Video: कृषीमंत्री जेव्हा शेतकरी बनून खत मागतात अन् मिळतच नाही...मग एकेकाला...

सुषेन जाधव
Sunday, 21 June 2020

राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी रविवारी (ता. २१) येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील एका कृषी सेवा केंद्रात शेतकऱ्याच्या वेशात जाऊन खत मागितले. पण, विक्रेत्याने त्यांना खत नसल्याचे सांगितले. त्यावर मंत्री भुसे यांनी खरे रूप दाखवत केंद्रातील स्टॉक रजिस्टर तपासले. त्यावर मोठ्या प्रमाणात खताचा साठा शिल्लक असल्याचे स्पष्ट झाले. 

औरंगाबाद: राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी रविवारी (ता. २१) येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील एका कृषी सेवा केंद्रात शेतकऱ्याच्या वेशात जाऊन खत मागितले. पण, विक्रेत्याने त्यांना खत नसल्याचे सांगितले. त्यावर मंत्री भुसे यांनी खरे रूप दाखवत केंद्रातील स्टॉक रजिस्टर तपासले. त्यावर मोठ्या प्रमाणात खताचा साठा शिल्लक असल्याचे स्पष्ट झाले. 

झाले असे की, खरीप हंगामात बियाणे, खते आदी कृषी निविष्ठा अवाजवी भावात विक्री होत असल्याच्या तक्रारी कृषी मंत्र्यांकडे शेतकऱ्यांनी केल्या होत्या. बोगस खते, बियाणे तसेच जास्तीच्या किमतीत विक्री होत असल्याचे प्रकार ‘सकाळ’ने उजेडात आणून यावर कारवाई करण्याचे कृषी विभागासमोर आव्हान असल्याचे वृत्तही प्रकाशित केले होते.

हेही वाचा- बोगस बियाणे विक्री करणाऱ्यांवर कारवाई पण नेमकी काय? कृषी विभागसमोरील आव्हान कायम

​त्या आधारे रविवारी कृषिमंत्री भुसे हे स्वत:च शेतकरी बनून बाजार समितीतील नवभारत फर्टीलायझर्स या कृषी सेवा गेले आणि त्यांनी १० गोण्या युरियाची मागणी केली, मात्र, खत शिल्लक असतानाही दुकानदाराने देण्यास नकार देत लिंकिंगचे खत माथी मारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर कृषिमंत्र्यांनी जिल्हा कृषी अधीक्षकांमार्फत त्या दुकानाचा आणि गोदामाचा पंचनामा केला. 

गुणनियंत्रण अधिकारी सक्तीच्या रजेवर 
कृषिमंत्री भुसे यांनी तत्काळ कृषी सचिवांना कॉल करून संबंधित गुण नियंत्रण अधिकाऱ्याला सक्तीच्या रजेवर पाठविण्याचा आदेश दिला. यासंदर्भात नेमके कोणते अधिकारी सक्तीच्या रजेवर जाणार याविषयी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. तुकाराम मोटे यांच्याशी संपर्क केला असता संबंधित परिसर तालुका कृषी अधिकारी (पंचायत समिती), जिल्हा कृषी विकास अधिकारी आणि स्वतः माझ्याकडे येतो. त्यामुळे नेमके कोणाला सक्तीच्या रजेवर पाठवावे हे निश्‍चित नसल्याचे डॉ. मोटे यांनी ‘सकाळ’ला बोलताना सांगितले. 

हेही वाचा- शेतकऱ्यांनो...निंबोळी अर्क तयार करण्याची हीच खरी वेळ, विनाखर्च बनविण्याची ही आहे पद्धत

शेतकऱ्यांना नडाल तर याद राखा 
खताचा साठा मुबलक असतानाही जर दुकानदार शेतकऱ्यांना कृषी निविष्ठा देणार नसतील तर त्यांच्यावर कठोर कारवाई करा, त्याआधी गुणवत्ता नियंत्रण अधिकाऱ्यांनी असले प्रकार रोखण्यासाठी सजग राहा, कोणीही शेतकऱ्याला नडाल तर याद राखा असा सज्जड दमच त्यांनी भरला. कृषी निविष्ठा दुकानदारांनी शेतकऱ्यांना विशिष्ट कंपनीचीच खते, बियाणे घेण्याची सक्ती करू नका, शिल्लक असतानाही युरिया शेतकऱ्यांना न देणे हे गंभीर असून, असे प्रकार अजिबात खपवून घेणार नाही असेही मंत्र्यांनी सुनावले. 

कृषी अधिकाऱ्यांची धावपळ 
मंत्री भुसे हे ज्या दुकानामध्ये गेले होते. तिथे शिल्लक साठ्याच्या फलकावर युरिया शिल्लक असल्याचे निदर्शनास आले. मात्र, मंत्री भुसे यांनी स्टॉक रजिस्टरची मागणी केली असता रजिस्टर घरी असल्याचे दुकानदाराने सांगितले.

हेही वाचा- माझं लेकरु तहसीलदार झालं, हे कळलं तेव्हा मी रानात होते, मग काय इतका आनंद झाला म्हणून सांगू....

त्यानंतर कृषिमंत्र्यांनी जिल्हा कृषी अधीक्षकांना दुकानात बोलावून घेतले. युरिया शिल्लक असतानाही तो शेतकऱ्यांना का दिला जात नाही असा सवाल कृषी अधिकाऱ्यांना केला. दुकानाचा आणि गोदामाचा पंचनामा केल्यानंतर दुकानात युरियाच्या १,३८६ गोण्या शिल्लक असल्याचे आढळून आले. या दुकानदारावर कारवाई करण्याचे आदेश मंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिले. 

कृषिमंत्री बाजार समितीत आल्यानंतर आम्हाला बोलावून घेण्यात आले. त्यांच्या आदेशानुसार संबंधित कृषी केंद्राच्या गोदामाचा पंचनामा करीत आहोत. संबंधितावर योग्य ती कारवाई करण्यात येईल. 
- डॉ. तुकाराम मोटे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी. 

हेही वाचा: आई आजारी, भावांचाही सांभाळ, कर्ता बनून आठवीतली शीतल देतेय कुटूंबाला आधार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Agriculture Minister Dada Bhuse Taking Action About Highrate Fertilizer seller Aurangabad News