जिथे शाळा तिथे दहावी, बारावीच्या परीक्षा होणार; कोरोनामुळे बोर्डाकडून प्रत्येक शाळेला केंद्र मिळण्याची शक्यता

संदीप लांडगे
Saturday, 16 January 2021

यंदा कोरोनामुळे या परीक्षा फिजिकल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करून घ्याव्या लागणार आहेत. त्यामुळे परीक्षा केंद्रात वाढ होणार आहे.

औरंगाबाद : दहावी, बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेला दरवर्षी विद्यार्थी संख्या मोठ्या प्रमाणात असते. यंदा कोरोनामुळे या परीक्षा फिजिकल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करून घ्याव्या लागणार आहेत. त्यामुळे परीक्षा केंद्रात वाढ होणार आहे. जिथे शाळा तिथे परीक्षा घ्यावी लागणार असल्याचे बोर्डातील अधिकाऱ्यानी सांगितले.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दरवर्षी फेब्रुवारी-मार्चमध्ये दहावी-बारावीच्या परीक्षा घेण्यात येतात.

यासाठी प्रत्येक वर्गात २५ विद्यार्थी याप्रमाणे केंद्राची निवड केली जाते. साधारणतः दरवर्षी दहावी, बारावीच्या परीक्षेला औरंगाबाद विभागातून साडेतीन लाख विद्यार्थी प्रविष्ट होतात. मागील वर्षी विभागातून दहावीच्या परीक्षेला एक एक लाख ८६ हजार ६६ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते, त्यासाठी ६१६ परीक्षा केंद्रांची निवड करण्यात आली होती. तर बारावीच्या परीक्षा ३८८ केंद्रावर झाली होती.

त्यासाठी एक लाख ६८ हजार ४२३ विद्यार्थी बसले होते. कोरोनामुळे यंदा दहावी, बारावीच्या परीक्षा घेण्यासाठी मंडळाला तारेवरची कसरत करावी लागणार आहे. कोरोनामुळे यावर्षी फिजिकल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करीत परीक्षा पार पाडावी लागणार आहे. यासाठी प्रत्येक वर्गात २५ ऐवजी फक्त १२ किंवा तेरा विद्यार्थ्यांना बसावे लागणार आहे. त्यामुळे परीक्षा केंद्रात मोठ्या प्रमाणात वाढ होऊ शकते. परिणामी, परीक्षा केंद्रावरील कर्मचाऱ्यांमध्ये देखील वाढ करावी लागणार आहे. त्यामुळे यंदा जिथं शाळा तिथं परीक्षा घेण्याचे नियोजन बोर्डाकडून करण्यात येत असल्याचे मंडळातील अधिकाऱ्याने सांगितले.

औरंगाबादच्या ताज्या बातम्या वाचा

उन्हामुळे होणार परवड
शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी बारावीच्या परीक्षा १५ एप्रिलनंतर, तर दहावीच्या परीक्षा एक मेनंतर घेणार असल्याचे सांगितले आहे. या दोन महिन्यांत कडक उन्हाळा असतो. मराठवाडा, विदर्भात तापमान ४८ अंशांपेक्षा जास्त असते. ग्रामीण भागातील बहुतांश शाळेच्या खोल्या पत्र्याच्या असतात. अशावेळी तीन तास पेपर सोडवताना विद्यार्थ्यांचे हाल होणार आहेत. अनेक मुलामुलींना ग्रामीण भागातील केंद्रावर अडथळ्यांचा प्रवास करून पेपर देण्यासाठी केंद्रावर पोचावे लागते.  

 

Edited - Ganesh Pitekar

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: SSC, HSC Board Examination Centers To Be Increase Aurangabad Latest News