सोलापूर जिल्ह्यात २.६४ लाख बेरोजगार! तरी रोजगार मेळाव्यांकडे पाठ; पगार जास्त पाहिजे, घराजवळच जॉब हवा, अशा अनेक अपेक्षा

तरुणांना किमान २०-३० हजार पगार पाहिजे, ये-जा करायला कंपनीचे वाहन हवे, घराजवळ तथा वर्क फ्रॉम होमची सोय असावी, दरवर्षी पगार वाढावा, कंपनीतर्फे जेवणाची सोय असावी, अशा अपेक्षा आहेत. त्या अपेक्षा पूर्ण होत नसल्याने तरुण मेळाव्याला येत नाहीत, अशी स्थिती आहे.
 Young
Youngsakal

सोलापूर : जिल्ह्यातील सुशिक्षित तरुणांना (किमान दहावी उत्तीर्ण) रोजगार मेळाव्यांमधून हाताला काम मिळावा या हेतूने www.rojgar.mahaswayam.gov.in हे संकेतस्थळ उपलब्ध करून देण्यात आले आहे. सद्य:स्थितीत त्यावर दोन लाख ६४ हजार ३७ तरुण-तरुणींनी नोंदणी केली आहे. त्यांच्यासाठी दरमहा रोजगार मेळावा घेतला जातो, पण अपेक्षापूर्ती होत नसल्याने मेळाव्याला अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे.

यंदा जिल्ह्यातील सुशिक्षित तरुणांसाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रातर्फे सहा मेळावे घेण्यात आले. या मेळाव्यातून साडेतीन ते चार हजार तरुणांना रोजगार मिळणार होता. परंतु, त्याठिकाणी केवळ एक हजार २७० बेरोजगार उपस्थित राहिले. आता ऑक्टोबर ते मार्च या काळात आणखी दहा मेळावे होणार आहेत.

दरम्यान, पुण्यातच किंवा नोकरी घराजवळच पाहिजे, पगार समाधानकारक नाही अशी कारणे देऊन बेरोजगार मेळाव्यांकडे पाठ फिरवित असल्याचे निरीक्षण अधिकाऱ्यांनी नोंदविले आहे. शासकीय नोकरींची संख्या मर्यादित असतानाही लाखोंच्या संख्येने तरुण त्याठिकाणी अर्ज करतात. अनेकांना नोकरी मिळत नाही, अशा तरुणांना खासगी कंपन्यांमध्ये रोजगार मिळवून देण्याच्या हेतूने हे रोजगार मेळावे आयोजित केले जातात. पण, तरुणांच्या अपेक्षा वाढल्याने कंपन्यांना कौशल्यपूर्ण कामगार मिळत नाहीत, अशी स्थिती आहे.

रोजगार मेळाव्यांची स्थिती

  • वर्षातील मेळावे

  • १२

  • मेळाव्यात सहभागी उद्योजक

  • ६१

  • रोजगाराच्या संधी

  • ९०००

  • तरुणांची सरासरी उपस्थिती

  • ६७००

  • रोजगार मिळणारे बेरोजगार

  • ५०००

कौशल्याचा अभाव, तरीपण अपेक्षा ढीगभर

सोलापूर जिल्ह्यात चिंचोली, अक्कलकोट रोड, चंद्रमौळी यासह इतर एमआयडीसीमधील उद्योजकांना दरवर्षी साधारणतः: सात ते दहा हजारांपर्यंत कामगार लागतात. त्याअनुषंगाने जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रातर्फे मेळाव्यांचे आयोजन केले जाते. मेळाव्यात सहभागी होणाऱ्यांमध्ये अनेकजणाकडे पदवी प्रमाणपत्र आहे, पण कौशल्याचा अभाव असल्याचेही चित्र पाहायला मिळते. दुसरीकडे तरुणांना किमान २०-३० हजार पगार पाहिजे, ये-जा करायला कंपनीचे वाहन हवे, घराजवळ तथा वर्क फ्रॉम होमची सोय असावी, दरवर्षी पगार वाढावा, कंपनीतर्फे जेवणाची सोय असावी, अशा अपेक्षा आहेत. त्या अपेक्षा पूर्ण होत नसल्याने तरुण मेळाव्याला येत नाहीत, अशीही वस्तुस्थिती आहे.

यंदा होणार १६ रोजगार मेळावे

२०२३-२४ या आर्थिक वर्षात किमान दहावी उत्तीर्ण ते पदवी-पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेल्यांसाठी १६ रोजगार मेळावे आयोजित केले जाणार आहेत. काही मेळावे ऑफलाइन तर काही मेळावे ऑनलाइन होणार आहेत. आतापर्यंत जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राने सहा मेळावे घेतले आहेत. त्यात केवळ साडेबाराशे बेरोजारांनीच सहभाग नोंदविल्याचे समोर आले आहे. सहा मेळाव्यातून केवळ ४७२ बेरोजगारांना रोजगार मिळाला आहे. मंगळवारी (ता. २६) बुर्ला महिला महाविद्यालयात आयोजित मेळाव्यात १२ उद्योजक सहभागी झाले होते. त्यांना एक हजार ३८० तरुणी पाहिजे होत्या. पण, ४२९ तरुणी-महिला उपस्थित राहिल्या आणि त्यातील २८० जणींनाच रोजगार मिळाला. काहींनी आम्हाला सोलापूरमध्येच ने-आण करण्याची सोय हवी, अशा अपेक्षा मांडल्या. त्यामुळे त्यांना रोजगार मिळू शकलेला नाही.

तरुणांचा सहभाग वाढण्याची आशा

जिल्ह्यातील बेरोजगार तरुण-तरुणींना रोजगार मिळावा म्हणून दरमहा रोजगार मेळावा घेतला जातो. त्यातून अनेकांच्या हाताला काम मिळते, पण बेरोजगारांच्या अपेक्षा वाढल्याने मेळाव्याला उपस्थित राहणाऱ्यांची संख्या कमी दिसते.

- हणमंतराव नलावडे, सहायक आयुक्त, कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सोलापूर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com