उदयनराजे भोसले यांना विधानसभा निवडणुकीचा आधार नाहीच!

udayanraje bhosale
udayanraje bhosale

नवी दिल्ली : विधानसभा निवडणुकांबरोबरच सातारा लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक होऊन, त्यात विधानसभा निवडणुकीच्या वातावरणाचा लाभ होईल, अशी अपेक्षा बाळगणाऱ्या साताऱ्यातील उदयनराजे समर्थकांच्या हाती निराशा आली आहे. साताऱ्याची पोटनिवडणूक विधानसभेसोबत होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

पोटनिवडणूक नाही
साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. तत्पूर्वी, त्यांनी लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यांच्या रिक्त झालेल्या सातारा लोकसभेच्या जागेवरील पोटनिवडणूक विधानसभेच्या निवडणुकीसोबतच घेतली जाईल, अशी चर्चा होती. पण, महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसोबत लोकसभेची कोणतिही पोटनिवडणूक होणार नाही, असे मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी सांगितले. विधानसभेसोबत निवडणूक होणार नसल्यामुळे उदयनराजे भोसले एकटे पडल्याची चर्चा सुरू झाली आहे. विधानसभा निवडणुकांची सगळी प्रक्रिया पार पडल्यानंतर सातारा पोटनिवडणुकीसासाठी वेगळी आचारसंहिता लागू होण्याची चिन्हे आहेत.

उदयनराजेंच्या विरोधकांना मिळणार वेळ
उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादी सोडून भाजपची कास धरल्यामुळे काँग्रेस राष्ट्रवादीने सातारा पोटनिवडणुकीत तगडा उमेदवार देण्याची तयारी सुरू केली आहे. विधानसभेसोबत साताऱ्याची निवडणूक होणार नसल्यामुळे आता काँग्रेस-राष्ट्रवादीला या निवडणुकीच्या तयारीसाठी अधिक वेळ मिळणार आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकांनंतर साताऱ्याची निवडणूक चांगलीच रंगतदार होण्याची शक्यता आहे.

पोटनिवडणुकीसाठी 18 कोटी खर्च?
एका विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीसाठी साधारणत: तीन कोटी रुपयांचा खर्च येतो. सातारा लोकसभा मतदारसंघात विधानसभेच्या सहा जागांचा समावेश आहे. त्यामुळे सातारा पोटनिवडणुकीसाठी सरासरी 18 कोटी रुपयांचा खर्च येईल, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातील सूत्रांनी दिली होती. चौदाव्या विधानसभा निवडणुकीसाठी सरकारने 913 कोटी रुपयांची तरतूद केल्याचेही सूत्रांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com