युतीच्या घोषणेबाबात काय म्हणाले उद्धव ठाकरे?

टीम ई-सकाळ
शनिवार, 28 सप्टेंबर 2019

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खळबळ उडाली आहे. तर, दुसरीकडे शिवसेना भाजप युतीचे तळ्यात मळ्यात सुरू आहे. 

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खळबळ उडाली आहे. तर, दुसरीकडे शिवसेना भाजप युतीचे तळ्यात मळ्यात सुरू आहे. आज, शिवसेनेने पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मेळावा घेतला. त्या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी युतीची घोषणा एक-दोन दिवसांत होईल, असे स्पष्ट केले. त्याचवेळी शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार, असा विश्वासही त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.

अजित पवारांसोबत फक्त सुनिल तटकरे?

पाच वर्षे संघर्षाची?
गेली पाच वर्षे शिवसेना सत्तेत होती. तरी देखील ही पाच वर्षे संघर्षाची होती, असे उद्धव ठाकरे म्हणाले. त्याचवेळी ‘मला या वेळी विधानसभेत सत्ता हवी आहे’, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी स्वतंत्र लढण्याचेही संकेत दिले. उद्धव ठाकरे म्हणाले, ‘महाराष्ट्रात पुरासारखी संकटे येतात. पण, माझे शिवसैनिक स्वतःला झोकून देऊन त्यामध्ये काम करत असतात. शेवटी मला दम द्यावा लागतो 'बाबा जरा आराम कर'. मला कोणाबद्दल वाईट बोलण्यात अजिबात आनंद वाटत नाहीत. जो आपल्या कर्माने मरणार आहे तर, त्यांना धर्माने मारू नका. गेली पाच वर्षे संघर्षाची होती त्यामध्ये तुम्ही माझ्या नेहमीसोबत राहिलात यासाठी सुद्धा आभार मानण्यासाठी मी तुम्हाला बोलवले आहे. नंदकुमार यांनी रक्ताने लिहिले होते की, मी मेलो तरी भगवा सोडणार नाही. असे शिवसैनिक आपल्या न्याय्य हक्कांसाठी शिवसेनेसोबत लढत आहेत.’

अजित पवार राजीनाम्यावर ठाम; मनधरणी सुरूच

शिवसेनाप्रमुखांना दिले वचन
उद्धव ठाकरे म्हणाले, ‘मराठी माणसांच्या न्याय हक्कांसाठी लढत राहण्यासाठी शिवसेनेची स्थापना करण्यात आली. मला विधानसभेत सत्ता हवी आहे. शेतकऱ्यांना फक्त मी कर्ज मुक्तच नाही तर, पूर्ण चिंतामुक्त केल्याशिवाय राहणार नाही.  सर्व इच्छुकांना सांगत आहे की, एक ना एक दिवस मी शिवसैनिकाला मुख्यमंत्रीपदावर बसल्याशिवाय राहणार नाही असे मी शिवसेनाप्रमुखांना वचन दिलेले आहे.’ निवडणुकीसाठी उमेदवार निवड हा माझ्यासाठी फार कठीण काळ असतो. मी म्हणजे भगवा मी म्हणजे शिवसेना हा भगवा महाराष्ट्राच्या विधानसभेवर फडकला पाहिजे यासाठी प्रयत्न करा, असे आवाहन त्यांनी यावेळी शिवसेना कार्यकर्त्यांना केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: shiv sena leader uddhav thackeray statement on alliance with bjp