा असला तरी ती शेवटची परीक्षा नक्कीच नाही. त्यामूळे ‘करा किंवा मरा’ अशा कचाट्यात मुलांना नक्कीच टाकू नका. त्यांची इतर मुलांशी तुलना करू नका.
मार्क सर्व काही नसतात
परीक्षेआधी मुलांशी गप्पा मारा. त्यांना मार्क कमी पडले तरी फार काही फरक पडणार नाही, असे सांगा. कारण, अनेक लोक आहेत जे अभ्यासात हुशार नाहीत परंतू जीवनात यशस्वी बनले आहेत. त्यामूळे मुलांना मार्कांसाठी अभ्यास करू नको तर झेपेल तेवढाच अभ्यास कर असे सांगा.
मनोरंजन आणि खेळ
काही घरात वडिलधारे लोक इतके कडक स्वभावाचे असतात की, मुले दहावीला गेली की ते टीव्ही, मोबाईलपासून त्यांना दूर ठेवतात. आणि खेळण्यापासूनही रोखतात. पण, असे करू नका. एक जागरूक पालक म्हणून मुलांना अभ्यासाबरोबर खेळाचेही महत्त्व पटवून द्या. सध्या खेळांनाही करीअर बनवता येते, असे ही मुलांच्या मनावर बिंबवा.
जागरण आणि रट्टा मारणे
शालेय विद्यार्थ्यांना 8 तासांपेक्षा जास्त झोप घेणे आवश्यक आहे. त्यामूळे रात्रभर जागे राहण्यापेक्षा पुरेशी झोप घेऊन अभ्यास करणे कधीही फायद्याचे ठरते. रात्रीची चांगली झोप मनाला ताजे आणि उत्साही ठेवते. उजळणी करण्यासाठी रात्रभर जागून राहण्याऐवजी सकाळी लवकर उठून अभ्यास करा.
खाण्यात तडजोड करू नका
अभ्यास करण्याच्या नादात जेवणाकडे दुर्लक्ष करू नका. तसेच, किंवा ताण कमी करण्यासाठी खूप जास्त खाणे या दोन्हीचे दुष्परिणाम आहेत. सकस संतुलित आहार घ्या. त्यामुळे वाचन सोपे होईल आणि आळसही टाळता येईल. अक्रोड-बदाम-भोपळा किंवा सूर्यफुलाच्या बियांचे सेवन जरूर करा.