मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाचा मान 'रानकवी महानोर' यांना!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 डिसेंबर 2019

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे 93 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 10 ते 12 जानेवारी 2020 दरम्यान उस्मानाबाद येथे होत आहे.

उस्मानाबाद : जगभरातील मराठी भाषिकांना आपल्या साहित्यप्रतिभेने गेल्या पन्नास वर्षांपासून मोहिनी घालणारे रानकवी पद्मश्री ना. धों. महानोर हे साहित्य क्षेत्रातील आदराने घेतल्या जाणाऱ्या नावांपैकी एक होय.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच ऍप 

पुढील वर्षी 10 जानेवारी 2020 ला उस्मानाबाद येथे होणाऱ्या 93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन महानोर यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती संमेलनाचे स्वागताध्यक्ष नितीन तावडे यांनी दिली.

- ज्येष्ठ कथाकार सखा कलाल यांचे निधन

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे 93 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 10 ते 12 जानेवारी 2020 दरम्यान उस्मानाबाद येथे होत आहे. या संमेलनाची जय्यत तयारी आयोजकांनी सुरू केली आहे. संमेलनाध्यक्षपदी फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची यापूर्वीच एकमताने निवड झालेली आहे. साहित्य संमेलन अधिकाअधिक अविस्मरणीय होण्यासाठी आयोजक समितीमार्फत आखणी सुरू आहे.

संमेलनाचे उद्घाटक म्हणून ज्येष्ठ कवी पद्मश्री ना. धों. महानोर यांना निमंत्रित करण्यात आले होते. उस्मानाबादकरांच्या विनंतीला मान देऊन त्यांनी उद्घाटन सोहळ्यास येण्याचे मान्य केले आहे. त्यांच्या सहवासामुळे साहित्यक्षेत्रातील प्रतिभेला आणि नवोदित लेखक, कवींना ऊर्जा मिळेल, असे तावडे यांनी सांगितले. 

- आता पासपोर्टवरही कमळाचं फूल, सरकारी यंत्रणांच्या भगवेकरणाचा घाट?

संमेलनात तीन दिवस चालणार्‍या विचारमंथनातून साहित्यप्रतिभेला नवी दिशा निश्चित मिळू शकणार आहे. संमेलनाची रूपरेषा निश्चित करण्याचे काम अंतिम टप्प्यात असून लवकरच ती जाहीर करण्यात येणार आहे. संमेलनाचे उद्घाटक म्हणून ना. धों. महानोंर यांच्या निवडीचे आयोजक मराठवाडा साहित्य परिषदेचे पदाधिकारी, सदस्य तसेच मराठवाड्यातील साहित्यिक, विविध संस्था, संघटनांनी स्वागत केले आहे.

पद्मश्री ना. धों. महानोर यांच्याविषयी

महानोर यांच्या लेखणीतून साकारलेली अजिंठा, कापूस खोडवा, गंगा वाहू दे निर्मळ, जगाला प्रेम अर्पावे, त्या आठवणींचा झोका, दिवेलागणीची वेळ, पळसखेडची गाणी, पक्षांचे लक्ष थवे, पानझड, पावसाळी कविता, यशवंतराव चव्हाण, रानातल्या कविता, शरद पवार आणि मी, शेती, आत्मनाश आणि संजीवन ही पुुस्तके वाचकांनी डोक्यावर घेतली आहेत. तसेच जैत रे जैत, सर्जा, एक होता विदूषक, अबोली, मुक्ता यांसारख्या चित्रपटांसाठी त्यांनी गीतलेखन केले. ही गाणी आजही अनेकांच्या ओठी कायम आहेत.

- #ShamelessSmriti : तुमचा 'आय क्यू' चेक करा; स्मृती इराणींना नेटकऱ्यांनी सुनावले!

ना. धों. महानोर यांना भारत सरकारने 1991 साली पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आलेले आहे. 2000 साली त्यांच्या 'पानझड' या पुस्तकास साहित्य अकादमी पुरस्कार आणि 2009 साली कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे 'जनस्थान' पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 93rd All India Marathi Literature Conference will be inaugurated by N D Mahanor